“काय, आणलेस पैसे?”
“होय, महाराज.” विनयाने व आनंदाने मुलगा म्हणाला. मुलाची कर्तबगारी पाहून ईश्वरचंद्रांनी त्यास लहानसे दुकान घालून दिले व ते चालवावयास दिले. दुकानात चांगली किफायत होऊ लागली. पुढे मुलगा मोठा झाला. दुकानाचा व्याप वाढला. या मुलावर विद्यासागर याचे प्रेम फार बसले. पुढे त्या मुलाचे लग्न करून देऊन त्याचा संसार सुरळीत व सुखाचा विद्यासागर यांनी थाटून दिला. विद्यासागर यांस जग कुटुंबाप्रमाणे होते, नव्हे का? विद्यासागर यांच्या मेट्रापॉलिटन संस्थेत किती तरी विद्यार्थी नादार असावयाचे. मी गरीब आहे असे सांगितले म्हणजे मिळालीच नादारी. विद्यासागर यांस एखाद्या मुलास आई-बाप नाहीत असे कळले की त्या मुलाची सर्व सोय ते लावीत. ‘महाराज, माझी आई नाही.’ एवढे म्हटले म्हणजे पुरे, की विद्यासागर रडावयास लागावयाचे आणि त्या मुलास नादारी मिळावयाची. ‘आई नाही’ एवढे प्रशंसापत्र असले म्हणजे पुरे. असे पुष्कळ विद्यार्थी विद्यासागरांच्या या उदारतेमुळे पुढे कर्ते झाले व आज कलकत्त्यात प्रतिष्ठित व श्रीमंत म्हणून मिरवत आहेत.
एकदा विद्यासागर आईने अगत्याने बोलावल्यामुळे दामोदर नदी पोहून कसे रातोरात घरी आले, ते मागे सांगितलेच आहे. त्या रात्री विद्यासागर यांस जेवावयास बारा वाजले. दमून भागून आलेला मुलगा. आईने ताजा स्वयंपाक केला व मुलास वाढले. त्या वेळेस मध्यरात्रीचा समय झाला होता. विद्यासागरांचे जेवण चालले असता शेजारच्या घरात नवराबायको बोलत होती. ‘उद्या आता मुलास खावयास काय द्यावयाचे बरे? आज थोडे पीठ होते ते संपले. आपण तर अन्नाशिवय राहिलात, कसे करावे?’ असे बायको नव-यास बोलत होती. हा संवाद, ही कहाणी विद्यासागर व त्यांची आई यांच्या कानावर पडली. मग काय, विद्यासागर यांस ते अन्न कसे गोड लागेल? विद्यासागरांच्या आईने त्या नवराबायकोस बोलावून त्यांस पोटभर जेऊखाऊ घातले. परंतु विद्यासागरांचे समाधान एवढ्यानेच झाले नाही. दुस-या दिवशी विद्यासागरांनी या कुटुंबास कायमचे मासिक पेन्शन ठरवून टाकले. विद्यासागर राजे व लोक प्रजा!
अन्नदान व वस्त्रदान यासमान दुसरे पवित्र दान नाही, दरवर्षी दुर्गापूजेचा सण आला की, विद्यासागर आपल्या आईकडे खेड्यातील गरीब-गुरिबांस देण्यासाठी कपडे पाठवावयाचे. त्यांची आई अशीच परम उदार. एकदा विद्यासागर यांनी पाठविलेले सर्व कपडे खलास झाले. तेव्हा आईने आणखी कपडे पाठवून देण्याबद्दल विद्यासागर यांस लिहिले. विद्यासागर यांस फार आनंद झाला आणि त्यांनी दुप्पट कपडा पाठवून दिला. दुर्गापूजेच्या दिवशी विद्यासागरांच्या आईकडे सर्वांस अन्नदान व वस्त्रदान व्हावयाचेच.
विद्यासागर मनुष्यप्राण्यावरच प्रेम करीत एवढेच नव्हे. त्यांच्या प्रेमसिंधूत सर्व प्राणीमात्र होते. एकदा त्यांच्याकडे त्यांचे एक मित्र आले होते. त्यांच्या पुढे विद्यासागरांनी संत्री ठेवली. हा गृहस्थ काय करी, अर्धवट संत्रे खाई व उरलेल्या फोडी टाकून देई. विद्यासागर म्हणाले, “असे निष्कारण टाकून देऊ नकोस.”
“आहे कोण तुमच्याकडे दुसरे खावयास?” असे त्या मित्राने विचारले.