विद्यासागर यांनी आपला अलोट पुस्तकसंग्रह आपल्या विद्यालयास-महाविद्यालयास अर्पण केला. त्यांचा ग्रंथसंग्रह किती अनमोल असेल याची आपणांस कल्पना होणार नाही. विद्यासागर हे विद्येचे भोक्ते, ग्रंथांचे त्यांस वेड. उत्तम प्रकारची बांधलेली पुस्तके त्यांस फार आवडत. सोनेरी बांधणी ज्याची आहे अशा ग्रंथराजांनी त्यांचा ग्रंथसंग्रह नटला होता. ते स्वतःची काळजी घेत नसत, परंतु पुस्तकांची घेत. कोणतेही एखादे सुंदर व विद्वत्तापूर्ण, शोधपूर्ण पुस्तक परदेशात प्रसिद्ध झाले तर ते विद्यासागर यांनी आणलेच. एकदा त्यांच्या एका मित्राने त्यांस विचारले, “विद्यासागर, आपल्या अंगावरील कपडे अगदी भिकार, परंतु या पुस्तकांस मात्र कसे सोनेरी पोषाखाने तुम्ही नटविले आहे.” विद्यासागर म्हणाले, “ही तुमच्या अंगावर शालजोडी मोठी भरजरी आहे. स्वतःचे शरीर भूषवावे असे जसे तुम्हास वाटते, तसे या पुस्तकांस सजवावे असे मला वाटते.” हरि नारायण आपटे, प्रख्यात कादंबरीकार, यांची अशीच गोष्ट सांगतात. ते एक दिवस पुस्तकांस सुंदर कव्हर घालीत बसले होते. “काय हो हरिभाऊ, किती त्या पुस्तकांस जपता? पुस्तके ती काय, त्यास कव्हरे काय घालीत बसलात?” असे कोणी तरी सहज म्हटले. हरिभाऊ म्हणाले, “अहो, ही पुस्तके मला मुलांप्रमाणे वाटतात. आई जशी मुलीस निरनिराळे परकर आपण होऊन नेसविते, तसेच मला करावेसे वाटते.” विद्यासागर यांनी जर एकच पुस्तक निरनिराळ्या बांधणीचे, छपाईचे पाहिले की त्याच्या तीन प्रती घरी झाल्या असल्या तरी ते विकत घ्यावयाचे.

त्यांच्या घरी असलेल्या या अमोल ग्रंथसंग्रहाचा पुष्कळांस फायदा होई. परंतु पुढे पुढे ते पुस्तके कोणास घरी देत नसत. कारण एकदा काय झाले, एका बड्या महाविद्यालयातील एक प्रोफेसर एक पुस्तक दुसरीकडे कोठे नव्हते म्हणून विद्यासागर यांच्याकडे आले. विद्यासागर यांच्याकडे ते पुस्तक होते. साहेबमजकूर हे पुस्तक घेऊन गेले. पुस्तकाचे संदर्भकार्य संपले; परंतु प्रोफेसरसाहेब पुस्तक परत करावयास विसरले. त्यांस पुस्तकाची थोडीच आस्था होती! थोडे काम झाले, झाले. पुढे काही दिवसांनी विद्यासागर यांस त्या पुस्तकाची जरूर लागली. त्यांनी प्रोफेसरसाहेबांस ग्रंथ पाठवून देण्यास चिठ्ठी दिली. परंतु ‘पुस्तक हरवले, दिलगीर आहे; क्षमा करावी.’ असे या प्रोफेसरांनी उत्तर दिले. ईश्वरचंद्रांस या हयगयीचा संताप आला. त्यांनी ते पुस्तक मिळते का म्हणून जर्मनीत चौकशी केली; कारण ते पुस्तक तेथे छापलेले होते. परंतु ते पुस्तक केव्हाच खपून गेले होते. त्याची प्रत उपलब्ध नव्हती. झाले, विद्यासागर यांस कायमची ठेच लागली. पुढे काही दिवसांनी एक गंमत झाली. ‘आपणास जे पुस्तक पाहिजे, ते मजकडे आहे’ असे एका जुन्या पुस्तकवाल्याने विद्यासागरांस कळविले. विद्यासागर ताबडतोब त्या गृहस्थाकडे गेले व “आपणास हे पुस्तक कोणाकडून मिळाले?” असा त्यांनी प्रश्न केला. पुस्तकविक्याने त्या गृहस्थाचे सर्व नाव, गाव सांगितले. ज्या  गृहस्थाने हे पुस्तक विद्यासागर यांच्याकडून नेले होते, त्याच गृहस्थाने आपल्या इतर ग्रंथांबरोबर हेही पुस्तक विकून टाकले होते. ‘किं मिष्टमन्नं खरसूकराणां’ असे म्हणणे जरी कठोर असले तरी वरील प्रसंगी योग्य नाही का? अशा प्रकारचे विद्येचे भोक्ते, आचार्य असावे ह परम दुर्भाग्य होय! आणि अशा आचार्य पदवीची प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये विद्यासागरांस जागा मिळत नाही!

असो. तर अशा विद्याभक्त ईश्वरचंद्रांनी आपला सुंदर ग्रंथसंग्रह आपल्या आवडत्या महाविद्यालयास देऊन टाकला. सर्वतोपरी महाविद्यालय वाढवून पुढे ईश्वरचंद्रांनी ते इतरांच्या हवाली केले. त्यांचे ते जिवंत स्मारक अद्यापही कलकत्त्यास उभे आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel