रवींद्रनाथ हे आज सर्वविश्वश्रुत आहेत. त्यांचे परमपूज्य वडील देवेंद्रनाथ यांस लोक महर्षि असे संबोधित. देवेंद्रनाथ ‘तत्त्वबोधिनी’ नावाचे एक मासिक चालवीत असत. या मासिकास आश्रय देणारे, सल्ला देणारे व नेहमी लेख वगैरे लिहून देणारे ईश्वरचंद्र होते.
विद्यासागर यांनी एकंदर लहान मोठी ५२ पुस्तके लिहिली. यांपैकी १७ पुस्तकांचा संस्कृत भाषेत प्रवेश करून देणारी क्रमिक पुस्तके, काही संस्कृत उतार्यांची पुस्तके, व्याकरणादि पुस्तकांस लिहिलेल्या प्रस्तावना, यांच्यात समावेश होतो. व्याकरणकौमुदी हा त्यांचा मोठा सुंदर व अगदी नवीन तर्हेने लिहिलेला ग्रंथ आहे. भांडारकर यांची पुस्तके याच नमुन्याची आहेत. विद्यासागर यांनी इंग्रजीतून लिहिले नाही एवढाच फरक, परंतु हा महत्त्वाचा फरक होय. त्याशिवाय सोपी, सरळ अशी मूळ संस्कृत सूत्रे, आणि कधी स्वयंरचित सूत्रेही ते विद्यार्थ्यांस स्मरणसाहाय्य व्हावे म्हणून योजीत. या पुस्तकाच्या अद्यापही कित्येक आवृत्त्या बंगाली भाषेत निघतात. हे पुस्तक लिहिण्यापूर्वी फारच थोडे लोक संस्कृत शिकण्यास धजत. संस्कृत-व्याकरण म्हणजे एक बाऊ वाटे. विद्यासागर यांनी प्रथमच जेव्हा नोकरी धरली त्या वेळेस ‘उपक्रमणिका’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला. हा ग्रंथ संस्कृत शिकणार्यांसाठी होता. याची हकीगत जरा मजेची आहे. एकदा ईश्वरचंद्रांचे मित्र रामकृष्ण बॅनर्जी हे त्यांच्या घरी आले होते. त्या वेळेस ईश्वरचंद्रांचे लहान भाऊ मोठ्या गोड आवाजाने संस्कृत श्लोक म्हणत होते. रामकृष्णांस ते मुलांचे श्लोक म्हणणे फारच आवडले. आपणास असे श्लोक म्हणता आले तर काय गंमत होईल असे ते सहज बोलले. “मला संस्कृत शिकण्यासाठी एखादे सोपे साधन द्याल तर मी संस्कृत शिकेन.” असे रामकृष्ण यांनी विद्यासागर यांस सांगितले. त्याच दिवशी रातोरात बसून ही ‘उपक्रमणिका’ विद्यासागर यांनी लिहून काढली व इंग्रजी शिकलेल्या बंगाली लोकांसही सोप्या पद्धतीने संस्कृत शिकण्याचा मार्ग त्यांनी मोकळा करून दिला.
रघुवंश, किरातार्जुनीय, शिशुपालवध, मेघदूत वगैरे संस्कृत महाकाव्ये व खंडकाव्ये त्यांनी प्रकाशित केली. शाकुंतलाची प्रत तर त्यांनी फार कष्टाने तयार केली. सर्व हिंदुस्थानातील हस्तलिखिते गोळा करून, त्यांची तुलना करून निरनिराळे पाठभेद लक्षात घेऊन त्यांनी सुंदर अशी प्रत प्रसिद्ध केली. यास त्यांनी संस्कृतात टीपा पण स्वतः लिहिल्या आहेत. त्यांनी इंग्रजी पाच पुस्तके लिहिली. त्यातील ‘विधवा-पुनर्विवाह’ हे स्वतः त्यांचे व बाकीची ४ पुस्तके केवळ ‘संग्रह’ आहेत (Collection of extracts). उरलेल्या ३० पुस्तकांपैकी १४ महाविद्यालय व विद्यालय यांतील अभ्यास पुस्तके आहेत व बाकीची अनेक विषयांवर आहेत. यांतील काही इंग्रजी पुस्तकांचे अनुवाद आहेत; काहींमधील साहित्य दुसर्यांपासून घेतलेले असून मांडणी मात्र विद्यासागर यांची आहे.
या पुस्तकांशिवाय भारतवर्षाचा एक प्रचंड इतिहास बंगाली भाषेत लिहिण्यासाठी ते साहित्य जमा करीत होते. परंतु हे पुस्तक पूर्ण झाले नाही. आयुष्याच्या अंतापर्यंत ते या पुस्तकासाठी, या ग्रंथासाठी श्रम करण्यास उत्सुक होते; परंतु ग्रंथ लिहून झाला नाही याचे वाईट वाटते. पुष्कळ पुस्तके त्यांनी अर्धवट लिहिली व ती आपल्या अनेक मित्रांस पूर्ण करावयास सांगितली. त्या मित्रांनी ती पूर्ण करून ते स्वतः श्रीमंत झाले. ईश्वरचंद्रांचा उदार स्वभाव अमर्याद होता. ईश्वरचंद्रांची लेखक या नात्याने ख्याती सर्व बंगालमध्ये आता स्थिर झाली होती. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांवर वाचकांच्या उड्या पडत. असे असता, अशा स्पृहणीय वाङ्मयस्थानी विराजत असता एका होतकरू ग्रंथकारासंबंधी अनुपम औदार्य विद्यासागर यांनी दाखविले ते अभूतपूर्व होय. ईश्वरचंद्र ‘रामाचा राज्याभिषेक’ हा ग्रंथ लिहीत होते. ग्रंथ छापत होता. अर्धा अधिक छापूनही झाला. अशा वेळी ‘त्याच विषयावर’ अन्य एका ग्रंथकाराने ग्रंथ लिहिला होता व त्या ग्रंथाची प्रत त्याने विद्यासागर यांस भेट म्हणून पाठविली. आपले पुस्तक छापून बाहेर पडले, तर या ग्रंथकाराचे श्रम वाया जातील, कारण त्याच्या ग्रंथास लोक आश्रय देणार नाहीत हे विद्यासागर यांस माहीत होते. विद्यासागर यांनी आपले पुस्तक छापण्याचे तात्काळ बंद ठेवले व अशा प्रकारे त्या अभ्युदयेच्छु ग्रंथकारावर उपकार केले. केवढे हे औदार्य व केवढा मनाचा हा मोठेपणा!