१४ देशभक्ति
[तत्त्वज्ञान मंदिराचे डायरेक्टर प्रो. जी. आर. मलकानी यांनी विद्यार्थी मासिकासाठीं लिहून दिलेल्या इंग्रजी निबंधाचा अनुवाद.]
स्वदेशाबद्दल प्रेम असणें याला वाईट कोण म्हणेल? आपल्या सुख-दु:खाशीं निगडित असलेल्या भूमीबद्दल साहजिकच आपणांस आपलेपणा वाटतो, प्रेम वाटतें. जगांतील दुसरे भूप्रदेश जास्त सुपीक असतील, निसर्गदत्त देणग्यांनी श्रीमंत असतील, तरी जेथें आपण लहानाचे मोठे झालों जेथें आपले वाडवडील नांदले त्याच भूमीबद्दल आपल्या मनांत भक्ति व प्रेम असतें; तिच्याबद्दलच आपणांस उत्सुकता असते, उत्कंठा असते. आपल्या आईबापापेक्षां दुस-याचे आईबाप कांही गुणांनी अधिक आहेत, म्हणून आपले आईबाप आपणांस आवडत नाहींत का? दुस-याच्या घरांप्रमाणे आपलें घर तितक्या सुखसोयींनी संपन्न नाहीं म्हणून आपणांस आपलें घर कमी का प्रिय वाटतें? त्याप्रमाणेच आपली मायभूमि दुस-या देशांहून कांही बाबतींत कमी असली तरी आपणांस ती आवडणार नाहीं असें कधींच होणार नाही.
लहानपणी आपल्या जन्मग्रामाबद्दलच कुतूहल व औत्सुक्य असतें. परंतु जसजसे आपण मोठे होतों तसतसें आपला जन्मग्राम म्हणजे एका मोठया प्रदेशाचा अल्प भाग आहे असें दिसतें. हा मोठा भाग म्हणजेच राष्ट्र. राष्ट्र किंवा देश याचाच आपला गांव हा एक भाग आहे असे समजून येतें. आपणां सर्वांची सुखदु:खें, आपल्या सोयी गैरसोयी; आपले राजकीय हक्क व गा-हाणीं; आपली संस्कृति व सुधारणा या सर्व एक असतात. या समानत्वामुळें एकें ठिकाणीं येणा-या जनसमूहालाच राष्ट्र असें म्हणतात. आपला मोठेपणा तो सर्वांचा आहे व सर्वांचा तो आपला आहे. अशा रीतींने राष्ट्रीय ऐक्याची भावना उद्भूत होते. आपण अत:पर इतरांपासून विभक्त व अलग न राहतां, सर्व एकाच संस्कृतीच्या जनसमूहामधील आहोंत असें समजून वागतों. सर्वांचा फायदा, सर्व राष्ट्राचें हित हीच गोष्ट डोळयांसमोर राहते. वैयक्तिक व खाजगी फायदे दूर राहतात. ज्यामुळें व्यक्तीचा फायदा होतो, पण राष्ट्राचा होत नाहीं ती गोष्ट अंती त्या व्यक्तीसहि अहितकारक होते; पण याच्या उलट राष्ट्राचा जो फायदा होतो, तो व्यक्तीचाहि होतो. कारण व्यक्ति ही राष्ट्रांतर्गतच असणार. आपणां सर्वांस हें समजतें, तरीपण आपणांस उमजत नाहीं. व्यक्तिविषयक स्वार्थातून आपण बाहेर पडूं शकत नाही. आपले स्वत:चे कोटकल्याण करून घेणें हेंच जणूं आपले ध्येय या रीतींने आपण वागतों. विशेषत: आपण हिंदु या देशप्रीतीच्या बाबतींत फार मागें आहोंत. आपली अंत करणें देशभक्तीच्या भावनेंने उचंबळून जात नाहींत, वेडीं होत नाहींत. याचें कारण काय बरें असावें? जरा आपण कारणमीमांसा करूं या.
प्रत्येक देशांत-स्वतंत्र देशांत-तरुणांना जें शिक्षण देण्यांत येतें तें देश-भक्तीस पोषक असावें असें असतें. विशेषत: देशाचा जो गतेतिहास शिकवावयाचा त्या वेळेस मुलांच्या मनांत देशभक्ति उत्पन्न होईल, देशाबद्दल अभिमान वाटेल अशा रीतीनें शिकविण्यांत येतो. बहुतकरून प्रत्येक देशाच्या सभोंवतीं दुसरे देश असतात. दुस-या देशांशी समान अशी त्यांची सरहद्द असते. देशाचा इतिहास म्हणजे या शेजारच्या राष्ट्राशीं आपल्या झालेल्या घडामोडी होत. इतिहासांत महत्त्वाचा भाग हाच असतो. बहुतेक स्वतंत्र राष्ट्रांतील शिक्षणाधिकारी हा इतिहास अशा रीतींने मांडला जाण्याची खटपट करतात कीं त्यामुळें तरुणांच्या मनांत पूर्वजांच्या मर्दुमकीबद्दल प्रेम व अभिमान उत्पन्न होईल. ज्याने ज्याने देशाचा मोठेपणा वाढविला, त्याला त्याला विभूति समजण्यांत येतें व ही विभूतिपूजा सुरू होते. त्या त्या कर्तबगार पुरुषाचें नांव उच्चारतांच एक प्रकारचा आवेश उत्पन्न होतो. राष्ट्रभक्ति निर्माण करावयाची असेल तर ही राष्ट्रांतील विभूतींची जी पूजा आहे तिला शिक्षणांत महत्त्वाचे स्थान द्यावें लागेल. आपलें राष्ट्र हें वीरांचे, मर्दांचे राष्ट्र व्हावें अशी इच्छा असेल तर विभूतिपूजा हें महत्त्वाचें साधन आहे--मनुष्य हा स्वभावत: अनुकरणशील आहे. तो दुसरा सूचना करील तदनुसार वागतो. त्याच्या समोर जो आदर्श ठेविला जाईल, जें ध्येय मांडलें जाईल, त्याप्रमाणें वागण्याची त्याला स्फूर्ति होईल हें साहजिक आहे. परंतु परदास्यांत पडलेल्या राष्ट्रास राष्ट्रीय पुरुषांची स्मृति कोण देणार? पारतंत्र्यांत खितपत पडलेल्याराष्ट्रास आपला गतेतिहास स्फूतिर्हीन वाटतो, निस्तेज वाटतो; त्यांत हृदय हलविणारें असें कांही असेल ही कल्पनाच त्यांच्या मनांत येत नाहीं.