प्रश्न :-- मग तुम्ही तरी कां टीका करतां काँग्रेसवर?
उत्तर :-- मंत्रि जेवढें करीत आहेत तेवढयानें आमचें समाधान नाहीं, हें जाहीर केलेंच पाहिजे.  नाहीं तर गव्हर्नर म्हणावयाचे कीं, लोक अगदीं खुशींत आहेत. आम्हांला अधिक पाहिजे, मंत्र्यांनी त्यासाठीं भांडावें, आम्ही सत्याग्रहास तयार आहोंत, असें आपण जगाला जाहीर केलें पाहिजे आणि तयारी करीत राहिलें पाहिजे.  म्हणजे मंत्र्यांचे हातहि तिकडे बळकट होतात.  तेहि सावकारांस सांगतील, 'एवढें साधें करतों तर टीका करतां.  शेतकरी तर आणखी मागत आहे.  तेव्हां आम्ही म्हणतों एवढयासाठीं तरी कबूल व्हा.'  असें असतें हें.  त्यांत का काँग्रेसवर राग असतो?

प्रश्न :-- समजलें आम्हांला.  आपली मागणी सारखी ठेवली पाहिजे.  मनांत प्रेम ठेवून बाहेर राग दाखविला पाहिजे.  आम्हीं तयारीहि सत्याग्रहाची ठेवली पाहिजे.
उत्तर :-- तयारी करा.  चुलीवर पाणी ठेवलें, परन्तु खालीं जाळ नसेल तर पाण्याला कढ येईल का, भात शिजेल काय?  त्याप्रमाणें नुसते काँग्रेस मंत्री काय करतील?  गांवे संघटित करा.  गांवांत सेवा-मंडळें स्थापा.  गांव स्वच्छ करा.  गांव साक्षर करा.  गांवांत तरुणांनी एकी करावी.  भेदभाव मोडावे.  गुंडगिरी दूर करावी.  सेवेनें लोकांची मनें वेधावी.  गांवांत कॉलरा येऊ देऊं नये.  आजा-यास मदत करावी.  विहिरीजवळ स्वच्छता करा.  खताचे नीट खड्डे खणा.  विष्टेवर नीट माती टाका.  गांवात रहाट चालवा.  कपडा करा.  आळस नको.  झेंडावंदन करा.  कवाईत शिका.  हजारोंनी काँ.चे सभासद व्हा.  मधून मधून या गांवाहून त्या गांवाला गाणीं गात मिरवणुका न्या.  गाणें, पोवाडें शिका.  अशा रीतीनें जागृति आणा.  असा खालून जाळ पेटवतांच, खेडींपाडीं जागृत होऊं लागलीं म्हणजे मग वर कढ येईल, आधण येईल; भात शिजूं लागेल.  रस्ते दुरुस्त होतील.  सरकारचे खर्च कमी करून, सत्ता हातीं घेऊन, लष्कर ताब्यांत घेऊन, तुमच्या सुखासाठी पैसे दिल्लीहून आणतां येतील.  खरें ना?

प्रश्न
:-- हो आम्ही सारें करूं.  एक काँग्रेस ओळखूं.  तीच शेवटीं करील सारें. आजपर्यंत दीडशें वर्षांत कोणी कर्जबिल आणलें नाहीं, खंडकरी बिल आणलें नाही.  दारूबंदी हातीं घेतली नाहीं, शिक्षणाला चालना दिली नाहीं.  जय काँग्रेस आई - तुला मत देऊं, तुझे गाणें गाऊं, तुझें नांव घेऊं, तुला प्राण देऊं, सारें तुझ्यासाठी.  परंतु खरेंच निवडणूक होईल काय?    
उत्तर :-- काँग्रेस तर लढयासाठीं उत्सुक आहे.  अमदाबादला वल्लभ-भाई परवां म्हणाले, 'जर पुढील वर्षी दिल्लीहून दारूबंदीसाठीं आम्हांस दीडदोन कोटी रुपये मिळणार नाहींत तर आम्ही मंत्रिपदें झुगारून देऊं.  सत्याग्रह करूं.  कदाचित् सत्याग्रह सुरू करूं किंवा जनतेचा काँग्रेसवरच विश्वास आहे, तिचा कार्यक्रम मान्य आहे, हें दाखविण्यासाठी पुन्हां निवडणुका लढवूं.  जर निवडणूक झाली तर तुमच्यासाठीं कायदे करणा-या काँग्रेसचा द्वेष करणा-या कोणाला एक तरी मत द्याल का? '

प्रश्न
:-- नाहीं.  नाहीं.  शेतकरी, कामकरी आतां बावळट राहणार नाहीं.  धर्माच्या नांवाने गप्पा मारून, गरिबांस शेवटीं दरिद्री ठेवूं पाहणा-या वरिष्ठांच्या नादीं लागणार नाहीं.  खरा धर्म म्हणजे जनतेस सुखी करणें, गरिबांस सुखी ठेवणें.  असें नाही का?
उत्तर :--  होय. तुकाराम महाराजांनी म्हटलें आहे, 'जे का रंजले गांजले ।  त्यासी म्हणे जो आपुले ॥  देव तेथेंची जाणावा ।  तोचि साधु ओळखावा ॥'
कोटयवधि लोकांच्या पोटांत पुरेसें अन्न नाहीं.  अंगावर नीट कपडा नाहीं.  अशांचे संसार सुखाचे करणें हा पहिला महान् धर्म आहे.  महाभारतांत भीष्मांनी सांगितलें आहे.   ' दरिद्रान् भर कौंतेय ' अरे धर्मराजा, आधीं गरिबांची काळजी घे.  श्रमजीवी जनतेच्या पोटाला अन्न दे, अंगाला वस्त्र व रहायला घर दे, मुलाबाळांस ज्ञान दे.  सर्वांना माणुसकी दे.  असा हा धर्म या ख-या धर्माला विसरूं नका.  काँग्रेसची संघटना वडाच्या प्रचंड वृक्षाप्रमाणें वाढवा.  पाळेंमुळें सर्वत्र खोल जाऊं देत.  म्हणजे ती छाया देईल.

--वर्ष २, अंक १७.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel