स्त्री-शिक्षणाव्यतिरिक्त अन्य शिक्षणविषयक कामगिरी
विद्यासागर यांचे वडील ठाकुरदास वंद्योपाध्याय यांची एक मोठी इच्छा होती की, त्यांच्या स्वतःच्या गावी विद्यासागर यांनी पाठशाळा, संस्कृत पाठशाळा उघडावी. या शाळेत गरीब विद्यार्थ्यांस मोफत शिक्षण मिळावे. जमल्यास त्यांच्या पोटापाण्याची पण सोय करावी, असा त्यांचा मानस होता. विद्यासागर विद्यार्थीदशेत असतानाच, त्यांना मिळणार्या शिष्यवृत्तीच्या पैशांतून काही जमीन खरेदी करण्याचा विचार ठाकुरदास यांच्या मनात आला होता व थोडी जमीन त्यांनी खरेदी पण केली होती; काही जुने ग्रंथसुद्धा विकत घेण्यात आले होते. परंतु पैशाच्या अभावी सर्व बेत जागच्या जागी राहतात. ‘उत्पद्यंते विलीयंते दरिद्राणां मनोरथाः।
बापाची अपूर्ण इच्छा विद्यासागर पुरी करण्यास पुढे आले. ते संस्कृत महाविद्यालयाचे मुख्य असता त्यांस बराच मोठा पगार मिळे. परंतु वडिलांची इच्छा त्याच स्वरूपात पूर्ण करणे त्यांस तितके हितावह वाटले नाही. इंग्रजी शिक्षणाचे फायदे त्यांनी पाहिले होते. नवीन विचारप्रवर्तक हे शिक्षण आहे. रूढींच्या गुलामांस, परंपरागत रुळलेल्या मार्गाने जाणार्यांस, आंधळ्यास हे शिक्षण लाभले तर बरे होईल. निदान कोठे, का, कसे असे प्रश्न तरी हे लोक विचारू लागतील असे विद्यासागर यांस वाटले. लोक विचरवातावरणात खेळू लागावे हे सर्वात मुख्य काम. विचारांचे साम्राज्य सर्वात श्रेष्ठ होय. तलवारीपेक्षा विचारशक्तीस सरकार भिते. मनात असा विचार करून संस्कृत पाठशाळा उघडण्याऐवजी विद्यासागरांनी आपल्या मूळ गावी एक इंग्रजी शाळा उघडली. या शाळेसाठी महिना रुपये ३०० त्यांस खर्चावे लागत. ही शाळा अद्याप आहे. हल्ली तिचे नाव ‘भगवती विद्यालय’ असे आहे. विद्यासागर यांच्या मातेचे नाव भगवती होते.
विद्यासागर जेथे जेथे जात, तेथे तेथे तंत्रस्थ, वजनदार व मातब्बर लोकांस ते शिक्षणप्रसार करण्यास सांगत. शिक्षण सवंग व स्वस्त व्हावे, शिक्षण घेण्यास गरीब-गुरिबांस सोयीचे व सुखाचे व्हावे, यासाठी खेडोपाडी शाळांचे जाळे पसरणे कसे आवश्यक आहे हे ते सर्वांस पटवून देत.
काही जमीनदार व श्रीमंत लोकांनी कलकत्त्यात एक शाळा चालविली होती. आपल्या देशातील लोकांच्या नेहमीच्या मनोधर्माप्रमाणे या शाळेतील चालकांत फाटाफूट होऊन निरनिराळ्या शाळा या एका शाळेच्या झाल्या. या दोन शाळांपैकी एका शाळेच्या चालकांनी ईश्वरचंद्रांस आपल्या गोटात आणले. ईश्वरचंद्र हे योग्य तो सल्ला देऊ लागले. ही संस्था आपलीच समजून ईश्वरचंद्र तदर्थ झटू लागले, खटपटी करू लागले. ज्या वस्तूस एकदा आपले म्हटले त्या वस्तूस थोर मनुष्य प्राणापेक्षाही जपत असतो.