किसान व कामगारांना वगळाल तर बळ वाढणार कसें?  किसानांच्या व कामगारांच्या संघटना आम्हांस बघवत नाहींत.  ते मोर्चें काढूं लागले, प्रचंड मिरवणुकी काढूं लागले तर आम्हांस आनंद होण्याऐवजीं दु:ख वाटूं लागतें. 

किसान व कामगार कार्यकर्तें काँग्रेस संस्थेंत येऊं नयेत म्हणून कोण आटाआटी!  म्हणे ते हिंसक आहेत.  म्हणे ते खादीचें व्रत नीट पाळीत नाहींत.  मुंबई शहर कां.कमिटीनें ऑफिसांत येऊन सभासद व्हावें असा ठराव केला आहे.  कामागारांनी ९/९ तास काम करून तुमच्या ऑफिसात केव्हा यावें? भुलाभार्इंनी उत्तर द्यावें.  ज्यांच्या हातांत ऑफिस आहे ते सभासद ऑफिसांतच नोंदवतील याला प्रमाण काय? आपल्या ओळखीच्यांत द्यावीं पुस्तकें, म्हणावे ऑफिसांत झाले.  कामगारांचें मात्र मरण.

खरा गांधीवादी तरी कोण?  त्यांतल्या त्यांत अधिक अहिंसक कोण?  गांधीवाद म्हणजे दरिद्री माणसाला सुखी करण्यासाठीं स्वत: फकीर होणें.  गांधीवाद म्हणजे अपार त्याग.  खादी पेहरून अहिंसेची व्याख्यानें देणारे ठायींठायींचे सावकार, कारखानदार व त्यांचे हस्तक पाहिले म्हणजे त्या खादीची कींव येते.  हे खादी वापरून भरमसाट व्याजें घेणारे, खादीचा साधेपणा मिरवून शेतक-यांच्या इष्टेटी जप्त करणारे, खादीचीं वस्त्रें नेसून कामगारांस भिकेस लावणारे, हे का गांधीवादी?  हे का अहिंसक?  खादी घालून व्याजासाठीं तहानलेल्या बगळयांस मी दूर फेंकीन व खादी नसलेल्या परंतु किसान कामगारांसाठी तळहातीं शिर घेणा-याच्या मस्तकाची धूळ मी मस्तकी लावींन.

काँग्रेसमध्ये शुध्दि हवी आहे.  परन्तु ती खादीची नसून हृदयाची हवी आहे.   काँग्रेसमध्ये बगळे नकोत, राजहंस असूं देत.  स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून खादीची अट ठेवा.  परन्तु तेवढयाने काँग्रेसची शुध्दि झाली असें समजूं नका.  काँग्रेस मंत्रिमंडळांना भराभर किसान कामगार कार्यक्रम कां उचलता येत नाहीं?  कोण बरें आड येतें?

आपल्या इस्टेटींना जपणारे परन्तु खादी घालणारे लोक आज काँग्रेसचे बळ कमी करीत आहेत.  काँग्रेसचे उपासक म्हणून दावा करणारे, सत्य व अहिंसा यांचे स्वत:ला पूजक समजणारे, स्वत:च्या जीवनांत खादी वापरण्यापलीकडे कांही करतात का?  वर्षानुवर्ष हे खादी वापरीत आहेत.  परंतु सालदाराजवळ नीट वागणार नाहींत, घरांतील गडयाला दूध देणार नाहींत.  कुळाला आजारांत औषध देणार नाहींत.  काय करायची ती खादी?  जी खादी तुम्हांला प्रेमळ, उदार, त्यागी बनवीत नाहीं ती काय कामाची?  अशा लोकांना पाहून काँग्रेसबद्दलचे प्रेम का वाढेल?  किसान कामगार काँग्रेसमध्ये आतां घुसणार असें दिसतांच या सर्वांचे धाबे दणाणलें.  इंग्रज सेनापति वेलिग्टन इंग्लंडमध्यें सुधारणा कायदा होतांना म्हणाला, 'आता पार्लमेंटची प्रतिष्ठा जाईल.  न्हावी, धोबी, किसान कामगार तेंथे येऊन बसतील. घरंदाज, संस्कृतिपूजक अमीर उमराव दिसणार नाहींत.'  आमच्यांतील कांही लोकांना हीच अडचण पडली आहे.  काँग्रेस श्रमजीवींच्या हाती गेल्यावर कसें होणार याची त्यांना भीति वाटूं लागली आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel