विद्यासागर विनोदाने म्हणाले, “पोलिसखात्यात असून असे सचोटीने वागता म्हणूनच तुमच्यावर किटाळ आले. पोलिसखात्यात सच्चा माणूस चोर ठरतो व चोर वर मान करून मिरवतो. आपणासारख्यांवर दोषारोप येणार नाही तर मग कोणावर येणार?” विद्यासागरांच्या बोलण्याची यथार्थता उभयतांस अर्थातच पटली. त्या दोघांस विद्यासागरांनी भोजनासाठी राहावयास आग्रह केला. नंतर दुपारी भोजन वगैरे होऊन मग हे उभयतां निघून गेले. असे विद्यासागर होते बरे! किती असे हरीचे लाल जगात असतील?
या सर्व गोष्टींपेक्षा हृदयास अत्यंत हलवून सोडणारी, मनास चटका लावणारी गोष्ट म्हणजे बंगालचे प्रसिद्ध राष्ट्रीय कवी मायकेल मधुसूदन व विद्यासागर यांच्या परस्पर संबंधाची होय. मायकेल हे प्रख्यात नाटककार व कवी. हे आपल्या वडिलांचे एकुलते एक मुलगे. जात्याच फार हुशार व तरतरीत. शाळेत असता भूदेव व मधुसूदन हे एका वर्गात असावयाचे. परंतु सबंध विषयांच्या गुणांनी मायकेल पुढे यावयाचे. मिशनरी लोकांचा त्या वेळेस फार सुळसुळाट असे. त्यांच्या जाळ्यात अनेक लोक सापडत. एका मिशनरी गृहस्थाच्या मुलीवर मायकेलचे प्रेम जडले. ‘तू ख्रिश्चन झालास तर तुला ती मुलगी मिळेल’ असे त्यास स्पष्ट बजावण्यात आले. झाले. मनाचा विकार बलवत्तर असतो. मायकेल हिंदूचे ख्रिश्चन झाले. बापाने त्यास घरातून घालवून दिले. ‘एक पैही देणार नाही’ असे बापाने निक्षून सांगितले. एकुलता एक हुशार व सुंदर मुलगा. आईबापाचे हृदय कसे तिळतिळ तुटत असेल याची कल्पना आपणास कशी येईल? मायकेलने पुष्कळ अभ्यास केला. ते उत्कृष्ट इंग्रजी लिहीत. मद्रासला जाऊन त्यांनी काही दिवस वर्तमानपत्रही चालविले. पुढे ते सपत्नीक फ्रान्समध्ये गेले. फ्रान्समध्ये असता एकदा त्यांची फार विलक्षण स्थिती झाली. परक्या देशात पडलेले. ना स्नेही, ना सोबती. जवळचे द्रव्य सर्व संपलेले. मुलेबाळे भुकेने काहूर करताहेत, अशा वेळी परक्या देशात कोणाजवळ पैशाची याचना करावी? हिंदुस्थानात तरी कोणास पत्र लिहावे? बापाजवळ कुबेरासारखी संपत्ती आहे, परंतु त्यांच्याजवळ कोणत्या तोंडाने मागू असे विचार मनात येऊन मधुसूदन रडले. शेवटी मायकेलनी विद्यासागर यांस पत्र लिहिण्याचे ठरविले. विद्यासागर हे कनवाळू आहेत, दुःखितांची दुःखे व अश्रू नाहीसे करणारे आहेत, असे त्यांनी ऐकले होते. मायकेल मधुसूदन यांनी जे पत्र त्यांस लिहिले त्याचा सारांश असा-
‘दोन वर्षांपूर्वी मी तुम्हास सोडून इकडे आलो; त्या वेळेस माझे हृदय आशेने भरलेले होते; माझे मन खंबीर होते. मी धीराचा माणूस होतो, परंतु आज मी अगदी हतबल व निराश असा झालेला दुःखी प्राणी आहे, हे ऐकून तुम्हांस जबर धक्का बसेल. येथे पुष्कळ लोकांशी माझे संबंध आले. त्यांच्या निष्ठुर वागणुकीमुळे आज मी मोठ्या संकटात पडलो आहे. त्यांच्या वर्तणुकीचे कोडे हे मला तर उलगडत नाही आणि ज्या लोकांच्या असल्या वर्तणुकीने मी संकटात आलो, त्यातील एक तर माझा मित्र होता व माझ्यासाठी झटेल असे मला वाटत होते.
‘मला आज फ्रेंच लोकांच्या कारागृहात जाणे प्राप्त झाले आहे. माझी पत्नी आणि मुले-बाळे यांस उद्या एखाद्या अनाथालयात जाऊन आश्रयार्थ राहिले पाहिजे. हिंदुस्थानात रुपये ४,०००/- माझे येणे आहेत; परंतु आज माझ्या हातात तर कवडी नाही.