१२ 'गोमातेची थोरवी'

हिंदुमात्रांस गायीसारखी अन्य पवित्र वस्तु काय आहे?  या भारत वर्षांत प्राचीन काळापासून गोमाता वंद्य व पवित्र मानली गेली आहे.  ऋग्वेदांत निरनिराळया प्रार्थनांतून हे देवा!  तू आमच्या गायी सुखरूप ठेव असें मागितलेलें आहे.  ऋग्वेदांत गाय ही परमपूज्य मानली गेली आहे.  ऋग्वेदाच्या आठव्या मंडळांत १०१ या सूक्तांत गोमातेचें फारच उदात्त वर्णन केलें आहे.

माता रुद्राणां दुहिता वसूनां स्वसादित्यानाम् अमृतस्य नाभि :।
प्रनुवोचं चिंकितुषे जनाय मा गामनागां अदितिं वधिष्ठ ॥
वचोविदं वाचमुदीरयंतीं विश्वाभि :  धीर्भि :ऊपतिष्ठमानाम् ।
देवीं देवेभ्य: पर्येयुषीं गां आ मावृक्त मर्त्यो दभ्रचेता: ॥१॥

अर्थ :-- गायत्री ही रुद्र देवांची माता आहे, वसूंची कन्या आहे, ती आदित्याची बहीण आहे;  अमृताचें स्थान आहे; मी विचारी माणसांस प्रार्थून सांगतों कीं, या निष्पाप गायीस कधीं मारूं नका.

वाणी जाणणारी, वाणी बोलणारी, अनेक स्तोत्रांनी स्तविली जाणारी, देवांच्याजवळ वास करणारी अशी जी ही गोमाता तिला अल्पमति मानवानें छळूं नये.

ज्या सूक्तांत वरील सुंदर ऋचा आहेत, तें सूक्त भृगुकुलोत्पन्न जमदग्नि ऋषींचे आहे.  या ऋषीनें गोमातेला जास्त पूज्यता प्राप्त करून दिली असेल.

आर्य लोकांचें प्राचीन काळांतील धन म्हणजे गाय हेंच असे.  त्यांनीं गायीचे दूध प्यावें, गायीचें तूप खावें व आरोग्यसंपन्न राहावें.  धर्मकार्यांतसुध्दां दुधाला तुपाला याचमुळें महत्त्व आलें.  देवाला यज्ञांमध्यें घृताची आहुति द्यावयाची असें ठरलें.

गायीला कामधेनु हें नांव पडलें.  खरोखर गाय काय देत नाहीं?  ती आपलीं शेतें नांगरण्यास खोंड देते, शेतें पिकण्यास शेणाचें, मूत्राचें खत देते.  गोमूत्रासारखें रोगहारक अन्य काय आहे? द्राक्षाच्या वेलीवर कीड पडली तर गोमूत्र शिंपडून त्याचा नाश होतो.

गोमूत्र हें उत्कृष्ट खत आहे.  गोमूत्राची महती आपल्या पूर्वजांना माहीत होती.  श्रावणीच्या वेळेस गोमूत्र प्राशन करावयाचें असतें ; सुतक किंवा सोहेर जावयाच्या वेळेस गोमूत्र आणून शिंपडावें लागतें.  गोमूत्रापासून अनेक तेलें वगैरे काढतां येतील असें शास्त्रज्ञ म्हणतात ; गायींच्या केंसांत विद्युत् फार आहे.  विशेषत: तिच्या शेंपटीच्या झुबक्यांत विद्युत तीव्रपणें वास करिते;  म्हणून पुष्कळ जुन्या धर्मशील बायका सकाळीं गोमातेस वंदन करून तिच्या शेपटीस आपल्या तोंडावर फिरवितात व स्वत:स पवित्र समजतात.  गायींचे दूध अत्यंत मधुर व आरोग्यदायक आहे.  तें पचण्यास सोपें व बुध्दिवर्धक आहे.  बंगालमध्यें म्हशीचें दूध पिणें कसेंसेंच समजतात.  तिकडे गायीचेंच दूध पिण्यांत येतें.  अशी ही गाय आहे.  दूध देणारी, रोग हरणारी, शेतेंभतें खताने व बैल देऊन पुष्ट करणारी ती आहे.  तिच्यामुळेंच आर्य जगूं शकले.  या कृषिप्रधान देशांत गायींवाचून आमचें कसें चालणार म्हणून गाय ही देवता झाली;  गायीस पवित्रपणा प्राप्त झाला.  तिच्या सर्व शरीरांत देवतांची वस्ति आहे असें मानलें गेलें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel