२७ विद्यार्थी परिषद
वरील विद्यार्थी परिषद् ठाणें येथें ता. ३ व ४ नोव्हेंबर रोजीं काँ. मीनाक्षी क-हाडकर यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. सभेचें उद्धाटन श्री साने गुरुजी यांनी केलें. उद्धाटन प्रसंगी साने गुरुजी यांनी केलेलें भाषण खाली दिलें आहे :
विद्यार्थ्यांनों, तुमच्या या परिषदेचें उद्धाटन करण्यासाठीं तुम्ही मला बोलावलें आहे. शाळा व विद्यार्थी यांचा संबंध सोडून मला बरेच दिवस झाले. मी अलिकडे खानदेशांत शेतक-यांमध्यें व कामगारांमध्यें काम करीत असतों.
शेतक-यांत हिंडणा-या माणसाला तुम्ही आज विद्यार्थ्यांच्या या मेळाव्यांत बोलावून आणलें याचा अर्थ काय? याचा अर्थ हाच कीं, विद्यार्थी व किसान हे राष्ट्राचे महत्त्वाचे दोन घटक कांही तरी तसाच महत्त्वाचा संबंध असल्यामुळे एकत्र जोडले आहेत. दोघांच्या ऐक्याचा, एकजुटीचा सांधा आज दाबला जात आहे.
आजची वेळ मोठी आणिबाणीची आहे. आज महत्त्वाचे प्रश्न आपल्या समोर उभे राहिले आहेत. विद्यार्थी चळवळ व विद्यार्थी संघ अजून बाल्यावस्थेत आहेत. १९३३ नंतर हिंदुस्थानांत ही चळवळ सुरू झाली व आतां जिल्ह्यांत ऑ.इं.स्टू.फे. च्या शाखा पसरल्या आहेत व याचेंच प्रत्यंतर म्हणजे आजची ठाणें व कुलाबा जिल्ह्यांतील विद्यार्थांची ही संयुक्त परिषद होय.
विद्यार्थी परिषदांवर नेहमी आक्षेप घेण्यांत येतो कीं, या परिषदा म्हणजे विद्यार्थ्यांच्या मौल्यवान काळाचा व श्रमाचा अपव्यय होय. समाजाच्या प्रश्नांशी आपला संबंध जोडणें हेंच खरें शिक्षण होय. शाळेतींल शिक्षण हें अपुरें शिक्षण आहे. जगांतील अत्यंत पुढारलेले विचार आज विद्यार्थ्यांपुढे येत नाहींत ते येणे अवश्य आहे. विद्यार्थी परिषदेचें महत्त्व या दृष्टीने अतिशय आहे. खरें शिक्षण कोणतें या बाबतींत एका वंदनीय समाजसेवकानें दिलेलें उत्तर मी जन्मांत विसरणार नाहीं. त्रिखण्ड जगाचा प्रवास करून हिंदुस्थानांत आल्यावर गु. अण्णासाहेब कर्वे यांनीं मिठाच्या सत्याग्रहाचें एक दृश्य पाहिलें. ते म्हणाले, ''आज माझ्या डोळयांचे पारणें फिटलें. शिक्षणाचें उद्दिष्ट म्हणजे आत्म्याची जागृति करणें. तें ह्या सामुदायिक सत्याग्रहानें सफळ झालें आहे!'' शिक्षण तेंच कीं जें आपणाला जनतेच्या सुखदु:खात एकरूप करील. शाळेंतील शिक्षणांतून जेवढें घेता येईल तेवढें घ्या आणि बाकीच्या शिक्षणासाठीं, आत्म्याच्या भुकेच्या समाधानासाठीं समाजाकडे पहा दुस-याचीं सुखदु:खें जाणून घ्या. स्वत:च्या सुखदु:खाबरोबर दुस-याच्या सुखदु:खाची कल्पना असणें हें विद्यार्थ्यांना आवश्यक आहे. आणि बाकीच्या गोष्टी दूर ठेवा, समाजांत जास्तीत जास्त मिसळा. तुम्हाला नवे नवे अनुभव येतील. चोर देखील समाजाचा उपकारकर्ता आहे. तो श्रीमंताच्या घरची घाण चव्हाटयावर आणतो. श्रम न करतां सांठविलेलें धन ही घाणच नाहीं तर दुसरें काय?