बंगालमध्ये अनावृष्टीने नव्हे तर अतिवृष्टीने पुष्कळ वेळा दुष्काळ पडतात, मोठमोठ्या नद्यांस पूर येतात व शेकडो गावे जलमय होऊन हजारो लोक भिकेस लागतात. असाच एकदा एक मोठा दुष्काळ पडला होता. विद्यासागर यांनी या दुःखितांच्या अन्नवस्त्रासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला. एका खेड्यात जाऊन ते स्वतः राहिले व सर्व दुष्काळग्रस्तांना अन्न मिळावे यासाठी त्यांनी तेथे अन्नसत्र घातले. दुष्काळात सापडलेले सर्व लोक तेथे यावयाचे. या लोकांस रोज खिचडी खावयास मिळे. एक दिवस काही दुष्काळग्रस्त लोक विद्यासागरांकडे आले व म्हणाले, “महाराज, या खिचडीचा आता अगदी वीट आला; काही तरी खाण्यात पालट करा. उद्या आम्हांस भात, भाजी असे अन्न द्याल का?” विद्यासागर कळवळले व म्हणाले, “होय, उद्या तुम्हांस तुमच्या इच्छेप्रमाणे भोजन मिळेल.” दुसऱ्या दिवशी भात, भाजी वगैरेचा बेत होता. स्वयंपाक झाला, पंक्ती मांडल्या गेल्या. पोटाची दामटी वळलेले, पाठपोठ एक झालेले असे बुभुक्षित लोक आपापल्या पात्रांवर बसून राहिले. अन्न वाढण्यात आले. भात वाढून झाला, अद्याप भाजी वाढावयाची होती. परंतु ती येण्यास जरा अवकाश होता. एका मनुष्यास धीर धरवेना. त्याने कोरडाच भात भराभरा तोंडात कोंबला व घशास घास लागून तो गुदमरून तेथेच मरण पावला. विद्यासागर धावत आले. परंतु करणार काय? विद्यासागर सारखे रडत राहिले. “आपण कालवण वाढावयास उशीर लावला; परंतु आता बोलून काय फायदा?” असा विलाप विद्यासागर यांनी चालविला. पुष्कळांनी त्यास समजाविले. परंतु त्यांचे सांत्वन होईना. या गोष्टीचे जेव्हा जेव्हा त्यांस स्मरण होई, तेव्हा तेव्हा ते सद्गदित होत.

विद्यासागर हे अनाथांचे नाथ, दुर्बलांचे वाली. ज्यांस दुसरीकडे आधार नाही त्यांस त्यांच्याजवळ तरी आधार मिळावयाचा. ते गरिबांची कल्पवल्ली होते, कामधेनू होते. एकदा कलकत्त्यास एक पोलिस सब-इन्स्पेक्टर सच्चा होता. त्याच्यावर आरोप आला खरा; परंतु त्यातून मुक्त होण्यासाठी बॅरिस्टर देणे जरूर होते. पोलिस सब-इन्स्पेक्टरने एक बॅरिस्टर मिळविला. त्यास रोज रुपये ७०० द्यावयाचे त्याने कबूल केले. घराहून पैसे येतील अशी पोलिस सब-इन्स्पेक्टरने व्यवस्था केली होती. परंतु दैववशात् पैसे वेळेवर आले नाहीत. उद्याची कोर्टातील तारीख. बॅरिस्टरास पैसे तर उद्या दिले पाहिजते. पैसे तर घराहून आले नव्हते. बॅरिस्टर मिळाला नाही तर खटला बुडणार. मग आपणावर कदाचित आरोप शाबित होणार व सर्वत्र नाचक्की होऊन पोटावर पाय येणार असे त्याच्या मनात आले. काय करावे हे त्यास सुचेना. संकटात साधारण मनुष्य त्रस्त होतो; त्याची बुद्धी मंद होते; विचार अस्तंगत होतो. सब-इन्स्पेक्टरचा एक मित्र विद्यासागर यांचा मित्र होता. हा सब-इन्स्पेक्टरास घेऊन विद्यासागरांकडे आला. सब-इन्स्पेक्टर विद्यासागरांस म्हणाला, “महाराज, आपली व त्या बॅरिस्टरांची पूर्वीची चांगली ओळख आहे. तर आपण जर त्यांस चिठ्ठी दिलीत तर ते माझ्याजवळून ताबडतोब पैसे मागणार नाहीत. मी सात दिवसांत पैसे परत देईन, तर आपण त्यांस धीर धरण्यास सांगा. आपल्या शब्दास लोक वेदवाक्याप्रमाणे मानतात.” विद्यासागर यांस काय करावे हे समजेना. बॅरिस्टर पूर्वकाळी त्यांच्या ओळखीचा होता. परंतु इंग्लंडातून आल्यापासून विद्यासागर त्यांच्याकडे एकदाही गेले नव्हते. असे असल्यामुळे त्यास असे पत्र लिहिणे म्हणजे सभ्याचाराचा भंग होतो असे वाटले. विद्यासागर म्हणाले, “छेः माझ्याच्याने हे काम होणार नाही. माझा व त्या गृहस्थाचा नीट परिचय नसल्याकारणाने ही गोष्ट मी कशी बरे करू?” ईश्वरचंद्रांचे हे शब्द ऐकून सब-इन्स्पेक्टर फार खिन्न झाला. तो रडवेला झाला. सद्गदित होऊन तो म्हणाला, “मी आजपर्यंत ऐकत होतो की, ज्याला जगात कोठे आधार नाही, त्याने आपणाकडे यावे की तो सनाथ झालाच. आपली कीर्ती ऐकून अशरण असा मी आपल्या पायांकडे धावत आलो. आपणही आश्रय देत नाही, तर माझे दुर्दैव पुरेच ओढवले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel