"बोल … काय हवं तुम्हाला ?" अश्वत्थाम्याने विचारले. "लवकर … सांगा".
"माझी एकाच इच्छा आहे . फक्त एकच"
"कोणती?"
"मला धन, जडजवाहीर काही नको "
"मग?"
"पुरी कराल माझी इच्छा ?"
"होय. करीन, नक्की करीन"
"मग ऐका तर…. "
अश्वत्थामा कान देऊन लक्षपूर्वक ऐकू लागला
"थोडं चमत्कारिक आणि जगावेगळं मागणं आहे माझं…. "
"ते कसंही असो; पण लवकर सांगा "
""मला महाभारतकाळात घडलेलं भारतीय युध्द 'याचि देही याचि डोळा' बघायची इच्छा आहे… ""
"तुमचं मागणं विलक्षण आहे "
"ते मी आधीच सांगितलं होतं "
अश्वत्थामा विचारात पडला . बराच वेळ गप्प राहिला.
"का?,आपण काहीही माग म्हणाला होतातना ना ?" जोशी मास्तरांनी त्याला बोलतं करण्यासाठी विचारलं.
"तुमचं मागणं विलक्षण आहे एवढंच म्हणालो मी . मला ते पुरं करता येणार नाही असा माझ्या म्हणण्याचा अर्थ न्हवता….पण …"
"मग..हा 'पण' कशासाठी?"
"एक गोष्ट लक्षण ठेवा . महाभारत काळात घडलेलं प्रसिध्द भारतीय युध्द, मी आपणाला जरूर दाखविण; परंतु अर्जुन ज्यावेळी रथात बसून युद्धासाठी येयील व युध्द सुरुवात करण्यापूर्वी आपल्या हातातील शंख जोराने फुंकिल, त्यावेळी पृथ्वीचा थरकाप उडवून टाकणारा तो आवाज तुम्हाला सहन व्हायचा नाही. तुम्ही बेशुध्द पडल तो ऐकून."
मास्तर किंचित विचारात पडले; परंतु लगेच म्हणाले," मी बेशुध्द पडलो तरी चालेल ; परंतु ते युध्द प्रत्यक्षात पाहायचंच आहे मला…मग माझे काय वाट्टेल ते होवो !"
"पहा पुन्हा एकदा निट विचार करा. "
"माझा विचार आता बदलायचा नाही ."
"ठीक अहे." असं म्हणून अश्वत्थाम्याने काही मंत्र म्हणून मास्तरांच्या भोवती एक वर्तुळ काढलं नि तो म्हणाला ," या वर्तुळाच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही. टाकलंत तर फुकट मराल …?"
"ठीक आहे. नाही टाकणार "
त्यानंतर अश्वत्थाम्याने आणखी एक मंत्र म्हंटला . त्याबरोबर मास्तरांच्या डोळ्यासमोर सिनेमाप्रमाणे भारतीय युद्धाचा देखावा दिसावयास सुरवात झाली.
प्रथम कौरव -पांडवंची सैन्ये एकमेकांच्या दिशेने येताना दिसली.
त्यात हजारो रथ, घोडे व हत्ती होते. अतिशय वेगात असल्याने सारा आसमंत धुळीने भरून गेला होता ; परंतु एखाद्या प्रखर दिव्याचा झोत पडावा त्याप्रमाणे कुठूनतरी त्या दृश्यावर लख्ख प्रकाश पडला व मास्तरांना हुबेहूब सिनेमात पाहिल्याप्रमाणेच पुढची दृश्ये दिसू लागली.
तेवढ्यात एका बाजून महाधनुर्धर अर्जुनाचा रथ येताना दिसला. मास्तर डोळ्याची पापणीही न हलवता तो सारा प्रकार विलक्षण कुतूहलाने पाहत होते.
अर्जुनाच्या रथाचे सारथ्य भगवान श्रीकृष्ण करीत होते व त्याच्या रथाच्या ध्वजाचे रक्षण महावीर हनुमान करत होता .
तेवढ्यात … दोन्ही सैन्ये समोरासमोर येउन थडकली व आता युद्धाला सुरवात होणार तोच….
अर्जुनाने रथात उभे राहून आपल्या हातातील शंख फुंकावयास सुरवात केली तो आवाज प्रलयकाळच्या मेघगर्जनेप्रमाणे महाभयंकर होता.
आणि … तो आवाज कानी पडताच अश्वत्थाम्याने सांगितल्याप्रमाणे जोशी मास्तरांची शुद्ध खरोखरच हरपली. ते जगाच्या जागीच कोसळले….!"
त्यानंतर काय घडले जोशी मास्तरांना ठाऊक नाही. ते शुद्धीवर आले तेव्हा चक्क एका दवाखान्यात होते व त्यांच्याभोवती मित्रपरिवार व नातेवाईक यांचा जागता पहारा होता ! .
अश्वत्थामा अजूनही भेटतो हे सत्य नाकारता येणार नाही.
कारण अश्वत्थामा भेटल्याचा उल्लेख आणखीही काही ठिकाणी सापडतो. श्रीवासुदेवानंद सरस्वती उर्फ श्रीटेंबेस्वामी महाराज यांच्या चरित्रात त्यांना अश्वत्थामा भेटल्याबद्दलचा पुढील उल्लेख आहे ……
"शके १८३४ मध्ये इंदूर संस्थानातील चिखलदा येथील चातुर्मास संपवून महाराज कातरखेडामधील शुलपाणीश्वरास वंदन करून अरण्यातून गरुडेश्वराकडे निघाले . शुलपाणीश्वराच्या जंगलात अश्वत्थामा वास करतो. हे अरण्य अतिशय घोर असून तेथे चालण्यासाठी साधी पाऊलवाटही नाही. तेथून जात असता एका भिल्लाने महाराजांना "आपणास कोठे जावयाचे आहे?" असा प्रश्न केला ..
महाराज ,म्हणाले "मी गरुडेश्वरास निघालो आहे."
"मग आपण माझ्या पाठोपाठ या ." तो भिल्ल म्हणाला व पुढे चालू लागला. महाराज त्याच्या पाठोपाठ निघाले.
गरुडेश्वर आल्यावर तो भिल्ल म्हणाला."ते समोर जे मंदिर दिसते आहे तेथे चला " असे सांगून तो पुन्हा पुढे निघाला.
इतक्यात महाराजांना काही संशय येउन म्हटले," तू कोण आहेस हे खरे खरे सांग बरं ".
त्यावर तो भिल्लवेषधारी मनुष्य म्हणाला ," मी अश्वत्थामा असून या जंगलात राहतो " एवढंच सांगून तो तसाच पुढे निघाला व दिसेनासा झाला.
सांगायचा मुद्दा इतकाच , की अश्वत्थामा अजूनही भेटतो हि गोष्ट मला तरी कल्पित वाटत नाही.
श्रीकृष्णाच्या शापाप्रमाणे तो अजूनही मुक्तीच्या क्षणाची वाट पाहत खरोखरीच अजूनही फिरत असेल व त्याला आपली भाषा समजत असेल तर त्याची प्रत्यक्ष भेट घेण्याचे धाडस एखाद्या इतिहास संशोधकाने का करू नये ? कारण त्याच्या सुदैवाने त्याला अश्वत्थामा भेटलाच तर त्याच्या तोंडून महाभारताकालीनच नव्हे, तर त्यानंतरच्या काळातीलही अनेक गोष्टी ऐकायला मिळतील व नवी माहिती प्रकाशात येईल . अश्वत्थामा खूप ज्ञानी आहे , तो भेटलाच तर एखाद्या शास्त्रज्ञाला त्याच्याकडून काळाच्या ओघात लुप्त झालेली शास्त्रे व प्राचीन विज्ञान ही पुन्हा अवगत करता येईल .
मोठमोठी उंच शिखरे सर करण्याचे धाडस ज्याप्रमाणे काही धाडसी लोक करतात त्याचप्रमाणे शूलपाणीश्वराच्या घनदाट जंगलात केवळ अश्वत्थाम्याला भेटण्यासाठी महिन दोन महिने मुक्काम करण्याचे धाडस कुणीच का करू नये ?
माझी हि कल्पना कुणाला हास्यास्पद वाटेल; परंतु सत्याचा शोध घेण्यासाठी अशा काही धाडसी कल्पना प्रत्यक्षात उतरविणे हा एकाच मार्ग आहे, असे मला तरी वाटते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.