बंधूंनो, तो म्हशीचा हेला नका आतां मारूं ; हृदयांतील व समाजांतील हेले दूर करा. ज्यानें मनांतील लोभ दूर केला तोच निर्लोभ व निर्भय वीर बाहेरचा हेलाहि दूर करूं शकतो. महात्माजींनींहि मनांतील हेले मारीत मारीत बाहेरचे सामाजिक व राजकीय पध्दतीचे हेले दूर करण्याचें बळ मिळविलें.
जगांतील साम्राज्यशाह्या म्हणजे बाहेरचा हेला. गरिबांवर या साम्राज्यशाह्या डोळे वटारतात, शिंगे उगारतात; गरिबांचे संसार धुळींत मिळवितात. तसेच भांडवलशाही, अमुक वर्ण श्रेष्ठ तमुक श्रेष्ठ असली भांडवलशाही, याहि हेले पध्दतीच. या नष्ट करण्यासाठीं जो उठेल त्याला हेला मारण्यांतील अर्थ समजला. हिंदी जनतेला हे आसुरी पध्दतीचे राजकीय व सामाजिक हेले दूर करावयाचे असतील तर मनांत निर्भय व नि:स्वार्थ होऊन उठावें. आपसांतील भांडणे दूर करून उठावें. नि:स्वार्थ वीरांचाच संघ विजयी होऊं शकतो.
जहागिरदार संस्थानिक हे हेले मारतात. परंतु स्वत:च्या प्रजेला ते छळतील तर त्यांची राजवट, म्हणजेच हेल्यासारखी होते. या संस्थानिकांनी, श्रीमंतांनी म्हशीचे हेले न मारतां, आपली जुलमी सत्ता नष्ट करावी, किसान कामगारांचे कल्याण करावें, स्वत:चे कामक्रोध, लोभ, मत्सर कमी करावे. असें ते करतील तरच खरी विजयादशमी, तरच खरें सीमोल्लंघन. सीमोल्लंघन केल्याशिवाय विजय नाहीं. प्रांतांनी प्रांताबाहेर, देशांनी देशाबाहेर पाहिल्याशिवाय जगांतील परिस्थिति, विचार-वारे समजल्याशिवाय कसा विजय मिळेल? दुसरें पहावयास शिकलें पाहिजे. मनुष्य आपलें घर, आपला देह, आपला संसार, स्वत:ची सुख-दु:खें यांच्या पलीकडे न पाहील तर कोठला विजय?
मी माझ्या लहानग्या संसाराची सीमा ओलांडून पलीकडे असणारें लाखें बंधू-भगिनींचे संसार पाहिले पाहिजेत. माझ्या डबक्यांतून मी मधून मधून नदींत व मधून मधून सागरांत गेलें पाहिजे; विशाल दृष्टीचें झाले पाहिजे. हिंदूंनी हिंदुत्वाची सीमा ओलांडून मुसलमान बंधूंशी जावें स्पृश्यांनी अस्पृश्यांजवळ जावें, जरा सीमा ओलांडा. दुस-याला हृदयाशीं धरा. माझे दोन भाऊ आहेत. मरतांना या दोहोंचे २०० तरी मी केले असतील, माझे बंधुत्वाचें नातें अनेकांशी जोडलें असेल तर मी सीमा ओलांडली. आपल्या जातीबाहेरचे, या आपल्या धर्माबाहेरचे किती नवीन मित्र जोडले, किती सीमा ओलांडली, तें दर वर्षी माणसानें पहावें. ज्याच्या ज्याच्याबद्दल दुजाभाव वाटतो, त्याचेजवळ जाऊन म्हणावें '' सहनाववतु सहनौ भुनक्तु '' ये एकत्र राहूं, एकत्र खाऊं, एकत्र शिकूं, जगांत खरी शांति आणूं. जीवनाची संकुचित सीमा ओलांडून जो असा दरसाल, दरदिन, दरघडी पुढें जातों, तो विजयी होतो. त्याला शत्रूच शेवटीं रहात नाहीं. त्याला व्यक्ति शत्रु नाहींत. सामाजिक, राजकीय जुलमी पध्दति एवढाच मग त्यास शत्रू उरतो व त्यावरहि तो विजय मिळवितो. हें खरें सीमोल्लंघन करूं या, विजय मिळवूं या. विजया-दशमीसच काँग्रेसनें लढा पुकारण्याचे ठरविलें आहे. काँग्रेसमंत्री राजीनामे देणार. पुढें लढा पेटला तर सारे तयार रहा. भांडणें मिटवून, स्पृश्यास्पृश्य भेद दूर करून, हृदयांतील स्वार्थ-मत्सर कमी करून या जगांतील साम्राज्यशाहीरूप हेले दूर करण्यासाठी तिरंगी झेंडयाखालीं एक आवाजानें उभे राहूं या.
-- वर्ष २, अंक ३०