दुस-यावर निरपेक्ष उपकार करणारे विद्यासागर पूर्णपणे निरहंकारी होते. अहंकार त्यांच्या ठिकाणी नसे. याच्याही पुष्कळ कथा आहेत. एकदा एका स्टेशनावर एक श्रीमंत तरुण मुलगा गाडीतून उतरला. तो मोठा ऐटबाज होता. खिशात घड्याळ, डोळ्यांस चष्मा असा थाट होता. त्यास स्टेशनवरून घरी सामान नेण्यास हमाल मिळेना. कर्मधर्मसंयोगाने विद्यासागर हे स्टेशनवर आले होते. विद्यासागर यांचा वर्ण काळा; अंगाने चांगले धष्टपुष्ट, मजबूत आणि कपडे अगदी जाडेभरडे. या श्रीमंताने विद्यासागरांस विचारले, “काय रे ए हमाल, ही ट्रंक घेऊन चलतो का?” ‘होय साब’ विद्यासागर म्हणाले. विद्यासागर यांनी ती ट्रंक आपल्या डोक्यावर घेतली. पुढे तो मुलगा व पाठीमागून विद्यासागर चालले होते. रात्रीची वेळ होती म्हणून बरे. शेवटी त्या मुलाचे घर आले. विद्यासागर यांनी ट्रंक खाली उतरली. तो श्रीमंत मुलगा त्यांस ४ आणे देऊ लागला. हमाल पैसे घेईना. ‘आठ आणे घे’ तरी हमाल हात पसरीना. शेवटी विद्यासागरांनी सांगितले, “मला पैसे वगैरे नकोत. परंतु आपण स्वतःचे काम करण्यास कधी लाजू नका, एवढेच लक्षात ठेवा.” इतक्यात त्या मुलाचा बाप आला. त्याने विद्यासागरांस ओळखले व तो मुलास रागे भरला. विद्यासागर म्हणाले, “त्यास रागे भरण्याची जरुरी नाही. त्याला मी काय माहीत? अतःपर कोणी हमाल वगैरे नसला म्हणजे त्याने लाज धरू नये म्हणजे झाले.”
घरातील बाजाराचे वगैरे सर्व सामान विद्यासागर खांद्यावर झोळी टाकून घेऊन यावयाचे. एकदा विद्यासागर बाजारातून रताळी वगैरे पुष्कळ सामान भरून घेतलेली झोळी खांद्यावर टाकून येत होते. समोरून येणा-या एका श्रीमंत गृहस्थाने पाहिले की, विद्यासागर सामान हमालाप्रमाणे वाहून नेत आहेत. श्रीमंत मनुष्य व विद्यासागर हे मोठे मित्र. विद्यासागर वाटेत भेटले तर या हमालसदृश गृहस्थांस मला नमस्कार-चमत्कार करावे लागणार तर ती आपणास भररस्त्यात लाजच. म्हणून विद्यासागरांस टाळावे असा या लक्ष्मीपुत्रांनी विचार केला आणि शिरले एका बोळात व पलीकडच्या रस्त्यावर आले. विद्यासागर यांचे या गोष्टीकडे लक्ष होते. त्यांनीपण गल्ली ओलांडून पुनः त्याच श्रीमंताचा रस्ता सुधारला व दोघांची शेवटी गाठ पडली. नमस्कार झाल्यावर विद्यासागर म्हणाले, “आपण का आलात या रस्त्याने हे मी सांगू का?” तो गृहस्थ ओशाळला व त्याने सर्व कबूल केले.
एकदा विद्यासागर एका दुकानदाराच्या ओट्यावर बसून गप्पा मारीत होते. एक श्रीमंत मनुष्य मोटारीत बसून येत होता. या भिकारड्या दुकानदाराशी विद्यासागर गप्पा मारत असेलेले त्यांनी पाहिले. ईश्वरचंद्र व ते श्रीमंत गृहस्थ स्नेही होते. विद्यासागरांस मी नमस्कार नाही केला, तरी ते करणारच. आणि आपला दोघांचा समसंबंध या भिकारड्यास कळणारच; तर मग आपणच मोटार थांबवून विद्यासागरांशी बोलून मनाचा मोठेपणा दाखवावा, असे त्या गृहस्थाने मनात आणून, त्याप्रमाणे केले. परंतु ईश्वरचंद्रास ते हळूच काय म्हणतात, “हे पाहा विद्यासागर, असे आपण हलक्या लोकांशी बोलत बसणे योग्य नव्हे. ज्याने त्याने आपला बोज सांभाळून वागले पाहिजे, नाही तर हास्यास्पद होत.” विद्यासागर जरा हसले. ते अर्थातच काही बोलले नाहीत.
विद्यासागर यांस जरी महाविद्यालयात मुख्य पंडिताची जागा मिळाली होती, तरी ते पुष्कळ दिवस घरी हाताने स्वयंपाक करीत. लोकांत ते विद्वान म्हणून गाजले, परंतु हातची चूल मात्र त्यांची सुटली नाही. त्यांस एकट्याचाच स्वयंपाक करावयाचा नसे. तर धाकटे भाऊ वगैरे कलकत्त्यासच शिकण्यासाठी राहत, त्या सर्वांचा स्वयंपाक त्यांसच करावा लागे. विद्यासागर १०-१२ वर्षांचे असल्यापासून स्वतः स्वयंपाक करीत. त्यांचे वडील ठाकुरदास हे काही करावयाचे नाहीत. या लहान मुलासच तिघा-चौघांचा स्वयंपाक करणे भाग पडे. स्वयंपाक करावयाचा, सर्व अभ्यास करावयाचा, पुन्हा विद्यालयात पहिला नंबर मिळवून शिष्यवृत्ती वगैरे कायम ठेवायची. विद्यासागरांचे बाप एरवी दयाळू असले, तरी ते मुलाच्या बाबतीत फार कठोर असत.