संस्कृत महाविद्यालयात दुसर्‍या वर्षाच्या विद्यार्थ्यांस शिकविण्यासाठी काही शिक्षक नेमावयाचे होते. उमेदवार तर पुष्कळ होते. ईश्वरचंद्र यांनी सुचविले की, या सर्व उमेदवारांची चढाओढीची परीक्षा घ्यावी. या परीक्षेत ईश्वरचंद्र यांचे दोन मित्र वर आले व त्यांस दोन जागा मिळाल्या.

या वेळेस विद्यासागर यांनी अलौकिक मातृभक्ती दर्शविणारी एक गोष्ट घडून आली. विद्यासागर यांच्या तिसर्‍या भावाचे घरी विवाहकार्य व्हावयाचे होते. ‘तू कसेही करून लग्नाला येच’ असे आईचे आमंत्रण आले होते. विद्यासागर हे मार्शल यांस रजा विचारावयास गेले. मार्शल रजा देत ना. काय करावे हे विद्यासागर यांस सुचेना. आईने तर उद्या बोलाविले आहे; साहेब तर हट्ट धरून बसले आहेत. परंतु शेवटी मातृप्रेमाचा आणि मातृ-निष्ठेचा विजय झाला. ईश्वरचंद्र यांनी नोकरीवर लाथ मारली. राजीनामा लिहून साहेब मजकुराकडे त्यांनी पाठवून दिला आणि ईश्वरचंद्र निघाले. वाटेत अपरंपार मुसळधार पाऊस कोसळू लागला. मेघ गडगडत होते; विजा लखलखत होत्या, दिशा धुंद झाल्या होत्या; परंतु हा मातृनिष्ठ वीर मोठ्या ढोपर ढोपर पाण्यातून रस्त्यातून जात होता. येता येता ते दामोदर नदीजवळ येऊन थडकले. ती नदी केवळ बेफाम होऊन दुथडी भरून चाललेली. दामोदर नदी आधीच जरा भयंकर, त्यात मोठा पूर आलेला. सायंकाळची वेळ होऊन काळोख पडावयास लागलेला. नदीत फेरीवाले होडी लोटण्यास तयार होत ना. आपले पंचप्राण कोण संकटात घालणार? पुष्कळ पैसे देण्याचे विद्यासागर यांनी कबूल केले; परंतु काही उपयोग झाला नाही. शेवटी ईश्वरचंद्र यांनी मनाशी धडा केला. आईने घरी बोलाविले आहे आणि आज रात्री घरी तर पोचलेच पाहिजे अशी आईची आज्ञा आहे. आईची आज्ञा पालन करण्यात प्राण संकटात पडले तरी फिकीर नाही असे मनात आणून त्यांनी नीट कंबर कसली. विद्यासागर हे सामर्थ्याने दांडगे होते. त्यांची शरीरयष्टी पीळदार, लोखंडासारखी कणखर होती. ते पोहणारे तर पहिल्या प्रतीचे पटाईत. ‘माताजी की जय’ अशी आरोळी ठोकून दामोदर नदीच्या बेफाम प्रवाहात बेदरकार त्यांनी उडी टाकली. पाण्याच्या प्रवाहाशी दोन हात करीत मातृभक्त विद्यासागर पैलतीरास सुखरूप पोचले. आता घर थोड्याच अंतरावर राहिले होते. नदीपलीकडे त्यांचे गाव होते. ईश्वरचंद्र आता पळत सुटले, ते घरी येऊन आईसमोर दाखल झाले. दारावर त्यांनी टिचकी मारली. ‘कोण आहे?’ असा प्रश्न आला. “मी ईश्वर!” असे उत्तर दले गेले. आईने एकदम दरवाजा उघडला व ईश्वरचंद्र आत गेले. ईश्वरचंद्र यांचे ओले कपडे पाहून सर्वांनी चौकशी केली. त्यांची हकीगत ऐकून सर्वांनी परमेश्वराचे आभार मानले. “माझा मुलगा आल्याशिवाय राहणार नाही, हे तर मी सारखे म्हणत होते. यांचाच माझ्यावर विश्वास नव्हता व ही सर्व जण माझी थट्टा करीत होती. परंतु माझा ईश्वर मला माहीत आहे. इतरांस तो तसा माहीत असणे शक्यच नाही.” वगैरे त्यांच्या आईने स्वतःची व आपल्या मुलाची स्तुती करून घेतली.

ईश्वरचंद्र परत कलकत्त्यास आले. एका सिव्हिलियन गृहस्थाने ‘माझे नाव संस्कृत काव्यात गोवून जो उत्कृष्ट काव्य करील त्यास रुपये २०० बक्षीस देण्यात येतील’ असे जाहीर केले. ईश्वरचंद्र यांनी हे बक्षीस मिळविले. ईश्वरचंद्र यांनी ही रक्कम स्वतःसाठी घेतली नाही. हे रुपये २०० संस्कृत महाविद्यालयास त्यांनी दिले; व चार वर्षेपर्यंत उत्तम संस्कृत कविता करणार्‍या विद्यार्थ्यास त्यातून ५० रुपयांचे बक्षीस द्यावे असे ठरविण्यात आले. १८४६ मध्ये ईश्वरचंद्र यांनी संस्कृत महाविद्यालयाच्या असिस्टंट सेक्रेटरीची जागा स्वीकारली. फोर्ट वुइल्यम कॉलेजमधील त्यांची पंडिताची जागा दीनबंधू यांनी घेतली. या संस्कृत महाविद्यालयात त्यांस पुष्कळ सुधारणा करावयाच्या होत्या. डॉ. मोयेट त्यांच्यावर खूष झाले. वाङमय घेणार्‍या विद्यार्थ्यांस गणित त्यांनी आवश्यक केले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel