वरीलप्रमाणे पापापासून दूर दूर राहावे, अलिप्त असावे याविषयी विद्यासागरांचा मोठा कटाक्ष. पुण्याजवळ परमेश्वर असतो; पावित्र्याजवळ परमेश्वर असतो; ते जेथे असेल तेथे ते जात. जेथे दुःख, दारिद्र्य आहे तेथे ते जात; परंतु जेथे घाण तेथे त्यांचा प्राण कासावीस होई. पापाशी संपर्क येऊ नये म्हणून आईबाप, आपली जन्मभूमी, आपले भाऊ, आपली पत्नी, आपला एकुलता एक मुलगा, आपले जिवलग स्नेही सर्वांचे संबंध सोडण्यास तोडण्यास ते कष्टाने तयार झाले. ‘सर्वांचा वियोग मी सहन करीन; परंतु पुण्यवृत्तीचा वियोग मी सहन करणार नाही.’ असे ते मनात म्हणावयाचे. त्यांच्या मनाची थोरवी मी क्षुद्रमती किती सांगणार?
विद्यासागर यांची मातृपितृभक्ती अलौकिक, अवर्णनीय होती. त्यासंबंधी पुष्कळ उल्लेख मागे आले आहेत. पुंडलिकाने आईबापांची सेवा करीत असता भेटीस आलेल्या पांडुरंगाला उभे राहावयास वीट दिली व आपण स्वतः आईबापांचे चरण चुरीतच राहिला; तसेच विद्यासागरांचे. आईबापांपेक्षा थोर अशी अन्य दैवते जगात कोठे आहेत? आईच्या शब्दांप्रमाणे वागता यावे म्हणून विद्यासागरांनी नोकरीवर पाणी सोडले; नावाडी पाण्यात नौका लोटण्यास धजावत नसता भरदुथडी भरलेल्या दामोदर नदीत त्यांनी स्वतःचे शरीर आईचे नाव घेऊन निःशंकपणे फेकले; तेव्हा त्यांची मातृभक्ती व पितृभक्ती कोणत्या प्रतीची होती ते वाचकांनी मनात ठरवावे.
विद्यासागर यांनी पुनर्विवाहाची चळवळ केली, तिला त्यांच्या आई-बापांचे पाठबळ होते. ज्या वेळेस विधवाविवाहावरील आपला ग्रंथ विद्यासागरांस प्रसिद्ध करावयाचा होता, त्या वेळेस ते आपल्या वडिलांकडे गेले व म्हणाले, “मी हा ग्रंथ प्रसिद्ध करू का? आपण खिन्न व नाराज होणार नाही ना?” “समज, मी परवानगी दिली नाही, तर तू आपला ग्रंथ प्रकाशित करशील का?” असे ठाकुरदासांनी विचारले. “छेः कालत्रयीही अशी गोष्ट माझ्या हातून होणार नाही, मी माझा ग्रंथ तसाच ठेवीन व मग केव्हा तरी प्रसिद्ध करीन.” विद्यासागरांचे हे विनयशील बोलणे व भक्तिपूर्ण उत्तर ऐकून ठाकुरदास प्रसन्न झाले व त्यांनी ते पुस्तक प्रसिद्ध करण्यास परवानगी दिली. नंतर विद्यासागर आईकडे गेले व म्हणाले, “आई, हे मी पुस्तक प्रसिद्ध केले, तर मी अधर्मी आहे असे तर नाही ना तुला वाटणार? तुला त्या योगे दुःख नाही ना होणार? तुला आनंद होत असेल, तू अनुज्ञा दिलीस, तर मी हे पुस्तक प्रसिद्ध करीन.” मुलाचे म्हणणे ऐकून आईचेच हृदय ते, भरून आले. विद्यासागरांची आई प्रेमाची मूर्ती होती. भूतदयेची सिंधू होती. ती फार विचारी होती. विवेकास पटेल तेच ती करी. मूर्तिपूजा वगैरे तिला आवडत नसे. ती ब्राह्मो नव्हती; परंतु तिच्या माहेरी मोठमोठे पंडित झालेले यामुळे तिची बुद्धी सूक्ष्म व कुशाग्र होती. अर्थात तिने मोठ्या प्रेमाने मुलास परवानगी दिली व म्हणाली, “तुझ्या करण्याला माझे मनापासून अनुमोदन आहे. ज्यांचे जीवित केवळ कष्टमय आहे, एकेक दिवस ज्यांस युगाप्रमाणे वाटतो, ज्यांची सर्वांनी विटंबना करावी, हेटाळणी करावी, ज्यांचे मुखावलोकन करणे म्हणजे अपशकून समजण्यात येतो, मरेपर्यंत ज्यांस अश्रू ढाळावे लागातात, जे कधी खळत नाहीत, जे पुसून टाकण्यास कोणी सहृदय मनुष्य नाही, सुखाचा गोड शब्द ज्यांस ऐकावयास मिळत नाही, सुखाचा गोड घास ज्यांस खावयास मिळत नाही, कामाचे डोंगर ज्यांनी उचलावे, परंतु फुकाचे ‘दमलात हो’ असे ज्यांस कोणी म्हणावयाचे नाही, ज्यांस भविष्यकाळ व वर्तमानकाळ म्हणजे निराशा व दैन्य यांनीच भरलेला दिसतो, नेहमी दुसऱ्याचे गुलाम व्हावे, आणि यांचे मात्र सर्वजण धनी व हुकूम फर्मावणारे, अशा हताश, दुर्बल, दीन बायांची आपत्ती तू दूर करू पाहत आहेस. केवढे सत्कृत्य आहे हे, बाळ. तुझ्या कार्यात परमेश्वर यश देवो.” आईचे हे उत्तेजनपर भाषण ऐकून विद्यासागरांस फार आनंद झाला. आपल्या कार्याने आपल्या आईस एवढा आनंद होतो आहे हे पाहून विद्यासागरांच्या अंगावर मूठभर मांस चढले आणि पुढे त्यांनी तो ग्रंथ प्रसिद्ध केला.