ईश्वरचंद्र यांनी आता संस्कृत विद्यालयातील शेवटची परीक्षा दिली. आजपर्यंतच्या सर्व परीक्षांच्या निकालांप्रमाणे या वेळेचाही निकाल होता. संस्कृत महाविद्यालयाचे प्रमुख आचार्य जयनारायण तर्कपंचानन हे म्हणाले,”अशा अलौकिक बुद्धीचा विद्यार्थी या महाविद्यालयात कधीही आला नव्हता; ईश्वरचंद्र हे या संस्थेस भूषण आहेत.” ईश्वरचंद्र यास रुपये २५० चे पारितोषिक मिळाले व ‘विद्यासागर’ ही यथार्थ ‘पदवी’ त्यांस मिळाली. ही पदवी खरोखर किती अनुरूप होती! व्याकरण, अलंकार, साहित्य, तर्क, षङ्दर्शने, ज्योतिष, सामुद्रिक, धर्मशास्त्र या सर्व विषयांच्या अध्यापकांनी सही केलेले प्रशस्तीपत्रक ईश्वरचंद्र यांस देण्यात आले. संस्कृत महाविद्यालयातील ईश्वरचंद्रांचा अभ्यासक्रम समाप्त झाला.
सरकारी नोकरी
अभ्यासक्रम समाप्त झाल्यावर ईश्वरचंद्र यांस फोर्ट विल्यम महाविद्यालयात नोकरी मिळाली. या महाविद्यालयाचे प्रमुख मार्शल नावाचे सद्गृहस्थ होते. हो पूर्वी संस्कृत महाविद्यालयाचेही प्रमुख होते. विद्यासागर अभ्यासक्रम संपल्यावर आपल्या मूळ गावी वीरसिंह येथे राहावयास गेले होते. या रिकाम्या असलेल्या जागेबद्दल त्यांच्या वडिलांनी त्यांस कळविले. त्या वेळेस जे सिव्हिलियन सनदी नोकर कंपनीकडून नेमले जात, त्यांची परीक्षा या फोर्ट विल्यम महाविद्यालयातील शिक्षकांकडून घेतली जाई. ईश्वरचंद्र यांची नेमणूक केल्यावर प्रमुख मार्शल हे विद्यासागर यांस म्हणाले, “या सिव्हिलियन लोकांची परीक्षा फार कडक घेऊ नका. जरा बेतानेच घ्या.” विद्यासागरास अशा गोष्टी माहीत नव्हत्या. वशिल्याचे तट्टे त्यांस माहीत नव्हते. अशा प्रकारे वागणे त्यांचे ब्रीदच नव्हते. त्यांनी मार्शल यांस सडेतोड उत्तर दिले, “महाशय, माझ्या हातून असे कर्म घडणे कठीण आहे. अगदी अल्पही अन्याय करण्यापेक्षा, मी येथून निघून जाण्यासही तयार आहे.” परंतु हे प्रकरण फार विकोपास गेले नाही. विद्यासागर आता इंग्रजी व हिंदी शिकवावयास लागले. त्यांनी दोन शिक्षक ठेवले. एका शिक्षकास दरमहा रुपये १५ व दुसर्यास रुपये १० ते देत असत. त्यांना महिना रुपये ५० मिळत. त्यातील २५ रुपये वरप्रमाणे जात. उरलेल्या २५ पैकी २० रुपये ते घरी आईस पाठवीत. त्यांनी वडिलांस ‘नोकरी सोडून द्या व आता आपण घरी सुखाने राहा’ असे सांगितले. कलकत्त्यास उरलेल्या पाच रुपयांतच ते आपला निर्वाह करीत. ते स्वयंपाक करीत व सर्व काम स्वहस्तानेच करीत.
या वेळेस लॉर्ड हार्डिंज गव्हर्नर जनरल होते. हे फोर्ट विल्यम कॉलेज पाहण्यासाठी आपल्या अमदानीत एकदा आले होते. ईश्वरचंद्रांचे व हार्डिंज यांचे बराच वेळ बोलणे वगैरे झाले. शिक्षणासंबंधी काही थोडीफार चर्चा पण झाली.
न्यायाधीश पंडितांची जागा आता रद्द करण्यात आली होती. १८४६ मध्ये बंगाल प्रांतात १४० प्राथमिक शिक्षणाच्या नवीन शाळा स्थापन करण्यात आल्या. या शाळांची सर्व देखरेख विद्यासागर यांच्याकडे होती. नवीन नेमणुका वगैरे करणे त्यांच्याकडेच होते. यावेळेस संस्कृत महाविद्यालयात आचार्यांची जागा रिकामी होती. या जागेवर ईश्वरचंद्र यांस नेमावे अशी डॉ. मॉयट यांची प्रबल इच्छा होती. या जागेचा पगार रुपये ९० होता. विद्यासागर यांनी या बढतीच्या जागेवर स्वतः जाण्याचे नाकारले; परंतु ‘या जागेसाठी मी एक लायक माणूस निवडून देतो’ असे मात्र त्यांनी आश्वासन दिले. कलकत्त्यापासून फार दूर राहणार्या तारानाथ तर्कवाचस्पती नावाच्या पंडितास विद्यासागर यांनी ही जागा देववली. ६० मैल अंतरावर असलेल्या वाचस्पतींच्या घरी ते स्वतः पायी गेले व त्यांस आग्रह करून घेऊन आले!