एकदा या खेडेगावात हडसन नावाचा एक युरोपीयन फोटोग्राफर आला होता. हा फार उत्कृष्ट फोटो काढी. विद्यासागर यांस आपल्या माता-पित्यांचा फोटो काढून घ्यावयाचा होता. ते त्या वेळेस तेथेच होते. त्यांनी आईस पुष्कळ आग्रह केला की, फोटो काढावयास चल म्हणून. परंतु ती माऊली या गोष्टीस तयार होईना. विद्यासागर म्हणाले, “आई, तू किती निष्ठुर आहेस, मला दर्शन देण्याची तुझी इच्छा नाही? मी तिकडे कलकत्त्यास असतो; तुझे हरघडी दर्शन मला तेथे कसे बरे घेता येईल? मला तुझी आठवण येते परंतु प्रत्यक्ष मूर्ती समोर नसतेच. तुझा फोटो काढून घेतला, म्हणजे मी तो माझ्या खोलीत ठेवीन; म्हणजे तुझे पवित्र व स्फूर्तिदायी दर्शन सदोदित घडेल.” मुलाच्या या बोलण्याचा योग्य तो परिणाम झाला. परंतु हडसनसाहेबांच्या फोटो काढण्याच्या ठिकाणी ती गेली नाही, हडसन इकडे आले व त्यांनी उभयतां विद्यासागरांच्या आई-बापांचा फोटो काढला. विद्यासागर या फोटोस प्राणांपलीकडे जपत. ते रोज सकाळी या फोटोस वंदन केल्याविना थेंबभर पाणीसुद्धा प्राशन करीत नसत. आईबापच त्यांचे दैवत होते. त्या दैवताची त्यांनी आजन्म आमरण आराधना केली. ते प्रतिपुंडलीक होते.
संतोषाने संसार चालला होता. विद्यासागर यांनी आपल्या खेडेगावात एक सुंदर बंगला बांधला होता. या बंगल्याच्या भिंती बांबूच्या होत्या. या भिंती करण्यास फार खर्च पडतो. बंगला सुंदर व खरोखर नमुनेदार होता. येथे विद्यासागरांचे आई-वडील, त्यांची पत्नी, इतर भाऊ, त्यांच्या बायका राहत असत. विद्यासागर यांचा मुलगा नारायण येथेच शंभुचंद्रांच्या तालमीत तयार होत होता. असे सुरळीत चालू असतां विद्यासागर यांचे वडील ठाकुरदास यांनी एकदम काशीस जाण्याचे ठरविले. विद्यासागरांनी त्यांस पुष्कळ कलकत्त्याहून लिहिले. ‘आपणास फार त्रास होईल. आपण दूर गेल्यामुळे जे समाधान कुटुंबात आहे ते नाहीसे होईल.’ वगैरे त्यांनी लिहून पाहिले, परंतु ठाकुरदास निश्चय बदलीतना. कारण त्यांनी एक भयंकर स्वप्न पाहिले. त्या स्वप्नात त्यांनी असे पाहिले की, ‘आपले सुंदर घर भस्म झाले आहे. जळून खाक झाले आहे; विद्यासागरास त्याचे स्नेही, मित्र, आप्त त्रास देत आहेत वगैरे.’ असे स्वप्न पडल्यामुळे जर खरोखरच असे झाले तर ते आपल्या डोळ्यांआड होवो असे ठाकुरादास यांस वाटले. ‘डोळ्यांआड आणि मसणपाड’ अशी म्हण आहे. मागे काही झाले तरी पुरवते; परंतु समक्ष नको. विद्यासागर कलकत्त्याहून घरी आले, रडले, परंतु वडिलांचा निश्चय तो निश्चय. ठाकुरदास जावयास निघाले. त्यांची पत्नी पण त्यांच्याबरोबर काशीस गेली. आई-बाप काशीस गेले. परंतु आई लवकरच वीरसिंह गावास परत आली. कारण काशीची हवा तिला सोसेना. ती पतीस आपल्या बरोबर परत आणण्याचा प्रयत्न करीत होती. ठाकुरदास यांचा काशीत देह ठेवण्याचा विचार होता म्हणून ते पुनरपि घरी येण्यास कबूल होईनात. भगवती म्हणाली, “तुम्ही इतक्यात खात्रीने मरणार नाही. आणि तुम्ही येथेच राहिलात तरी मी सांगून ठेविते तुमच्या आधी मीच काशीत येऊन मरेन. परंतु तुम्ही मात्र जिवंत राहाल.” शेवटी भगवती एकटीच घरी परत आली. घरी परत आल्यावर थोडक्याच दिवसांत ठाकुरदास यांस पडलेले स्वप्न खरे ठरले. विद्यासागर यांनी लहान मुलांसाठी ‘बोधोदय’ म्हणून एक पुस्तक लिहिले आहे. त्यात ते एके ठिकाणी लिहितात, ‘स्वप्न सकल सत्य नाही, अमूलक चिंता मात्र.’ स्वप्ने ही खरी नसतात; उगीच नसती काळजी मात्र उत्पन्न करतात. विद्यासागरांचे हे लिहिणे त्यांच्या वडिलांच्या स्वप्नाच्या बाबतीत तरी खोटे ठरले. विद्यासागर यांचे सुंदर घर जळून गेले. विद्यासागर कलकत्त्याहून धावत आले. कोणास अपाय, इजा मात्र झाली नव्हती, याबद्दल त्यांनी देवाची प्रार्थना केली. नंतर त्यांनी नवीन घर बांधण्यास आरंभ केला. त्या वेळेस त्यांस पुष्कळांनी सांगितले की, आता चांगली दगडांची टोलेजंग इमारत बांधा. विद्यासागर म्हणाले, “मी गरीब ब्राह्मणाचा मुलगा. आमच्या कुळाला टोलेजंग इमारती शोभणार नाहीत.” विद्यासागरांनी सर्व भावांची राहावयाची वगैरे व्यवस्था केली. पत्नीस जाताना त्यांनी कलकत्त्यास नेले. ते आईसही आग्रह करीत होते. परंतु आई म्हणाली, “मी जर कलकत्त्यास आले तर हे गरीब लोक गावात कोणाच्या जिवावर राहतील? त्यांच्यासाठी मला येथेच राहिले पाहिजे.” विद्यासागर कलकत्त्यास निघून गेले.