२. काँग्रेसपुढील गंभीर प्रश्न
त्रिपुरी काँग्रेस भरण्याच्या आधीपासून व भरल्यानंतर एकंदर सारें काँग्रेसचे वातावरण चमत्कारिक झाले आहे. संशय व अविश्वास यांचे धुकें पसरलेले आहे. हे धुके भुर्रकन उडून जाण्याऐवजी अधिकच दाट होत आहे. आकाशात ढग आलेले असावेत व जीव गुदमरावा तसे झाले आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश तरी येऊ दे, निर्मळ स्वच्छ पाऊस तरी पडूं दे. ही अभ्रें फार वाईट. ना प्रकाश ना पाणी, केवळ कोंडमारा.
मॉडर्न रिव्ह्यूमध्यें सुभाषबाबूंनी, 'माझे विचित्र आजारीपण' म्हणून लेख लिहिला होता तो लेख वाचून वाईट वाटल्याशिवाय राहणार नाही. 'माझ्या आजारीपणाचीहि प्रतिष्ठित कार्यकर्त्यांनी शंका घ्यावी!' असे राष्ट्रपति लिहितात. राजकारणांतील ही क्षुद्र हलकी वृत्ति पाहून आपण हिमालयांत जावें, अरविंदांप्रमाणे अलिप्त राहून अनंतात बुडी मारावी, असे सुभाषचंद्रांच्या मनांत आलें. त्रिपुरीला पुष्कळांना शिसारी आल्यावांचून राहिली नाही. परन्तु त्रिपुरी झाली. पुढे काय? गोविंद वल्लभपंतांचा ठराव बेकायदेशीर होता असे सुभाषबाबूंनी लिहिलें. सुभाषबाबू तो ठराव जर बेकायदेशीर म्हणत असतील तर महात्माजी तरी काय करणार? ते एवढेंच म्हणतील 'त्या ठरावाचा जो अर्थ तुम्हाला वाटतो तो ऑ. इं. काँ. कमिटीसमोर मांडा, व मंजूर करून घ्या.' पंतांच्या या ठरावाविषयी राष्ट्रपतींची ही भूमिका असल्यामुळे राष्ट्रपतींवर उघड अविश्वासाचा ठराव येत्या ऑ. इं. काँ. कमिटीत येणार आहे. त्रिपुरी काँग्रेसच्या वेळींच एक उजवे कां. कायर्कर्ते म्हणाले होते कीं, पंतांचा ठराव पास झाला म्हणजे सुभाषबाबूंनी राजीनामा दिलाच पाहिजे. पंतांचा ठराव म्हणजे राष्ट्रपतींवर अविश्वास असेंच त्यांना वाटत होतें, पुष्कळांना हीच गोष्ट त्या ठरावात स्पष्ट दिसत आहे. 'तसे नाही' असे सांगण्यांत अर्थ नाही. त्या ठरावांत जो गंर्भितार्थ होता, त्याचा उघड ठरावच आता येणार आहे. इकडे राष्ट्रपति म्हणतात, 'महात्माजींचे उपवासाचे वेळी आम्ही राजीनामें दिले असें हिं. सरकारला मंत्र्यांनी कळविलें तें कोणाच्या परवानगीने' असा प्रश्न विचारला आहे. त्या वेळेस व. कमिटीच्या सभासदांनी राजीनामें दिले होते. पार्लमेंटरी बोर्ड अस्तित्वांत नव्हतें. अशा वेळेस मंत्र्यांनी राष्ट्रपतींस या बाबतीत विचारले पाहिजे. मंत्र्यांनी राजीनामें दिले असते तर जबाबदारी कोणावर? काँग्रेसच्या अध्यक्षांस त्यासंबंधी विचारलें गेले नाही. अशा रीतीने अधिकच चिघळत जात आहे प्रकरण. वाईट आहे. जगांत महायुध्दाचे भीषण वादळ घोंघावत आहे. युध्द सुरू झाले तर हिंदुस्थान सरकारच्या हातांत व प्रांतिक गव्हर्नरांच्या हातांत अधिक सत्ता असावी असे बिल पार्लमेंटमध्यें येत आहे. म्हणजे उद्या प्रांतिक कारभारावर सरकार आक्रमण करील. जवाहरलाल नेहरूंनी या गोष्टीची गंभीरता पटविली आहे. संयुक्त प्रांत काँग्रेस कमिटीनें या बाबतीत ठरावहि केला आहे. युध्दाचे वेळेस आमचें धोरण काय राहील, प्रांतिक कारभारावर आक्रमण झाले तर काय करावयाचें, हें सों ठरले पाहिजे. या वेळेस प्राणमय ऐक्य पाहिजे. वारा आला म्हणजे कचरा उडून जातो. त्याप्रमाणे क्षुद्र भेदांचा कचरा महान वारें सुटल्यामुळें उडून गेला पाहिजे. मनें साफ झाली पाहिजेत. एकमेंकांस भेटलें पाहिजे. वर्किंग कमिटी सर्वसंग्राहक बनविली पाहिजे. 'त्वया जितं मया जितं' असा हा प्रश्न नाही. आम्ही तरी, नाहीं तर तुम्ही तरी असा हा प्रश्न नाहीं. तुम्ही आम्ही सारे एकत्र येऊं या. सारे अहिंसक आहोंत. अहिंसेवर सद्य: परिस्थितीत तरी विश्वास राखणारे आहोंत. नवीन विचारप्रवाहांनाहि जवळ घेतलें पाहिजे. नवीन पाणी नदीला मिळणार नाहीं तर नदी सुकून जाईल. हिमालयांतून गंगेला नवीन पाणी मिळत असतें. हें नवीन पाणी लाल दिसते क्षणभर. परन्तु घाबरूं नका. तें पाणी क्षणांत निर्मळ होईल. आचार्य प्रफुल्लचंद्र रॉय व रवींद्रनाथ यांनी महात्माजींस व राष्ट्रपतींस प्रार्थिलें आहे कीं, 'समक्ष भेटा, पत्रापत्री नको. आणीबाणीचे वेळी भेद दुर्लघ्य करूं नका.' एक थोर शास्त्रज्ञ व महान् कवि - यांची ही प्रार्थना का फोल होईल? रवीन्द्रनाथांनी मुलाखतींत सांगितले कीं, 'महात्माजींच्या निशाणाभोंवतीं निष्ठेनें सारे उभे रहा. आजची वेळ ओळखा. भ्रामक भेद निर्मू नका.' पंडित जवाहिरलाल नेहरू राष्ट्रपतींस भेटावयास गेले आहेत असें कळतें. प्रकरण चिडणार नाहीं अशी आशा करूं या. निरोगी शरीरांतील जखम पटकन् भरून येते. काँग्रेससारख्या प्रतिदिन वाढणा-या बलवंत संस्थेतील जखमा पटकन् भरून येतील यांत संशय नाहीं.