पुढे एक दिवस असे झाले की, कारसाहेबांस विद्यासागरांकडे काही कामानिमित्त यावे लागले. विद्यासागरांजवळ सर्व शिक्षणाधिका-यांस काम पडे. विद्यासागरांनी दुरून पाहिले की, कारसाहेब येत आहेत. लगेच त्यांनी नोकरांस सांगितले, ‘वरच्या दिवाणखान्यातील सर्व खुर्च्या वगैरे दुसरीकडे नेऊन ठेवा. टेबलसुद्धा तेथे नको. खाली एक जाजम व लोड मात्र असू द्या.’ नोकराने सांगितल्याप्रमाणे सर्व केले. विद्यासागर त्या लोडाशी जाऊन बसले व वाचण्यात गर्क झाले. कारसाहेब आले. नोकर त्यांस वर घेऊन आला. विद्यासागरांनी वर ढुंकूनही पाहिले नाही. आदरातिथ्य वगैरे सर्व बाबतीत नकार. साहेब सर्व मनी समजले. विजेप्रमाणे सर्व प्रकार चटकन् त्यांच्या ध्यानात आला. परंतु एका नेटिव्हाने एका गो-याचा असा अपमान करावा हे त्यांस सहन झाले नाही. कारसाहेब यांनी ही गोष्ट डायरेक्टर यांस कळविली. डायरेक्टर यांनी लेफ्टनंट गव्हर्नरांस ही हकिगत कळविली. लेफ्टनंट गव्हर्नरांस डायरेक्टर म्हणाले, “काय हो, आपण तर विद्यासागरांस विद्वान, विनयशील थोर समजता. परंतु आज तर कारसाहेबांच्या दृष्टोपत्तीस असे आले की, ते हलक्या वृत्तीचे मनुष्य आहेत. त्यांस सभ्याचाराचा गंधसुद्धा नाही.” ले. गव्हर्नरसाहेब म्हणाले, “काही तरी घोटाळा झाला असेल. विद्यासागर असे कधी करावयाचे नाहीत, अशी माझी पक्की खात्री आहे.”

“अहो, पण प्रत्यक्ष अनुभव घेऊन कारसाहेबांनी मला ही गोष्ट सांगितली.”
“बरे, ठीक आहे, मी विद्यासागरांस उद्या बोलावून घेतो व त्यांस सर्व हकीगत विचारतो म्हणजे गैरसमज असेल तर दूर होईल.” असे गव्हर्नर म्हणाले.

दुस-या दिवशी गव्हर्नरांच्या आमंत्रणावरून विद्यासागर त्यांच्याकडे आले. सर्व नमस्कारचमत्कार झाल्यावर गव्हर्नरांनी त्यांच्या विलक्षण वर्तणुकीबद्दल विद्यासागरांस प्रश्न केला. विद्यासागर म्हणाले, “अशा प्रकारे स्वागत करायची त-हा मी यांच्यापासूनच शिकलो. मी यांच्याकडे गेलो असता मला त्यांनी असेच वागविले. तेव्हा मला वाटले की, युरोपियन लोकांत आपल्याकडे आलेल्या गृहस्थांचे अशा प्रकारे स्वागत करतात. अर्थात कार माझ्याकडे आल्यावर युरोपियांच्या चालीप्रमाणे, कारसाहेबांस जसे आवडते तसे स्वागत मी त्यांस दिले. माझी गैरसमजूत झाली असेल तर क्षमा करा. परंतु माझा अपराध मला दिसत नाही.” गव्हर्नर यांनी ही हकीगत डायरेक्टर यांस कळविली. डायरेक्टर कारसाहेबांकडे जाऊन म्हणाले, “तुम्हीच संस्कृत कॉलेजच्या प्रिन्सिपॉलकडे (विद्यासागरांकडे) जा व प्रकरण मिटवा.” हे सर्व ऐकून कार जरी गोरे होते तरी काळवंडले. त्यांचे तोंड उतरले. रुबाब कमी झाला. त्यांनी आपली चूक विद्यासागरांकडे जाऊन कबूल केली. शेवटी परस्पर मने साफ होऊन काही एक मनात किंतू न राहता विद्यासागर व कारसाहेब हे मित्र झाले.

एकदा विद्यासागरांकडे एक परप्रांतीय महाराष्ट्रीय आला होता. तो मुंबईचा होता. कलकत्ता शहर फार प्रेक्षणीय व सुंदर आहे. तेथे जे म्युझियम आहे ते तर फारच भव्य व विस्तृत आहे. खुद्द हिंदुस्थानसरकारच्या देखरेखीत हे म्युझियम, हे पदार्थसंग्रहालय असे. विद्यासागर हे त्या नवख्या गृहस्थांस बरोबर घेऊन म्युझियम दाखविण्यास गेले. विद्यासागरांच्या पायात जोडा होता. त्या म्युझियमध्ये असा नियम होता की, जोडे, वाहाणा सर्व बाहेर काढून मग आत जावयाचे. विद्यासागरांच्या हे लक्षात नव्हते. ते आत जाऊ लागले, तो द्वाररक्षकाने त्यांस हटकले व जोडे काढण्यास सांगितले. जोडे काढून आत जाण्यापेक्षा बाहेरच राहणे बरे असा मनात विचार करून विद्यासागर त्या गृहस्थांस म्हणाले, “जा, आपण पाहून या; मी येथे बसून राहतो.” शेवटी ही बातमी म्युझियमचे जे मुख्य व्यवस्थापक होते, त्यांच्या कानावर गेली. ते लगेच खाली आले. विद्यासागरांस अदबीने नमस्कार करून व्यवस्थापक म्हणाले, “आपण कोण आहात हे नोकरास माहीत नाही, म्हणून हा अक्षम्य अपराध घडला. तरी त्याचा राग न मानता आपण आता जोडे वगैरे न काढता आत चला. आपण काही एक मनात किंतू आणू नये.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel