चित्र :-- तीन फणांचा एक सर्प.  मधली फणा साम्राज्य सरकारची.  एका बाजूची भांडवलवाल्यांची, दुसरी बाजूची धर्माच्या गप्पा मारणारांची. 

हे पाहा भयंकर चित्र.   हा विषारी साप फुस्फुस करीत आहे.  कोणावर फूत्कार करतो?  गरिबांवर, श्रमणा-या जनतेवर.  हा मधला साप म्हणजे कलेक्टर, गव्हर्नर वगैरे.  हा सरकारी साप.  परन्तु या सापाला दुसरे साथ देतात.  ही भांडवलवाल्यांची फणा.  हे सरकारच्या पाठीशीं असतात.  कलेक्टर, प्रांत यांना ते पानसुपा-या करतील.  कोणा सावकारानें शेतक-याला केली का पानसुपारी?   कामक-यांनी संप केला कीं, मालकाचे संरक्षण करायला सा-या फौजा उभ्या राहतील.  मालकहि सरकारला कर्ज देतो, मदत करतो.  आणि ही तिसरी फणा धर्माच्या नांवाने भुलवणा-यांची.  हे सांगतात, 'श्रीमंतानें पूर्वजन्मी पुण्य केलें म्हणून तो गादीवर, तूं पाप केलंस म्हणून दु:खांत. '  असला चावटपणा हे चालवितात.  रात्रंदिवस उन्हातान्हांत कष्ट करणारा तो का पांपी?  त्याच्या घामाचा एक थेंब या सर्व शेठजींना उध्दरील.  परन्तु ही पवित्र धर्मगंगा त्यांना पापाची वाटते.  गादीवर लोळणारा ऐतोबा पुण्यवान आणि श्रमानें जगणारा म्हणे पापी!  असा हा तीन फणी साप आहे.  या सापाला पकडावयाचें असेल तर शहाणे व्हा.  जगाचा इतिहास शिका.  लिहा, वाचा.  तुमच्या हातांत ज्ञान आलें म्हणजे हा साप पकडतां येईल.  मग त्याचे विषारी दांत काढून घेऊं.  गारुडी सापाला निर्विष करून त्याचा खेळ करतो.  आपणांस साप मारावयाचे नाहींत.  त्यांना निर्विष करावयाचें आहे.  समजलें ना ?

चित्र :-- एक उसाच्या गु-हाळासारखें चित्र.  चरकांतून माणसें चिपाडाप्रमाणे होऊन बाहेर पडत आहेत.

हें चित्र पहा व रडा.  हें गोड गु-हाळ नव्हें.  हें जीवन-मरणाचे गु-हाळ आहे.   यांत माणसें पिळली जातात.  शेतक-यांत, कामक-यांत त्राण राहिलें नाहीं.  आपल्यामधील एक चांभार कामगार रक्त ओकला.  पुन्हां दोन दिवस गेल्यावर कामावर गेला.  पुन्हां रक्ताची गुळणी.  कोठें जाणार तो?  कामावर न जाईल तर खाईल काय?  कामगारांनी युनियनमार्फत २५ रु. देऊन त्यास नाशिकला जा सांगितलें.  परन्तु गरीब कामगार किती देणार?  हें मालकाचे काम आहे.  कामगारांचे मायबाप त्यांनी झालें पाहिजे.  ती कृतज्ञता आहे.  परन्तु आज कोण लक्ष देतो!  हिंदुस्थानांत अशी ही भेसूर हिंसा चालली आहे.  ही केव्हा थांबणार?

चित्र
:-- एक मुलगा पतंग उडवूं बघत आहे  परन्तु त्याला एक भलें मोठें वजन त्यानें बांधलें असल्यामुळे पतंग उडत नाहीं.

या चित्राचा समजला का अर्थ?  मुलग्याचा पतंग उडेल का?  पतंगाला रंगीत कागद, नीट मांजा, सारें आहे.  परन्तु हें अदमणाचें वजन जर त्याच्या शेंपटीला बांधले तर पतंग कसा उडेल?  त्याप्रमाणें आपल्या देशाची मान उंच व्हावी, देश वर जावा, म्हणून कितीहि खटपटी केल्या तरी अज्ञानाचें दडपण जोंपर्यंत प्रत्येकाच्या मानेवर आहे, तोपर्यंत देश कसा वर जाईल?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel