त्या काळी युरोपियन न्यायाधीशास मदत करण्यासाठी म्हणून इतर पंडित व काजी सरकारकडून निवडले जात. हिंदुधर्मशास्त्रातील सर्व गोष्टींचा ज्याने सूक्ष्म अभ्यास केला असेल असा गृहस्थ हिंदू-कायद्यासंबंधी वरील युरोपियन न्यायाधीशास साहाय्य करण्यासाठी, सर्व मुद्दे विशद करण्यासाठी नेमला जाई. बहुत करून संस्कृत महाविद्यालयातूनच सदरहू गृहस्थाची योजना होत असे. यासाठी धर्मशास्त्राची मुद्दाम परीक्षा घेण्यात येई. व्याकरण, वाङमय, साहित्यशास्त्र, न्याय, वेदांत या शास्त्रांत जो उत्तीर्ण झाला असेल त्यासच या धर्मशास्त्रातील परीक्षेस बसण्याचा परवाना मिळे. अन्यत्रांस तेथे मज्जाव होता. परंतु ईश्वरचंद्रांस मुद्दाम परवानगी मिळाली. ते अद्याप न्याय व वेदांत या परीक्षांत उत्तीर्ण झाले नव्हते. तरीसुद्धा अलौकिक बुद्धिमत्ता असल्यामुळे त्यास या परीक्षेस बसण्यास परवानगी मिळाली. या परीक्षेत ईश्वरचंद्रांस नेहमीप्रमाणे पहिल्या दर्जाचे यश लाभणार नाही अशी पुष्कळांची अटकळ होती. ही परीक्षा फार कठीण असे आणि अगदी थोडे विद्यार्थी तीत यशस्वी होत. परंतु ईश्वरचंद्र परीक्षेच्या काठिण्याने डगमगणारे नव्हते. कठीण गोष्ट साध्य करून घेण्यात खरे पौरुष व कसोटी आहे हे ते जाणून होते. मनुसंहिता, मिताक्षरी, दायभाग वगैरे सर्व धर्मशास्त्रांवरील अधियुक्त ग्रंथांचे त्यांनी मार्मिक परिशीलन केले. आणि त्यांच्या प्रयत्नाचे फळ परमेश्वराने त्यांस दिले. या दिव्यातून दिव्य यशाने ईश्वरचंद्र उत्तीर्ण झाले. परीक्षकांनी त्यांचा गौरव केला. ही दुःसाध्य परीक्षा या १७ वर्षांच्या मुलाने कशी दिली याचे पुष्कळांस राहून राहून आश्चर्य वाटले. या वेळेसच त्यास सरकार न्यायाधीशपंडित ही जागा देत होते, परंतु ठाकुरदास यांनी ईश्वरचंद्रास संमती दिली नाही. अद्याप लहान असल्यामुळे आपल्या मुलाने आपल्यापासून दूर जाऊ नये असे पित्यास वाटे. यासाठी विद्यासागर यांनी सरकारी निमंत्रण स्वीकारले नाही.
१९ व्या वर्षी वेदांताचा अभ्यास करण्यास विद्यासागर यांनी आरंभ केला. नेहमीची वार्षिक परीक्षेची वेळ आली. इतर प्रश्नपत्रिका लिहून झाल्या. आज निबंधलेखनाची परीक्षा होती. परंतु परीक्षामंडपात ईश्वरचंद्र दिसत नव्हते. ‘आजच्या परीक्षेस ईश्वर का बरे हजर नाही? तो आजारी आहे का?’ वगैरे गुरुजन पृच्छा करू लागले. चौकशी करता करता महाविद्यालयाच्या ओट्यावर ईश्वर काही तरी लिहीत बसलेला त्याच्या शिक्षकांस दिसला. परीक्षेच्या ठिकाणी त्यास बळेच ओढून नेण्यात आले. “मला उत्तम संस्कृत लिहिता यावयाचे नाही, मग उगीच मी कशास येऊ?” असे ईश्वरचंद्र म्हणत होते. “वेडा कुठला! चल लवकर, आणि प्रश्नपत्रिका लिहावयास लाग. तुझ्यापेक्षा मला तुझी जास्त परीक्षा आहे.” असे गुरुजींनी जरा रागाने व प्रेमाने सांगितल्यावर विद्यासागर लिहावयास बसले. विद्यासागर विनयाचे आगर होते. त्यास आत्मविश्वास नव्हता. त्यांचा निबंध सर्वोत्कृष्ट ठरला. त्यांच्या निबंधाची भाषा प्रौढ व सुंदर होती. तर्कपद्धती निर्दोष व समर्पक होती. त्यास या निबंधाबद्दल शंभर रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. यानंतर काव्यरचनेची चढाओढ लावण्यात आली. त्यातही ईश्वरचंद्र यांचे काव्य उत्तम ठरले व त्यास शंभर रुपयांचे दुसरे पारितोषिक मिळाले. वेदांताचा अभ्यास झाल्यावर त्यांनी सर्व षट्शास्त्रांचा-षड्दर्शनांचा अभ्यास करण्यास आरंभ केला. वार्षिक परीक्षेत सर्व विद्यार्थ्यांत ते पहिले आले व या वर्षीही कवितेबद्दल त्यास रुपये १००/- बक्षिस मिळाले. यावर्षी त्यास तात्पुरते व्याकरण विषयाचे अध्यापन दोन महिन्यांपर्यंत देण्यात आले. हा मिळालेला पगार त्यांनी आपल्या वडिलांस यात्रा करण्यासाठी दिला. ज्या वडिलांनी पोटास चिमटा घेऊन, स्वतः उपासमार करून आपणास शिकविले, विद्यादान दिले, सुसंस्कृत होण्यास संधी दिली, त्या परमपूज्य पित्यास कृतज्ञतेने हे रुपये ८० देताना विद्यासागर यास किती धन्यता वाटली असेल! आणि दोन रुपये वेतनावरही संतुष्ट राहणार्या ठाकुरदासांस हे आपल्या मुलाने यात्रेसाठी दिलेले रुपये ८० पाहून किती कृतार्थता वाटली असेल, हे आम्ही शब्दाने कसे सांगणार? आपल्या हाताने झाड लावले; सर्व किड्ये-मुंगीपासून त्याचे रक्षण केले. गुरांनी खाऊ नये म्हणून त्यास कसे जपले; आणि त्या झाडाने रसाळ फळे आज दिली हे मनात आणून त्या माळ्यास किती आनंद होतो. तद्वतच आपल्या मुलाचे वृद्धिंगत होणारे यश पाहून ठाकुरदास यांस वाटले असेल. धन्य तो पिता आणि धन्य तो सुपुत्र, की जे आपआपली कर्तव्ये अशा उत्तम रीतीने पार पाडून जगास कित्ता घालून देतात. कर्तव्यविन्मुख होणार्या लोकांच्या डोळ्यांत अंजन घालणारे असे पुरुष पूज्य होत यात संशय नाही. पित्याने हे पैसे घेऊन मोठ्या आनंदाने यात्रा केल्या व ते परत घरी आले.