विद्वान व थोर टीकाकार माधवचार्य यांनी अशाच प्रकारची उपपत्ती दिली आहे. हेच श्लोक यत्किंचितही फरक न होता नारदसंहितेत पण आढळतात. तेथे तर पुनर्विवाह युक्त आहे असे सांगून नंतर वर सांगितलेल्या पाच आपत्तींसंबंधी काही नियमही दिले आहेत. उदाहरणार्थ, जर पती हरवला असेल तर ब्राह्मण स्त्रीने ८ वर्षे वाट पाहावी व पतिमार्गप्रतीक्षा करावी; त्या स्त्रीस मूलबाळ नसेल तर तिने चारच वर्षे वाट पाहावी. अशा प्रकारच्या नारदसंहितेतील श्लोकांवरून तर सर्वच असंदिग्धता मावळते. पंच आपत्तींत सापडलेल्या स्त्रीस पुनर्विवाह आहे आणि तो पुनः पूर्वी लग्न झालेल्या स्त्रीसच आहे. कारण लग्न झाल्याशिवाय मुलेबाळे कशी व्हावी? वरील नारदसंहितेत तर ‘नष्ट’ या पदाचा स्पष्टार्थ करताना ८ वर्षे, मूल नसेल तर ४ वर्षे स्त्रीने पतीच्या येण्याची वाट पाहावी असे स्वच्छ सांगितले आहे. एकंदरीत काय तर जुनी शास्त्र मंडळी सांगतात त्याप्रमाणे या वचनांचा अर्थ लागत नाही. बृहन्नारदीय व आदित्यपुराण यांत पुनर्विवाह स्पष्ट निषेधिला आहे, यांत शंका नाही. परंतु अशा मतभेदप्रकरणी ‘पुराणविरोधे स्मृतिप्रामाण्यं, स्मृतिविरोधे श्रुतिप्रामाण्यं’ असा न्याय आहे. पाराशरसंहिता हा स्मृतिग्रंथ आहे, बृहन्ननारदीय आणि आदित्यपुराण हे ग्रंथ पुराणात मोडतात. यास्तव पाराशरसंहितेस प्राधान्य प्राप्त होते.
न्यायतः, तर्कतः, सर्व जुन्या शास्त्रीमंडळींची तोंडे तर विद्यासागर यांनी बंद पाडली. परंतु ज्यांचा भर बुद्धियुक्त विवेचनावर नाही, तर्कप्राप्त व न्यायप्राप्त सिद्धांतावर नाही, ‘तर शेषं कोपेन पूरयेत्’ या न्यायाने जे वैयक्तिक निंदा, क्रोधयुक्त मर्म-वचनप्रहार हीच ज्यांची शस्त्रे आहेत, हाच ज्यांचा आधार त्या लोकांची मने संतुष्ट करावयाची कशी? त्या ज्ञानलवदुर्विदग्धांस, किंवा ज्ञानभरगर्वितांस शांत कसे करावयाचे हा प्रश्न आहेच. भल्याने होता होईतो त्यांचा मार्गात न जाणे हेच श्रेयस्कर.
विधवापुनर्विवाहावर विद्यासागर यांनी जे दोन ग्रंथ लिहिले, त्यामुळे सर्व बंगाली समाजात फार खळबळ उडाली. हळूहळू सुधारणा होत असते, हळूहळू अंधकारपटल दूर होऊन दिशा उजळू लागतात. विद्यासागर यांस कलकत्त्यातील काही वजनदार पुरुषांचा आधार मिळू लागला, ते विद्यासागर यांच्या विचारसरणीस उचलून धरू लागले.
आपल्या बालविधवा कन्यकांचे पुनर्विवाह करण्यास पुष्कळ आई-बाप तयार होऊ लागले. पुनर्विवाहास उचलून धरणार्यांनी, पुनर्विवाहाच्या कैवार्यांनी या कन्यकांस योग्य पती मिळवून देण्याची खटपट करणे अवश्य होते. या गोष्टीच्या आधी दुसरी एक महत्त्वाची गोष्ट करावयास पाहिजे होती. ती म्हणजे अशा पुनर्विवाहित स्त्रीपासून जी संतती होईल ती कायदेशीर व सशास्त्र मानली जावी. असा कायदा करणे म्हणजे जुन्या कायद्यात फरक करणे. २५,००० लोकांच्या सहीचा अर्ज विद्यासागर यांनी सरकारकडे पाठविला. ‘विधवाविवाह कायदेशीर समजला जावा व एतदर्थ सरकारने कायदा करावा,’ असे यात मागणे केले होते. या सह्या मिळविण्यास विद्यासागर यांस किती कष्ट व दगदग पडली असेल याची आपणास कल्पना होणार नाही. कारण जुन्या परंपरेने, रूढीस अनुसरून वागणारे जेथे शेकडा ९९।।। लोक तेथे २५,००० सह्या मिळविणे फार सुदुर्घट काम होते. परंतु प्रयत्नांस काय अलभ्य आहे? प्रयत्नांति परमेश्वर मिळतो; प्रयत्नाने नराचा नारायण होतो; प्रयत्नाने सर्व साध्य होते. श्रद्धा व निष्ठा ठेवून प्रयत्न करा की यशसिद्धी झालीच समजा. बरद्वानचे महाराज यांनी जेव्हा या पुनर्विवाहास संमती दिली, आणि विद्यासागर यांचे प्रयत्न प्रसंशिले, तेव्हा तर विद्यासागर यांस पराकाष्ठेचा आनंद झाला. आनंदास आकाश ठेंगणे झाले. विद्यासागर यांनी ऑनरेबल जे. पी. ग्रँट यांस एक पत्र लिहिले व त्या पत्रात त्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.