काँग्रेस-प्रीति म्हणजे शेवटीं दरिद्रनारायणाची प्रीति. ती ज्याचा जीवनांत उत्कटत्वनें प्रकट होईल तोच काँग्रेसचा सच्चा सेवक. कां. बद्दल जनतेंत तेव्हांच आदर व भक्ति वाढेल जेव्हां गरिबांची दु:खें दूर करण्याची शक्ति असलेले काँग्रेसमधील वरिष्ठ वर्ग गरिबांशी यथार्थाने एकरूप होऊं लागतील. काँग्रेसमधील वरिष्ठ वर्ग जेव्हा श्रमजीवी जनतेची दु:खें स्वत:ची समजूं लागतील, त्यांच्या उपासमारीची, त्यांच्या मुलांबाळांची कल्पना मनांत येऊन या वरिष्ठ वर्गीयांना जेव्हां विंचू डसल्याप्रमाणें वेदना होऊं लागतील, व्याजाचा दर ३ च काय, २ हि चालेल असें आनंदानें म्हणूं लागतील, तेव्हां काँग्रेसमध्यें शुध्दि येईल. कोटयवधि कष्ट करणा-या बंधुभगिनींच्या सुखासमाधानांत आमचें समाधान, त्यांना तोषवा ; त्यांचा दुवा घ्या, असें काँग्रेसमधील सारें लोक जेव्हां म्हणूं लागतील, सत्ताधारी, सूत्रधारी याप्रमाणें वर्तूं लागतील, तेव्हां काँग्रेसचें बळ हां हां म्हणतां वाढेल असें करणें, असें वागणें म्हणजेच सत्याचा साक्षात्कार आहे. असें करणें, असें वागणें म्हणजे अहिंसा जीवनांत आणणें होय. 'हें तर कठीण काम आहे ' असें जर वरिष्ठ वर्ग म्हणतील तर त्यांना नम्रपणें सांगावेंसे वाटतें कीं 'सत्य अहिंसा स्वस्त नाहींत. संत काय सांगतात ऐका :--
म्हणे व्हावीं प्राणांसवें ताटी
नाहीं तरीं गोष्टी बोलूं नयें ॥'
-- वर्ष २, अंक १४