अशा प्रकारचे करुणरसपूर्ण पत्र विद्यासागर यांस लिहावयास लागावे, अशा तत्त्वनिष्ठ, स्वार्थत्यागी, मानधन पुरुषवरावर असा प्रसंग यावा, याहून खडतर दैवदुर्विलास दुसरा कोणता?
दुसर्या एका गृहस्थाने ‘मी वर्गणी देण्याचे कबूल केले होते; त्याचप्रमाणे देणगीही देण्याचे कबूल केले होते, परंतु माझ्या भावाचा या गोष्टीस फार विरोध आहे. तो म्हणतो, ‘पुनर्विवाहनिधीस दिलेले पैस कधी मिळणार नाहीत; आणि ही चळवळ लवकरच मरणार.’ माझी पैसे देण्याची अत्यंत इच्छा आहे परंतु काय करणार? भावाचे मन मोडवत नाही,’ असे विद्यासागर यांस लिहिले. विद्यासागरांनी या पत्रलेखकास लिहिले, ‘आपले पत्र फार उशिरा आले. यापूर्वीच जर आपण आपला नकार दिला असता तर जे काम मी माझ्या शिरावर आज घेतले आहे, ते घेतले नसते. परंतु आता तरी कळवून मला सावध केलेत याबद्दल मी आपला ऋणी आहे.’
किती संकटे आली, तरी त्यांचाही केव्हा तरी अंत होतो. अमावस्येची रात्रसुद्धा जावयाची असते. काळ्याकुट्ट ढगांतूनही वीज चमकते; किंवा त्यांच्या कडा सोनेरी रंगाने भूषित दिसतात. ईश्वरचंद्रांसही धीर देणारे थोडेफार खर्या भावाचे स्नेही होते. जिवश्चकंठश्च मित्र केव्हाही थोडेच असणार. या आपत्काली विद्यासागर यांस राजनारायण बोस (अरविंदांचे मातामह) हे नेहमी मदत करीत. राजनारायण बोस हे अत्यंत निर्मळ व पवित्र आचरणाचे. त्यांचे हृदय सात्त्विक व प्रेमळ होते. जरी ते ब्राह्म होते, तरी ब्राह्म मंडळींत हिंदू संस्कृतीचा पूर्ण अभिमान बाळगणारे राजनारायणच फक्त होते. सुरेंद्रनाथांनी आपल्या जीवनस्मृतीत राजनारायण यांस ‘Saintly’ संत असे विशेषण जोडले आहे. हिंदूसंस्कृतीची वैशिष्ट्ये प्रतिपादण्याकरिता राजानारायण यांनी अनेक निबंध लिहिले. अशा साधुतुल्य राजनारायणांनी परोपकाररत विद्यासागरांस साहाय्य करावयाचे नाही तर कोणी करावयाचे ?
परंतु राजनारायण यांनी मदत दिली तरी ती खिंडीत रतीप्रमाणे होती, सिंधूत बिंदुसदृश होती. डोंगरास दुखणे आणि शिंपीत औषध. तद्वत् हे होते. आकाश फाटले तेथे या ठिगळांनी काय होणार? हतबुद्ध होऊन ईश्वरचंद्र बसले होते. या सुमारास बंगालमध्ये नवीन लेफ्टनंट गव्हर्नर सर सेसिल बीडन हे आले होते. विद्यासागरांबद्दल साहेबमजकुरांनी ऐकले होते. त्यांची व विद्यासागरांची मुलाखत झाली. विद्यासागरांची विपन्नावस्था पाहून बीडन बोलले, ‘आपण सरकारी नोकरी करावयास तयार आहात काय?’ निजदेशबांधवांवरचा विश्वास समूळ मावळला नसल्यामुळे, मानधन विद्यासागर यांनी त्या पहिल्या मुलाखतीत नकार दिला. परंतु आता प्रसंग बिकट आला. सरकारी नोकरी नीट मिळाली तर पाहावी असा विद्यासागर यांनी विचार केला. त्यांनी बीडनसाहेबांस तदर्थी लिहिले. ‘सध्या नोकरी शिल्लक नाही म्हणून दिलगीर आहे; परंतु आपले नाव स्मरणात ठेविले आहे. आपल्यास योग्य अशी जागा रिकामी होताच कळवीन’ अशा मजकुराचे विद्यासागर यांच्या पत्राचे उत्तर गव्हर्नरसाहेबांनी धाडले. पुढे तीन वर्षांनी प्रेसिडेन्सी महाविद्यालयात संस्कृताध्यापकाची एक जागा रिकामी झाली होती. विद्यासागर यांनी ही जागा आपणास मिळावी म्हणून अर्ज केला, परंतु त्या अर्जात नोकरी मिळण्याबाबत त्यांनी काही अटी घातल्या होत्या. त्यातील मुख्य व मुद्याची म्हणजे ‘युरोपीय प्रोफेसरांस जितका तनखा मिळतो, तितका मलाही मिळावा. त्यांच्या जोडीचा, तोलाचा मी समजला गेलो पाहिजे’ अशी अट विद्यासागर यांनी घातली. लेफ्टनंट गव्हर्नर यांनी ‘एवढ्या मोठ्या पगाराची जागा, संस्कृत महाविद्यालय निराळे असताही, प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये संस्कृताध्यापकास देण्यात येईल की काय, याची मी प्रेसिडेन्सी कॉलेजच्या प्रिन्सिपॉलजवळ चौकशी करून काय ते कळवितो,’ असे उत्तर विद्यासागर यांस धाडले. अर्थातच युरोपीय लोकांप्रमाणे मोठा पगार देऊन विद्यासागरासारख्या पंडित- रत्नास घेण्यास ही प्रेसिडेन्सी कॉलेजमधील मर्कटे तयार झाली नाहीत. विद्यासागर हे विद्येचे सागर होते तरी ते रंगाने काळे होते ना? हृदय विद्येने निर्मळ व शुद्ध असले तरी आमचे सरकार बाह्यरंग पाहून भुलते व खुलते, त्यास काय उपाय?