२४ हिन्दुमुसलमान एकी

गेल्या पंधरवडयांत काँग्रेसचे पुढारी, जनाब जिना व व्हाईसरॉय यांची पुन: भेट होऊन त्यांतून कांही निष्पन्न होऊं शकलें नाही.  महात्माजी व राजेंद्रबाबू यांनी काँग्रेसची नेहमींचीच भूमिका पुन: ठासून सांगितली कीं तुम्हांला आमच्या हिंदु-मुसलमानांच्या भांडणाची चांभार चौकशी करावयची जरूर नाहीं, जें काहीं द्यायचें असेल तें ताबडतोब द्या.  दिल्यानंतर आम्हीं हवें तसें वांटून घेऊं.

हिंदुस्थानचें स्वातंत्र्य शत्रूच्या कमजोरीवर मिळायचें नसून आपल्या सामर्थ्यावर कमवायचें आहे.  आपण कमजोर असूं तर स्वातंत्र्य मिळाल्यावरहिं तें टिकवूं शकणार नाहीं.  महात्माजींच्या कल्पनेप्रमाणें स्वातंत्र मिळाल्यानंतर परचक्रापासून अहिंसेने संरक्षण कसें करतां येईल हा प्रश्न जरी सोडून दिला तरी हिंदुस्थानांतील सर्व पक्षांची आतां खात्री झाली आहे कीं अहिंसेशिवाय  स्वातंत्र्याचें दुसरें अनुकूल साधन नाहीं.  व आपसांतील दुही नाहींशी झाल्याशिवाय अहिंसेचा मार्ग यशस्वी होणार नाहीं.

हिंदुमुसलमान हे भेद ही आपल्या स्वातंत्र्यामध्ये मोठी धोंड आहे.  हे काल्पनिक भेद ब्रिटिशांचे राज्य हिंदुस्थानात आल्यावरच आपल्यामध्यें दिसू लागले व ब्रिटिशांचे अस्तित्व या दुहीवरच अवलंबून आहे. हे भेद धार्मिक असून त्यांचा हिंदी स्वातंत्र्याशी कांही संबंध नाहीं.  हिंदी स्वातंत्र्य हा राजकीय, आर्थिक प्रश्न आहे.  जकात-इन्कमटॅक्स व कुळकायदे, मजुरांचे संबंधीचे कायदे, विम्यासंबंधी कायदें, दारुबंदी, सडका, विहिरी, कालवें बांधणें वगैरे नागरिकांच्या हक्कामध्यें हिंदू-मुसलमान हा भेद येतों कुठें?  मुसलमानांसाठी किंवा फक्त हिंदूंसाठी दारुबंदीचा का फायदा मिळणार आहे किंवा कालव्याचें पाणी अमुक धर्माचे लोकांनाच का देण्यांत येणार आहे?  हिंदूंकरता अमुक सडक राखून ठेवण्यांत का येणार आहे?  हा का स्वातंत्र्याचा अर्थ?  हरिजनमध्यें आलेल्या एका अलिगडच्या एम.ए. च्या पत्रांत तो म्हणतो, 'हिंदुस्थानांत दोन राष्ट्रें आहेत ; हिंदु व मुसलमान.'  धर्म व राष्ट्र एक असेल तर जगांत फारच थोडी राष्ट्रें दिसायला हवीं.  तुर्कस्थान, अंगोरा, अफगाणिस्थान, इराण हीं मुसलमान राष्ट्रे वेगवेगळी कशाला हवीत? युरोपांतील व पश्चिम गोलार्धातील इतक्या ख्रिश्चन राष्ट्रांचा बुजबुजाट कां?  आणि मग रशिया, जर्मनी  व इतर दोस्त राष्ट्रें भांडतात तरी का?  ज्या लोकसमूहाचे आर्थिक व राजकीय हितसंबंध एकत्र निगडीत केले आहेत तें राष्ट्र.  मुसलमानांनाहि स्वातंत्र्य हवें आहे.  हिंदी मुसलमान हें जर एक राष्ट्र तर बाबांनो, तुम्ही एकटे तरी स्वतंत्र्य होण्याचें पुण्य घ्या ना.  म्हणून हिंदुस्थान हें एक राष्ट्र आहे व आपल्या स्वातंत्र्याआड धर्म येऊ शकत नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel