पिशाच्च म्हंटले म्हणजे ते त्रास देणारेच असणार, असा जो समाज आपल्याकडे रूढ आहे तो तितकासा बरोबर नाही. अगदी अलीकडे अशीच एक विलक्षण हकीकत एका विश्वसनीय गृहस्थाकडून ऐकावयास मिळाली. हि हकीकत आहे पिशाच्चयोनीत गेलेल्या एका ब्रम्ह्सम्बंधाची या ब्रम्हसंबंधाला प्रत्यक्ष पाहिलेले अनेक लोक आज हयात आहेत. या ब्रम्हसंबंधाला आपण दादाजी म्हणूया. या दादाजींचे खरे नाव मला ठाऊक आहे; परंतु ते प्रसिद्ध व्हावे अशी खुद्द दादाजीचीच इच्छा नसल्याने मी या टोपण नावाचाच येथे उपयोग करणार आहे. खरे तर आपल्या बद्दल ची कोणतीच हकीकत प्रसिद्ध व्हावी अशी दादाजींची इच्छा नाही; परंतु एका गूढ योनी संबंधी वाचकांना चार गोष्टी समजाव्यात या इच्छेने प्रेरित होऊन हि हकीकत प्रसिद्ध करण्याचे धाडस मी करीत आहे. असो. दादाजींच्या सांगण्याप्रमाणेते आज सुमारे चारशे वर्षापासून या विलक्षण योनीत वायुरूपाने फिरत आहेत. मुक्तीच्या क्षणाची वात पाहत. कारण मुक्तीच्या क्षणाची त्यांना अतिशय तीव्र ओढ लागली आहे. परंतु तो क्षण किती दूर आहे हे त्यांनाच ठाऊक नाही. कारण मुक्त होणे त्यांच्या हातात नाही. या पिशाच्चयोनीत अवतीर्ण होणे तरी त्यांच्या इच्छेवर कुठे अवलंबून होते ? त्या जगनियन्त्याने ठरवून ठेवलेल्या काही नियमानुसार मृत्युनंतर त्यांना हि भयानक, गूढ योनी प्राप्त झाली. अशा या दादाजींची सगळीच हकीकत हृदय हेलावून टाकणारी आहे. त्यांचा मृत्यू झाला सुमारे चारशे वर्षापूर्वी. हा मृत्यू नैसर्गिक नव्हता. तसे असते तर त्यांना हि भयानक योनी प्राप्त झालीही नसती; परंतु त्यांना जाणूनबुजून ठार करण्यात आले. ऐन उमेदीच्या काळात त्यांचा जीव घेण्यात आला. त्यामुळे त्यांच्या वासना अतृप्त राहणे साहजिकच होते व कदाचित त्यामुळे त्यांना हि पिशाच्चयोनी प्राप्त झाली असणे शक्य आहे. दादाजी हे दशग्रंथी ब्राम्हण होते एवढे सांगितल्यावर त्यांच्या विद्वत्तेविषयी वेगळे काही सांगण्याचे कारण नाही. त्यांच्याजवळ अमाप धन होते. हे धन त्यांनी आपल्या चौसोपी वाड्याच्या तळघरात नित बंदोबस्तात ठेवलेले होते. दादाजींच्या घरात त्यांची पत्नी, एक विधवा बाई व तिचा मुलगा, एवढी मंडळी होती. हि विधवा बाई दादाजींच्या दूरची नातलग होती व वैधव्य प्राप्त झाल्यानंतर घरच्या गरिबीच्या परिस्थितीमुळे दादाजींच्या आश्रयाला येउन राहिली होती. एक दिवस दादाजींची पत्नी व मुले परगावी गेली होती. घरात होती फक्त दोनच माणसे. दादाजी आणि ती विधवा नातलग स्त्री. त्या दिवशी दुपारी दादाजींना काही काम नव्हते, म्हणून ते तळघरात गेले व आपल्या अफाट संपत्तीचे मोजमाप करू लागले. आणि इकडे त्या विधवा स्त्री च्या मनात पाप आले. ती अफाट संपत्ती आपल्या मुलास मिळावी अशी तिची फार दिवसापासूनची इच्छा होती; परंतु ती सफल होणे तितकेसे सोपे नव्हते. कारण दादाजी काही निपुत्रिक नव्हते. मग अशा परिस्थितीत तिचा हेतू सध्या कसा व्हावा ? त्या दिवशी दादाजी तळघरात गेल्यावर तिच्या सुप्त इच्छेने पुन्हा उचल खाल्ली आणि तिने एक दुष्ट बेत आखला. ती हळूच तळघराच्या दरवाज्यापाशी आली आणि तिने तो दरवाजा बाहेरून कडी घालून बंद करून टाकला. पैश्याची मोजदाद केल्यानंतर दादाजी तृप्त मानाने दरवाजा उघडण्यासाठी दरवाज्याजवळ आले; परंतु दरवाजा बाहेरून बंद झाला होता. दादाजींनी जोर जोरात दरवाज्यावर धक्के दिले. त्या विधवा स्त्री ला खूप मोठ्याने हाक मारून पाहिल्या. परंतु छे ! कशाचाच उपयोग नव्हता. दादाजी घामाघूम झाले. दरवाजा बंद होण्यामागचे रहस्य त्यांना उलगडेना आणि तो दरवाजाही काही केल्या उघडेना. आता आपला येथेच मृत्यू होणार हि गोष्ट त्यांनी ओळखली आणि त्या मृत्युच्या कल्पनेने त्यांच्या अंगावर शहारे आले. भरला संसार अर्ध्यावर सोडून जायला त्यांचे मन तयार हित नव्हते; परंतु जगण्याची तर काहीच आशा दिसत नव्हती. त्यांचा तो भव्य वाद गावाच्या एका कोपऱ्यात होता. त्यामुळे त्यांनी तळघरातून जीव तोडून मारलेल्या हाकही कुणाला ऐकू जाणे शक्य नव्हते. अखेर दादाजींना त्या तळघरातच पृत्युला मिठी मारावी लागली. त्यांचा निष्प्राण देह दाराजवळ गळून पडला. त्यानंतर त्या विधवा स्त्री ने दरवाजा उघडून दादाजींची खूपशी संपत्ती पळवली.. - आणि इकडे मृत्युनंतर दादाजींना ती भयानक गूढ योनी प्राप्त झाली. ती योनी प्राप्त झाल्यावर त्यांनी पहिली गोष्ट कोणती केली असेल तर आपल्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या त्या दुष्ट व कपटी स्त्रीचा खून ! तिला विविध मार्गांनी त्रास देऊन त्यांनी तिचा मृत्यू घडवून आणला... आणि इथेच त्यांचे चुकले, कारण त्यामुळेच या विलक्षण योनीत ते इतकी वर्षे खितपत पडले आहेत. हे असे का व्हावे ? आपल्या मारेकऱ्याला त्यांनी ठार मारले यात खरोखर त्यांचे काय चुकले? दादाजी म्हणतात. "तेथेच तर सगळे चुकले! कारण त्या स्त्रीला तिच्या पापक्रुत्यांची शिक्षा देण्याचा अधिकार त्या जगनियन्त्याचा होता, माझा नव्हता. मी तो अधिकार आपल्या हातात घेतला नसता तर त्या भयानक योनीतून माझी मुक्तता कदाचित खूपच लवकर झाली असती.." आणि याच गोष्टीचा त्यांना आज पश्चाताप होतो आहे आणि हे पाप धुवून काढण्यासाठी आर्त, दुखी लोकांना मदत करण्याचे कार्य ते इतकी वर्षे सातत्याने करीत आहेत. या पुण्यसंचायामुळेआपण लवकरच मुक्त होऊ, अशी आशा त्यांना वाटत आहे.. दादाजी पिशाच्चयोनीत राहून दुसऱ्यांना मदत कशी करतात, असा प्रश्न कुणाला पडण्याचा संबंध आहे. त्याचे उत्तर असे, कि भूत-पिशाच्चाने पछाडलेले; करणी, भानामतीच्या त्रासाने पिडलेले किवा असाध्य रोगांनी गांजलेले लोक पुष्कळ असतात. दादाजी एका शिक्षकाच्या अंगात संचार करून या लोकांना या पीडेतून मुक्त होण्यासाठी मार्गदर्शन करतात. त्याचा लोकांना उपयोग होतो, त्यांची पिडा दूर होते आणि दादाजींच्या पुण्यसंग्रहात भर पडत जाते. काही वेळा दादाजी घन स्वरुपात प्रकट होऊन स्वत:देखील मार्गदर्शन करतात. ते प्रकट होतात त्या वेळी त्यांचा देह मनुष्य देहाप्रमाणेच दिसतो. वाढलेल्या जटा, दाढी, पांढरेशुभ्र उपरणे आणि पायात टकटक वाजणाऱ्या खडावा, असा त्यांचा एकंदर वेश असतो. त्यांचा देह रात्रीच्या अंधारातच स्पष्ट दिसतो. त्या देहाला सर्व अवयव असतात. नसतात फक्त डोळे. त्या जागी नुसत्याच खाचा असतात. म्हणून दादाजी डोळ्यांवरून फडके गुंडाळून घेतात. कुणाला वाटेल, कि ते ब्रम्हसंबंध असल्यामुळे त्यांच्या दर्शनाने भीती वाटत असेल; परंतु तसे मुळीच नाही. ज्यांनी त्यांना प्रत्यक्ष पहिले आहे असे माझे एक परिचित मला म्हणाले, "त्यांच्या दर्शनाने मला तरी भीती वाटली नाही. उलट त्यांच्या प्रेमळ, मायाळू स्वभावामुळे मला त्यांच्या बद्दल आपुलकीच वाटली. घरातले एखादे वृद्ध आजोबा नातवंडाशी प्रेमाने बोलावेत त्याप्रमाणे ते माझ्याशी बोलत होते..." ------उर्वरित कथा पुढच्या भागात-----
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel