१० मयलोकांची आश्चर्यमय संस्कृति

महाभारतांतील मयासुर व त्यानें बांधलेली अद्भुत मयसभा यांची माहिती कोणास नाहीं?  या मयसभेंत पाण्याच्या भासानें धोतर वगैरे वर घ्यावें तेथें पाणी नसावें व जेथें पाणी नाहीं असें वाटे, तेथें नेमके पाणी असावें व त्यांत पडून ओलेंचिंब व्हावें-अशी फजीति दुर्योधनादिकांची झाली व द्रौपदी त्यांना हांसली.  पांडवांच्या या वैभवानें, द्रौपदीच्या या हास्यानें तर पुढील घनघोर संग्रामाचा पाया घातला.

हा मय कोठून आला होता?  हा मय पाताळांतून आला होता.   पाताळ म्हणजे कोणता देश?  --अमेरिका देश.  अमेरिकेंत आपल्याकडे उजाडलें म्हणजे सायंकाळ होते व तिकडे प्रात:काळ झाली म्हणजे आपणांकडे सायंकाळ होते.  आपल्या उलट बाजूस ते आहेत.  म्हणून अमेरिकेस पाताळ म्हणत.  पाताळांतील हा मयासुर होता.  हल्ली संशोधकांचे असें म्हणणें आहे कीं, फार प्राचीन काळीं अमेरिका व आशियाचा पूर्व भाग यांच्यामध्यें दळणवळण होतें.  वरच्या बेहरिनच्या सामुद्रधुनींतून खालीं जा ये होत असावी किंवा पॅसिफिक महासागरांत मध्यभागीं एक प्रकारचे प्रवाह आहेत.  त्या प्रवाहांच्या वेगानें अमेरिकेंत गलबतें लौकर जात-येत असावींत.  मार्ग कोणताही असो;  परंतु चीन, हिंदुस्थान वगैरे देशांशीं या अमेरिकेतील लोकांचा व्यवहार बराच असावा.  तिकडचे लोक इकडे येत व इकडचे तिकडे जात.  हिंदी संस्कृतीचे नमुने तिकडे आढळले आहेत.

मध्य अमेरिका या नांवाने जो प्रदेश आज ओळखला जातो, तोच मयासुराचा व त्याच्या पूर्वजांचा देश होय.  याच प्रदेशांत मय लोक सुखानें नांदले, आनंदानें पिढ्यानपिढ्या राज्य करते झाले, आणि जगाचे डोळे दिपवून टाकणा-या आपल्या संस्कृतीचे अवशेष मागें टाकून आज हे मयांचे वंशज कोठें रानावनांत हिंडत फिरत आहेत.  हे मय लोक येथें केव्हा आले, कसे आले याबद्दल नक्की माहिती कोणासच नाहीं.  परंतु मयांच्या उपलब्ध पंचांगावरून ख्रिस्त शकापूर्वी ६ ऑगष्ट ६१३ या दिवशीं हे मय लोक तेथे आले असावेत असा तर्क आहे.  तत्पूर्वी ते कोठें होते?  उत्तर अमेरिकेंतून ते खालीं सरकत आले असावेत.  परंतु वर वेराक्रूझ, यूकाटन, हांडुरास वगैरे प्रांतांत ख्रिस्तशकापूर्वी सातव्या शतकांत ते स्थाईक झाले एवढें निर्विवाद तत्पूर्वीचा इतिहास सर्वज्ञ काळालाच ठाऊक!

या मध्य अमेरिकेंत ख्रिस्तपूर्व सातव्या शतकापासून तों ख्रिस्तोत्तर सातव्या शतकापर्यंत म्हणजे जवळ जवळ हजार दीड हजार वर्षे मयांची सारखी भरभराटच होत गेली.  परंतु यानंतर मात्र अकल्पित त्यांचा विनाशकाल आला.  संस्कृतीच्या उच्च शिखरावर पोहोंचलेले हे मय लोक एकाएकीं आपलीं सुधारलेलीं शृंगारलेलीं  घरेंदारें शहरें सोडून येथून निघून गेले!  त्यांची अशी वाताहात कां झाली याचें खरें कारण समजत नाहीं.  आधुनिक शास्त्रज्ञांचें असें मत आहे कीं अमेरिकेच्या या भागांत सर्वसाधारण असणारा जो पतिज्वर त्याची भयंकर सांथ आली असावी व मयांची वाताहत झाली!  परंतु हा तर्कच आहे.  उरलेल्या मयांनी आपलें साम्राज्य पूर्ववत् स्थापण्याचा व आपलें गेलेलें वैभव परत मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परन्तु विस्कटलेली घडी पूर्ववत् बसली नाहीं.  तरीसुध्दां सोळाव्या शतकांत  अतिलोभी बुभुक्षित स्पॅनिश पिशाच्चें येथे येईपर्यंत मयलोक स्वातंत्र्यसुख अनुभवीत होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel