२५ हेला मारणे

विजया दशमी दिवशीं नगरदेवळें येथें श्री अण्णासाहेब दास्ताने यांचे व्याख्यान झालें.  मी समारोपाला गेलों होतों.  परन्तु त्या दिवशी तेथें हेला मारला जावयाचा होता.  दरवाजामध्यें एक खळगा खणलेला होता.  त्यांत त्या हेल्याचें मुंडके पुरावयाचें होतें.  मी खिन्न होऊन बसलों.  मंडळी मला म्हणाली,  'शिलांगणाला येतां? ' मी ' नाही ' म्हटलें.  माझ्या डोळयांसमोर कारुण्यसिंधू भगवान बुध्द आले.  यज्ञांत बकरे, बोकड बळी दिले जाऊं नये, म्हणून बुध्द त्या राजाच्या यज्ञांगणांत उभे राहिले व म्हणाले , 'मला मार.  त्या बोकडाला नको मारूं.'  माझ्याजवळ कोठून येणार तें धैर्य, ती अपार भूतदया!  मी म्हटलें, ' आपली शक्ति आपण ओळखावी.   माझ्या सांगण्यानें काय होणार?  हंसतील झालें.'

ही हेला मारण्याची पध्दत का निघाली?  काय हेतु?  नवरात्रांत नऊ दिवस महिषासुराजवळ देवींने युध्द केलें व दहाव्या दिवशीं महिषासुरास तिनें ठार मारिलें.  देवीला विजय मिळाला.  त्याची आठवण म्हणून महिष मारतात.  महिषासुर दिसत नाहींत, किंवा दिसत असून ते दूर करण्याची ताकद नाहीं, म्हणून हेला पकडतात व त्याला ठार मारतात.

पूर्वी एकदां महिषासुर झाला कीं नाहीं मला माहीत नाहीं.  परन्तु महिषासुर हा दोन प्रकारचा आहे.  एक मनातील व एक बाहेरील.  या दोघांना दूर करून माणसानें विजय मिळवावयाचा असतो.  हृदयांतील महिषासुर म्हणजे काम, क्रोध, लोभ, मत्सर यांचा संघ.  ज्याच्या हृदयांत कामक्रोधांची ठाणीं बसलीं, त्याच्या हृदयांतून आत्मारामाची सुखदायी सत्ता नष्ट होते, कामक्रोधांची साम्राज्यशाही सुरू होते.  सर्व इंद्रियांना एक दिवस मनुष्य मारतो.  व आत्म्याचें राज्य स्थापतो.  भगवान् बुध्दांचा विजयादशमीलाच जन्म झाला.  कामक्रोधांवर विजय मिळविणारे बुध्द या दिवशीं जन्मले.  त्यांनी हा एडका मदन, हा हेलामदन ठार केला.  आत्म्याची सत्ता स्थापिली.  तुकाराम महाराजांनी म्हटलें आहे :

रात्रंदिन आम्हां युध्दाचा प्रसंग
अंतर्बाह्य जन आणि मन ॥ १ ॥


रात्रंदिवस युध्द आहे.  गरिबाला पिळणारी बाहेरची दुष्ट राजकीय सत्ता हा हेला, हृदयांतील कामक्रोध हा दुसरा हेला.  या दोन्ही हेल्यांशी संत झगडतात.  समाजांतील अस्पृश्यतेसारख्या गुलामीच्या चाली.  त्यांच्या विरुध्द संतांनी बंड केलें.  मिरासदारांची मिरासी, वरिष्ठ वर्णियांची खोटी घमेंड व आसुरी वृत्ति असा हा रूढीचा दुष्ट हेला संत मारायला उठले.  त्याचबरोबर हृदयांतील हेलाहि मारावयास ते झटत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel