मृत्युनंतर पुन्हा जिवंत झाले होते कर्ण, दुर्योधन आणि भीष्म हे तर सर्वांनाच माहिती आहे की, महाभारत युद्धामध्ये पांडवांनी भीष्म, द्रोणाचार्य, दुर्योधन, कर्ण इ. योद्धांचा वध केला होता. परंतु एक सत्य फार कमी लोकांना माहिती असावे की, महाभारत युद्धात मारले गेलेले सर्व वीर एक रात्रीसाठी पुनर्जीवित झाले होते. ही गोष्ट वाचायला थोडी विचित्र वाटेल, परंतु या घटनेचे पूर्ण वर्णन महर्षी वेदव्यास रचित महाभारत ग्रंथाच्या आश्रमवासिक अध्यायामध्ये आढळून येते. ही घटना विस्तृतपणे अशाप्रकारे - जेव्हा धृतराष्ट, गांधारी आणि कुंती वानप्रस्थ आश्रमात वास्तव्यास होते, तेव्हा युधिष्ठीर कुटुंबीयांसोबत त्यांना भेटण्यासाठी गेले. त्यावेळी तेथे महर्षी वेदव्यासही आले. त्यांनी आपल्या तपोबळावर एक रात्रीसाठी युद्धामध्ये मारल्या गेलेल्या वीरांना पुन्हा जिवंत केले. या संपूर्ण घटनेचे वस्तृत वर्णन खालीलप्रमाणे आहे... 15 वर्ष युधिष्ठीरासोबत राहिले धृतराष्ट्र:- महाभारत युद्धानंतर युधिष्ठीर हस्तिनापुरच्या सिंहासनावर विराजमान होऊन धर्मपूर्वक शासन करू लागले. युधिष्ठीर दररोज धृतराष्ट्र आणि गांधारीचा आशीर्वाद घेऊनच इतर कामांना सुरवात करत होते. त्याचप्रकारे अर्जुन, नकुल, सहदेव, द्रौपदी हे सर्वजण धृतराष्ट्र आणि गांधारीच्या सेवेत उपस्थित होते. परंतु भीमाच्या मनामध्ये धृतराष्ट्रांबद्दल द्वेषभाव होता. कधीकधी भीम धृतराष्ट्रांसमोर कटू शब्द बोलत होते. अशाप्रकारे धृतराष्ट्र, गांधारी पांडवांसोबत 15 वर्षे राहिले. एके दिवशी भीम धृतराष्ट्र आणि गांधारीला खूप वाईट शब्द बोलून गेला. भीमाचे शब्द ऐकून धृतराष्ट्र आणि गांधारीला खूप दुःख झाले. त्यामुळे धृतराष्ट्र यांनी वानप्रस्थ आश्रमात (वनवास) राहण्याचा निश्चय केला. धृतराष्ट्र, गांधारीसोबत विदुर आणि संजय यांनी वनवासात जाण्याचा निर्णय घेतला. धृतराष्ट्रसोबत वनामध्ये गांधारी, कुंती आणि विदुर गेले:- वनवासात जाण्याचा निश्चय केल्यानंतर धृतराष्ट्रने युधिष्ठीरला बोलावून आपला निर्णय सांगितला. हे ऐकून युधिष्ठीरला खूप दु:ख झाले परंतु महर्षी वेदव्यासांनी सांगितल्यानंतर युधिष्टिर तयार झाले. धृतराष्ट्रसोबत गांधारी, विदुर, संजय हेसुद्धा जात असल्याचे समजल्यानंतर युधिष्टिरला शोक अनावर झाला. धृतराष्ट्रांनी सांगितले की, आम्ही कार्तिक मास पौर्णिमेला वनवासात जाण्यासाठी निघणार आहोत. वनवासात जाण्यापूर्वी धृतराष्ट्रने आपले मुलं आणि इतर कुटुंबियांचे श्राद्ध करण्यासाठी युधिष्ठीराकडे थोडेसे धन मागितले. द्वेषापोटी भीमाने धन देण्यास नकार दिला. तेव्हा युधिष्ठीराने भीमाला खडसावले आणि धृतराष्ट्रांना भरपूर धन देऊन श्राद्धकर्म पूर्ण केले. ठरलेल्या दिवशी धृतराष्ट्र, गांधारी, विदुर, संजय सर्वांनी यात्रेला सुरुवात केली. या सर्वांना वनामध्ये जाताना पाहून माता कुंतीनेसुद्धा वनामध्ये जाण्याचा निश्चय केला. पांडवांनी कुंतीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला परंतु कुंती धृतराष्ट्र, गांधारीसोबत वनवासात गेल्या. एक वर्षानंतर धृतराष्ट्र यांना भेटण्यासाठी गेले युधिष्ठीर:- धृतराष्ट्र आणि इतर सर्वांनी पहिली रात्र गंगा नदीच्या काठावर व्यतीत केली. त्यानंतर हे सर्वजण कुरुक्षेत्रला आले. तेथे महर्षी वेदव्यास यांच्याकडून वनवासाची दीक्षा घेऊन हे सर्वजण महर्षी शतयुप यांच्या आश्रमामध्ये राहू लागले. वनवासात राहात असताना धृतराष्ट्र घोर तपश्चर्या करू लागले. तपश्चर्येमुळे त्यांच्या शरीरावरील मांस वाळून गेले. डोक्यावर जटा निर्माण झाल्या. तपश्चर्येमुळे त्यांच्या मनातील मोह दूर झाला. गांधारी आणि कुंतीसुद्धा तपश्चर्येमध्ये लीन झाल्या. विदुर आणि संजय यांची सेवा करत होते. अशाप्रकारे वनवासात या सर्वांना एक वर्ष पूर्ण झाले. इकडे राजा युधिष्ठीरला वनामधील सर्व कुटुंबियांना भेटण्याची इच्छा झाली. त्यानंतर युधिष्ठीर सर्व भावंडांसोबत धृतराष्ट्र, गांधारी, कुंती या सर्वांना भेटण्यासाठी निघाले. युधिष्ठीरच्या शरीरात समाविष्ट झाले होते विदुराचे प्राण:- पांडव सैन्यासोबत धृतराष्ट्र, गांधारी, कुंती वास्तव्यास असलेल्या ठिकाणी पोहोचले. त्या सर्वांना पाहून युधिष्ठीरला खूप आनंदही झाला आणि साधूंच्या वेशात आपल्या कुटुंबियांना पाहून दुःखही झाले. धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती यानांही पांडवांना पाहून खूप आनंद झाला. तेथे विदुर न दिसल्यामुळे युधिष्ठीरने त्यांच्याविषयी धृतराष्ट्रांकडे विचारणा केली. धृतराष्ट्रांनी सांगितले की, ते कठोर तप करत आहेत. तेव्हा युधिष्ठीरला विदुर त्यांच्याकडे येत असल्याचे दिसले, परंतु आश्रमात एवढे लोक पाहून ते पुन्हा मागे फिरले. युधिष्टिर त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या मागे धावले. तेव्हा एका झाडाखाली विदुर त्यांना उभे असलेले दिसले. त्यावेळी विदुरांच्या शरीरातील प्राण युधिष्ठीरमध्ये सामावला. जेव्हा युधिष्ठीरच्या लक्षात आले की विदुराच्या शरीरात प्राण नाहीत, तेव्हा त्यांनी त्यांचा अंत्यविधी करण्याचे ठरवले. तेवढ्यात एक आकाशवाणी झाली की, विदुर सन्यास धर्माचे पालन करत असल्यामुळे त्यांचा अंत्यविधी करणे योग्य नाही. ही सर्व घटना युधिष्ठीरने धृतराष्ट्र यांना सांगितली. यमदेवाचे अवतार होते विदुर:- पांडवानी ती रात्र वनामध्येच व्यतीत केली. दुसर्‍या दिवशी आश्रमात महर्षी वेदव्यास आले. विदुराने शरीराचा त्याग केल्याचे त्यांना समजल्यानंतर त्यांनी सांगितले की, विदुर धर्मराज (यमदेव)चे अवतार होए आणि युधिष्ठीरसुद्धा धर्मराज यांचाच अंश आहे. यामुळे विदुराचे प्राण युधिष्ठीरच्या शरीरात समाविष्ट झाले. महर्षी वेदव्यास धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंतीला म्हणाले की, आज मी तुम्हाला माझ्या तपश्चर्येचा प्रभाव दाखवणार आहे. तुमच्या मनातील कोणतीही इच्छा मी पूर्ण करेल. तेव्हा धृतराष्ट्र आणि गांधारीने युद्धामध्ये मारले गेलेल्या अापत्यांना आणि कुंतीने कर्णाला पाहण्याची इच्छा व्यक्त केली. महर्षी वेदव्यास म्हणाले की, युद्धामध्ये मारले गेलेले सर्व वीर तुम्हाला आज रात्री दिसतील. असे म्हणून महर्षी वेदव्यासांनी त्या सर्वांना गंगेच्या काठावर येण्यास सांगितले. विधवा स्त्रियांनी आपल्या पतींसोबत गंगेमध्ये प्रवेश केला :- रात्र झाल्यानंतर महर्षी वेदव्यासांनी गंगा नदीमध्ये प्रवेश करून पांडव आणि कौरवांच्या सर्व मृत योद्धांचे आवाहन केले. थोड्याच वेळात भीष्म, द्रोणाचार्य, कर्ण, दुर्योधन, दुःशासन, अभिमन्यु, धृतराष्ट्रचे सर्व पुत्र, घटोत्कच, द्रौपदीचे पाच पुत्र, राजा द्रुपद, शकुनी, शिखंडी इ, वीर गंगेतून बाहेर आले. त्या सर्वांमध्ये कोणत्याही प्रकारचा अहंकार आणि क्रोध नव्हता. महर्षी वेदव्यासांनी धृतराष्ट्र आणि गांधारीला दिव्य नेत्र प्रदान केले. आपल्या मृत कुटुंबियांना पुन्हा जिंवत पाहून सर्वांना खूप आनंद झाला. तेव्हा महर्षी वेदव्यासांनी तेथे उपस्थित असलेल्या सर्व विधवा स्त्रियांना सांगितले की, ज्यांना आपल्या पतीसोबत जाण्याची इच्छा असेल त्यांनी गंगेमध्ये डुबकी लावावी. महर्षी वेदव्यासांच्या सांगण्यावरून पतीवर प्रेम असणार्‍या सर्व स्त्रियांनी गंगेत डुबकी लावली आणि शरीर सोडून पतीलोकात गेल्या. अशाप्रकारे ती अद्भुत रात्र समाप्त झाली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel