एकदा एक परदेशीय प्रवासी जपानी शहरांत गेला होता. तेथें त्याला कळलें कीं, येथून ३.४ मैलांवर सुंदर धबधबा आहे. तो पहाण्यासाठीं म्हणून तो निघाला. वाटेंत पाटी होती. तिच्यावर लिहिलें होतें. 'धबधब्याकडे जाणारा रस्ता' - तो गृहस्थ वाटाडयास घेऊन गेला, वाटेंत ५/६ फूट उंचीवरून एक प्रवाह पडत होता! याला धबधबा म्हणत व त्याच्या पाटया असत. जपानी लोक अशा त-हेंने लहान वस्तूचीहि प्रसिध्दी करतात.
जपानांतील जेवण्याबद्दल थोडें सांगतों. जेवतांना लहान लहान गांठीवर ते बसतात व सर्वांच्या समोर सुमारें सहा इंच उंचीचें असें मोठें टेबल असतें. त्यावर छोटीं छोटीं ताटें प्रत्येकासाठी मांडतात; घरी पुरुष पाहुणा आला तर कुलस्त्रिया त्याच्यासमोर बसून जेवत नाहींत. परंतु पाहुण्याबरोबर त्याची पत्नीहि आली असेल तर मात्र सर्वजण एकत्र जेवण करतात.
जपानी लोकांच्या घरांत दोन देव पूजिले जातात. या दोन देवांच्या प्रतिमा घरांत असतात. एक मत्स्य देव दुसरा ओदन देव. मत्स्यदेवाचे एका हातांत मांसे धरण्यांचे जाळें व दुस-या हातांत मासे असतात! ओदन देव तांदळाच्या राशीवर बसलेला असतो. तांदुळ व मत्स्य हेंच जपानी लोकांचे मुख्य अन्न. रोजच्या जेवणांत मासे असावयाचेच. वर्षप्रतिवदेच्या दिवशीं जपानी लोक एकमेकांस मोठमोठे मासे भेट म्हणून पाठवतात. साधारणपणें माशांशिवाय इतर मांस जपानी खात नाहींत.
जपानांत स्वयंपाक करण्यासाठीं घरोघर चुली पेटत नाहींत. घरांतून शिधासामग्री घेऊन सार्वजनिक चुलाणावर जाऊन अन्न शिजवून आणतात. हे कमी खर्चाचें असतें.
जपानांत हॉटेलें फार. हॉटेल म्हणजे चहाचींच दुकानें; कारण मुख्य विक्री चहाची. साधारणपणें पाणी पिण्याऐवजीं चहाचाच उपयोग जपानी लोक करतात. हॉटेलांतून लहान लहान पाण्याच्या पुष्कळच टाक्या असतात व त्यांत हरत-हेचे मासे पोहत असतात. गि-हाइकानें यातील पसंत पडेल तो मासा दाखवावा, कीं लगेच त्या माशाची भाजी, चटणी गि-हाइकास करून मिळते. हॉटेलमध्यें मिळणा-या वस्तू न विचारता सर्व माहिती प्रवाशाला मिळते. हॉटेलमध्यें कोणी पाहुणा आला तर त्याला मालक व नोकर सामोरे जातात. त्याला चहा दशमी लगेच देतात. हा चहा घेऊन येणा-या मोलकरणीस त्याला कांहींतरी चिरीमिरी द्यावी लागते, त्याबद्दल त्याला ती मोलकरीण पावती देते.
जपानी लोकांचा पोशाख मोठा विचित्र. एक सैल पायघोळ अंगरखा अंगांत घालतात. त्याच्या बाह्या तर फारच सैल असतात. वेळप्रसंगी ह्या बाह्यांचा खिशांप्रमाणे उपयोग होतो. कामकरी लोक एक मोठी टोपी डोकीस घालतात. ही टोपी कसली? एक आपली उथळ टोपलीच डोकीवर ठेवून देतात म्हणा ना!