राजेरजवाडे यांचासुद्धा विद्यासागरांवर विश्वास. टिळक हे ज्याप्रमाणे जगन्नाथमहाराजांच्या इस्टेटीसाठी जगले व अलौकिक मित्रप्रेम दाखविते झाले, त्याप्रमाणे कांदी संस्थानच्या राणीचा कारभार ईश्वरचंद्रांनी पाहिला. राणीचा मुलगा लहान होता. कोर्ट ऑफ वार्डच्या ताब्यात हे संस्थान देऊन सरकार काही युरोपीय व्यवस्थापक तेथे ठेवणार होते. परंतु विद्यासागर यांनी खटपट करून राणीचा कारभार आपल्या हाती घेतला व अत्यंत काळजीपूर्वक सर्व कारभार त्यांनी पाहिला.
विद्यार्थ्यांच्या चळवळीत ते विशेष भाग घेत नसत. विद्यार्थ्यांबद्दल प्रेम त्यांच्या मनात फार असे. ते मेट्रापॉलिटन संस्थेचे तर जीव होते. परंतु एकदा एक विशेष प्रसंग घडून आला. कलकत्त्याच्या मेडिकल कॉलेजचे प्रिन्सिपॉल यांनी बंगाली विद्यार्थ्यांस उद्देशून काही अपशब्द उच्चारले. ‘खोटे बोलणारे, लफंगे, फसवे, अप्रामाणिक, आतल्या गाठीचे’ वगैरे. मेकॉलेसाहेबांनी जी पूजा बंगालीबाबूंची केली, त्याच वाक् पूजेचा पुनरुद्धार या प्रिन्सिपॉलसाहेबांनी केला. मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी संतापून संप केला. विजय गोस्वामी यांनी या विद्यार्थ्यांचे पुढारीपण स्वीकारले होते. गोलगोल दिघी घाटावर विद्यार्थ्यांची प्रचंड सभा भरली. या घाटावर विद्यासागर यांचा अर्ध पुतळा सध्या शोभत आहे. या सभेस आपण अध्यक्ष व्हा अशी विद्यसागरांस विद्यार्थ्यांनी विनंती केली. विद्यासागर अध्यक्ष झाले. तुम्ही “पुनः कॉलेजमध्ये जा; कशाला प्रकरण उगीच चिघळविता?” असे विद्यासागर मुलांस म्हणाले. परंतु विजय गोस्वामी याने विद्यासागरांचे मन वळविले. सर्व राष्ट्राची बदनामी ज्याने केली, त्याने क्षमा मागितली तरच आम्ही कॉलेजमध्ये जाणे योग्य होईल, असे सांगून त्याने विद्यासागरांची समजूत घातली. विद्यासागर यांनी लेफ्टनंट गव्हर्नरांची भेट घेऊन प्रकरण तडीस न्यावे असे ठरले. विद्यासागर हे गव्हर्नरांकडे गेले; त्यांनी प्रिन्सिपॉल यांस बोलाविले. नंतर उभयंता बोलणी होऊन विद्यासागर यांनी विद्यार्थी व प्रिन्सिपॉल यांचा समेट कॉलेजमध्ये करून द्यावा, असे ठरले. मेडिकल हॉलमध्ये सभा भरली. तेथे क्षमा मागणे वजा भाषण प्रिन्सिपॉलनी केले, त्यांनी दिलगिरी प्रदर्शित केली. ही क्षमा जाहीररीत्या मागावयास ते तयार नव्हते एवढेच. विद्यासागरांनी लहानसे भाषण करून सर्वांचा सलोखा घडवून आणला. हा विजय गोस्वामी विद्यार्थी पाच वर्षे शिकला, परंतु शेवटच्या वर्षी त्याने कॉलेज सोडले व तो विरक्त झाला. पुढे विजय गोस्वामी हे साधू झाले. चित्तरंजन दासांचे हे गुरू होते. (अध्यात्मिक गुरू) विजय गोस्वामीबद्दल विद्यासागर यांचा फार अनुकूल ग्रह झाला व ते त्यास मनात मोठा मानीत.
विद्यासागरांस स्वतः दुःख झाले तरी ते दुःख इतरांस कदापि दाखवीत नसत. त्यांची सहनशक्ती फार लोकोत्तर होती; इच्छाशक्ती दांडगी होती. जनकाप्रमाणे ते स्थितप्रज्ञ होते. जनकराजाची अशी गोष्ट सांगतात की, एक हात अग्नीमध्ये ठेवून दुस-या हाताने तो भोजन करी. देह ही लाकडाची मोळी आहे हे तो जिवंतपणी दाखवी. विद्यासागर यांच्या अंगावर मोठमोठी वाळके येत. एकदा त्यांच्या पाठीवर एक मोठे थोरले वाळूक आले होते. ते कापून टाकायचे होते. म्हणून एकदा एक डॉक्टर विद्यासागरांकडे आला होता. त्याच वेळेस विद्यासागरांकडे कोणी दोघं भाऊ आपली मालमत्ता कशी वाटावी हे ठरविण्यासाठी आले होते. विद्यासागर हे मध्यस्थ किंवा पंच होते. विद्यासागर या आलेल्या बंधुद्वयाजवळ बोलत होते व डॉक्टर पाठीवर शस्त्रक्रिया करीत होता. शस्त्रक्रिया संपली, परंतु विद्यासागरांचे तिकडे लक्षही नव्हते. किती सहनशीलता! ‘सुखदुःखे समेकृत्वा’ असे जीवन चालविणारे विद्यासागर स्थितप्रज्ञच नव्हते तर काय म्हणावयाचे?