ईश्वरचंद्रांचा गुणगौरव
ईश्वरचंद्रांचा गुणगौरव किती करावा? त्यांचे गुण मी पामराने वर्णावे तरी किती? परंतु पवित्रांचे गुणवर्णन करून मलिन मन निर्मळ होते. पावित्र्याच्या संगतीत मनोदुर्बलत्व दुरावून मन प्रबळ व मोहादिकांस मारण्यास तयार होते. म्हणून त्यांच्या गुणांचा अल्पमतीप्रमाणे येथे विस्तार करण्याचे योजिले आहे. ईश्वरचंद्रांच्या अनेक गुणांत जर पटकन लक्षात येण्यासारखा, डोळ्यांत भरण्यासारखा कोणता गुण असेल तर तो परोपकार-बुद्धी हा होय. किती परोपकाररत बुद्धी! ईश्वरचंद्रांची ही भूतदया, ही निरपेक्ष प्राणिमात्रावरील प्रेमवृत्ती पाहिली म्हणजे मला एकनाथांची आठवण होते. त्यांच्यासारखे लोक जगात किती असतील हा प्रश्न डोळ्यांसमोर उभा राहतो. स्वार्थात लडबडून राहणा-या असंख्य जीवांत असा थोर पुरुष मोठ्या भाग्याने निर्माण होत असतो. ईश्वरचंद्रांची परोपकारता निस्सीम होती. वाचकांच्या मनावर बिंबविण्यासाठी मी त्यांच्या आयुष्यातील काही कथा देतो. या कथा दंतकथा नाहीत; प्रत्यक्ष घडलेल्या या गोष्टी आहेत. १९ व्या शतकात होऊन गेलेल्या सत्पुरुषांच्या आयुष्यातील या कथा आहेत. प्राचीन काळातील शिबी-श्रियाळावर आपला विश्वास नसेल, या व्यक्ती कल्पनासृष्टीत निर्माण झाल्या असे कोणी म्हणेल, परंतु ईश्वरचंद्रांचे तसे नाही. ईश्वरचंद्र खरोखरचे गेल्या शतकात होऊन गेलेले थोर पुरुष. त्यासंबंधी संशय घेण्यास कोणास जागा नाही. त्यांच्या उदारपणाची मागील प्रकरणात काही उदाहरणे आलीच आहेत. परंतु आणखी काही येथे देतो.
एकदा कलकत्ता शहरात कॉल-याची साथ आली होती. हजारो लोक मरत होते. पुष्कळ लोकांस औषधोपचार वगैरे पोहचण्याची मारामार. एक दिवस काय झाले, पहाटेच्या सुमारास विद्यासागर कोठे तरी बाहेर जात होते, तो रस्त्यात एका कंदिलाजवळ त्यांस काय आढळले? एक मेहतर एका दिव्याच्या खांबाजवळ पडलेला होता. त्याची दशा फार कष्टमय झाली होती. त्याच्याजवळ कोणी चिटपाखरूसुद्धा नव्हते. ईश्वरचंद्र त्याच्याजवळ गेले. त्यांनी त्यांच्या अंगास हात लावला तर सडकून ताप भरलेला. त्यांनी एक क्षणाचाही मनात विचार न करता मेहतरास खांद्यावर घेतले व ते आपल्या घरी आले. ईश्वरचंद्र फार सशक्त होते हे मागे सांगितलेच आहे. मेहतरास घरी आणल्यावर त्यास बिछान्यावर त्यांनी निजविले. त्याच्या अंगात स्वच्छ व उबदार कपडे घातले आणि डॉक्टरांस बोलावणे धाडले. डॉक्टर आले. त्यांनी प्रकृती वगैरे पाहून औषधोपचार केले. पुढे काही दिवसांनी मेहतर बरा झाला. ईश्वरचंद्रांच्या प्रयत्नांस यश आले. पंधरा दिवसांनी मेहतर आपल्या घरी गेला. जाताना ईश्वरचंद्रांनी त्यास कपडे वगैरे देऊन सांगितले, की “जर तुला काही उणे पडले तर मला ताबडतोब कळवीत जा. मनात संकोच मानू नकोस.” विद्यासागरांचे हे भूतप्रेम एकनाथांनी महाराचे वाळवंटातील पोर उचलून घेतले, त्याच्या बरोबरीचे नाही काय?
दुस-या एका मेहतराची अशीच गोष्ट आहे. तो विद्यासागरांकडे आला व म्हणाला, “महाराज माझी बायको आजारी आहे, आपण याल तर बरे होईल.” रात्रीची वेळ होती तरी ताबडतोब ईश्वरचंद्र गेले. ईश्वरचंद्रांस होमिओपॅथीचे ज्ञान होते. त्या ज्ञानाचा ते पुष्कळ वेळा उपयोग करीत व रोग्यास गुणही येत असे. परोपकार करणा-यांस वैद्यकीचे ज्ञान असणे फार आवश्यक आहे. मेहतराच्या बायकोस जेव्हा बरे वाटू लागले, तेव्हा विद्यासागर घरी आले व तिच्या औषधपाण्याची व्यवस्था केली.