ईश्वरचंद्र हे व्यवहारज्ञ होते. केवळ ध्येयानंदात निमग्न होऊन राहणारे कल्पनापंडित नव्हते. ध्येय मूर्त पाहण्यास ते प्रयत्न करीत. अवास्तव व अव्यवहार्य ते उराशी धरून बसत नसत. हिंदू समाजाची पुराणप्रियता त्यांस पूर्ण माहीत होती. कशा परिस्थितीत कोणत्या प्रकारे किती शिक्षण, स्त्री-शिक्षण प्रसार पावेल हे त्यांस जाणता येत असे. त्यांची दृष्टी दूरवरचा विचार करणारी होती; त्यांची बुद्धी व्यवहारास धरून वागणारी असे. बंगालच्या वरिष्ठ व मध्यम वर्गातील काही स्त्रीयांस शिक्षण देऊन त्यांस सुशिक्षिणी करण्यासाठी एक ‘नॉर्मल स्कूल’ काढावे असे कार्पेंटरबाईंनी सुचविले. विद्यासागर यांनी या गोष्टीस विरोध केला. विद्यासागरांचे या बाबतीत खालीलप्रमाणे मत होते व ते त्यांनी सर वुइल्यम ग्रे यांस कळविले होते.
‘नॉर्मल स्कूलचा उद्देश हा आहे की, गरीब घराण्यातील विधवांस या शाळेत शिकवून, प्राथमिक शिक्षणाचा प्रसार करण्यास त्यांस खेड्यांतून पाठविणे. परंतु खेड्यांमध्ये शिक्षणप्रसार करण्याचे धैर्य या गरीब विधवांस होणार नाही. स्वतंत्रपणे शिक्षणाचा धंदा करण्याइतकी स्वतंत्रता स्त्रियांत नाही व लोक ती देणार नाहीत! श्रीमंत घराण्यांतील व जास्त शिकलेल्या स्त्रियांस तुम्ही नॉर्मल स्कूलमध्ये घेऊन थोडेस शिक्षणशास्त्र शिकवून पाठवू म्हणाल तरी ते अशक्य आहे. कारण या बड्या घराण्यातील जास्त शिकलेल्या स्त्रिया दूर खेड्यांत प्राथमिक शिक्षणार्थ आयुष्य वाहण्यास तयार होणार नाहीत. त्यांना शहरातील आयुष्यक्रमाची चटक लागलेली असते. खेडेगावातील एकविध व नीरस वातावरण त्यांच्या मनास मोह पाडणार नाही, मनास रुचणार नाही. एकंदरीत ही नॉर्मल स्कुले सद्यस्थितीत कुचकामाची ठरतील असे मला वाटते.’
परंतु शेवटी हे नॉर्मल स्कूल स्थापन करण्यात आलेच. त्यात ५-६ लोक प्रथम आले. परंतु दीड वर्षाने हे नॉर्मल स्कूल बंद करावे लागले. परंतु ट्रेंड अशा स्त्रीशिक्षकांची आजही फार आवश्यकता आहे व तो प्रश्न सुटला नाही.
अन्य पुष्कळ स्त्रीशिक्षणप्रसार करणार्या मंडळींबरोबरही विद्यासागर यांचा संबंध असे. विद्यासागरांचा संबंध म्हणजे केवळ शाब्दिक सहानुभूतीच नसे. तेथे खरा मनोभावपूर्वक संबंध असे. प्रत्यक्ष चांगली मदत केल्याशिवाय ते स्वस्थ बसावयाचे नाहीत. जी विद्यार्थिनी प्रथम एम. ए. झाली, त्या विद्यार्थिनीस त्यांनी शेक्सपियर यांचे समग्र सुदंर ग्रंथ अर्पण केले.
या पुस्तकातील पहिल्या खंडावर खालील अर्पणपत्रिका होती
श्रीमती-कुमारी चंद्रमुखी बसू, पहिली एम्. ए. परीक्षा उत्तीर्ण झालेली बंगाली कुमारी यांस अर्पण
कल्याण व शुभेच्छु हितचिंतक
ईश्वरचंद्र शर्मा यांजकडून
अशा प्रकारे स्त्रीशिक्षणास जेवढी शारीरिक, मानसिक व आर्थिक मदत करता आली तितकी या महाभागाने आमरण केली.