ईश्वरचंद्र यांनी इतर ठिकाणी पण शाळा स्थापन केल्या. पश्चिम बंगालमध्ये चकधिया येथे एक हायस्कूल त्यांनीच चालविले. तेथे एक मोफत दवाखानाही त्यांनी काढला. सर्व श्रीमंत जमीनदारांस वगैरे नेहमी ते शिक्षणाचा प्रसार करावयास सांगत. शिक्षणप्रसारासारखे पवित्र काही नाही; शिक्षणाने संकुचित मने विशाल होतात. हृदय मोठे होते, मति विवेकशालिनी होते. वृथाभिमान, खोटी स्पर्धा, असूया, परतिरस्कार यांस हद्दपारी मिळते. दुसर्‍यांच्या विचाराबद्दल, आचाराबद्दल आपण सहानुभूती दाखवू लागतो; यामुळे समाजातील निरनिराळ्या अंगांत सलोखा व प्रेम उत्पन्न होते. अज्ञानासारखा शत्रू नाही व ज्ञानासारखा मित्र नाही. हा ज्ञानप्रकाश अंधारातील लोकांकडे आणण्यासाठी विद्यासागर स्वतः आमरण झगडले व दुसर्‍यांस झगडण्यास त्यांनी स्फूर्ती दिली.

समाजसुधारणा

१९ व्या शतकातील बहुतेक सर्व चळवळींशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या विद्यासागर यांचा संबंध आला होता. अशी एकही चळवळ नव्हती, जेथे विद्यासागर हे नाहीत. असे जरी असले, तथापि विद्यासागर यांचे नाव एका विवक्षित सुधारणेशी कायमचे संलग्न झाले आहे. विधवापुनर्विवाह आणि एकपत्‍नीत्व या दोन सुधारणांशी विद्यासागर यांचे नाव चिरंतन जोडले जाईल. त्यांनी आपले प्रयत्‍न या बाबतीत पराकाष्ठेस पोचविले. त्यांचा दृढ निश्चय, त्यांचे धैर्य, त्यांची लोकोत्तर विद्वत्ता सर्व गोष्टी या चळवळीत दिसून आल्या.

हिंदू समाजात, त्यातल्या त्यात ब्राह्मण वर्णात अनेक विधवांचे करुणास्पद जीवन पाहून, ईश्वरचंद्र लहान होते त्या वेळेपासूनच दुःखीकष्टी होत असत. त्यांचे करुणहृदय दयेने भरून येई. हे क्रौर्य, हा अन्याय पाहून त्यांच्या सरल बालहृदयास चीड व संताप येई. विषयविन्मुखता, भोगपरङ्‌मुखता, ब्रह्मचर्य या गोष्टी केव्हाही वंद्य व सेव्यच होत यात तिलप्राय संशय नाही. परंतु व्यक्तीने स्वतःच्या मनाने ज्या वेळेस स्वतःवर या लादलेल्या असतात, त्या वेळेस त्या हितपरिणामी होतात. बायकांच्या बाबतीत ही विषयविरक्ती उत्पन्न करणे, आणि पुरुषांस मात्र अनेक स्त्रिया करून देणे हा एकंदरीत अन्याय होय असे कोणीही प्रांजलवृत्तीचा माणूस कबूल करील. विद्यासागर लहान असता, त्यांचे एक वाचस्पती नावाचे गरुजी होते. हे गुरुजी ८० वर्षांचे वृद्ध झाले होते. विद्यासागर हे सर्व गुरुजनांचे प्रिय शिष्य होते. या वाचस्पतींस पुनः लग्न करण्याची वासना झाली. या गुरुजींनी आपला विचार कसा काय आहे याविषयी विद्यासागर यांचे मत विचारले. त्या वेळेस ईश्वर यांचे वय फक्त तेरा वर्षांचे होते. या हास्यास्पद विचाराने ईश्वरचंद्रास अनावर संताप आला. ‘आपण जर अशा वृद्धापकाळी विवाह करून, एका अनाथ गरीब मुलीवर लवकरच वैधव्याचा महाअनर्थ आणणार असाल, तर आपल्या जवळचा माझा सर्व संबंध मी सोडून देईन.’ असे बाणेदार उत्तर ईश्वरचंद्राने दिले. परंतु आमचा समाज पाहा कसा विचित्र! ऐंशी वर्षांचा जख्खड लग्नास उभा राहावयास समजा तयार झाला, तर त्यास मुलगी तरी कोण देणार? असा मांगहृदयी, कसाबकरणीचा पिता असेल का? हो. असे अगतिक पिते असतात. या वाचस्पतीस एक सुंदर तरुण बायको मिळाली. विद्यासागर यांनी या वाचस्पतीकडे जाण्याचे बंद केले. परंतु वाचस्पती यांस तर विद्यासागर फार आवडे. नेहमी ईश्वरचंद्रास स्वतःबरोबर घरी आणता येईल तर पाहावे म्हणून वाचस्पती जंग जंग पछाडीत. परंतु छे! पुढे काही दिवसांनी, एकदा या वाचस्पतीस ईश्वराचे मन वळविण्यात यश आले. घरी आल्यावर ईश्वरचंद्र व वाचस्पती यांचे बराच वेळ बोलणे चालणे झाले. शेवटी ईश्वरचंद्र जावयास निघाले. परंतु स्वतःची बायको ईश्वरचंद्राने एकदा तरी पाहावी, अशी त्या वाचस्पतीची फारच आग्रहाची इच्छा दिसली. त्याच्या बरोबर ईश्वरचंद्र अंतःपुरात गेला. दूर अंतरावर उभे राहून त्याने तिला प्रणिपात केला व पुन्हा तो माघारी जावयास निघाला. वाचस्पती यांनी त्याचा हात पकडला आणि आपल्या एका मोलकरणीला आपल्या बायकोच्या मुखावरील पडदा दूर करण्यास सांगितले. विद्यासागर याने त्या मुखमंडलाकडे पाहिले मात्र आणि त्यास रडू कोसळले. या मुलीच्या भावी आयुष्यातील दुःखद प्रसंगाचे चित्र ईश्वरचंद्रांच्या नयनांसोर उभे राहिले. हे भेसूर चित्र त्यास स्वस्थ बसू देईना. ते रडले-मुलासारखे रडले. रागाने लाल झालेले ईश्वरचंद्र त्या घराबाहेर पडले व म्हणाले, “मी या घरात पाण्याचा एक थेंबही कधी पिणार नाही.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel