१. ‘शिव’ या शब्दाचा अर्थ ‘शिव’ या शब्दाचा अर्थ ‘मंगलमय आणि कल्याणस्वरूप’ असा आहे. २. शिवाला प्रार्थना करणे का आवश्यक आहे ? हिंदु धर्मातील देवता प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि शांती मिळावी, यासाठी शक्ती देतात; पण यासाठी आपण देवतांची उपासना (म्हणजे प्रार्थना) करायला हवी. प्रार्थना हे देवतांना प्रसन्न करण्याचे सहज आणि सोपे साधन आहे. शिवालाही प्रार्थना केल्यास तो लवकर प्रसन्न होऊन कृपा करतो. ३. शिवाची प्रचलित नावे आणि त्यांचा भावार्थ ३ अ. महादेव : शिवामध्ये परिपूर्ण पावित्र्य आणि ज्ञान आहे. यासाठी आपण त्याला ‘महादेव’ म्हणतो. मित्रांनो, अशा महादेवाची उपासना केली, तर आपणही परिपूर्ण होऊ शकतो. ३ आ. त्रिनेत्र : शंकराला ‘त्रिनेत्र’ असेही म्हणतात. जो भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांतील सर्व घटना पाहू शकतो, त्याला ‘त्रिनेत्र’ असे म्हटले जाते. ३ इ. कर्पूरगौर : शिवाचा रंग कापरासारखा आहे; म्हणून त्याला ‘कर्पूरगौर’ असे म्हणतात. ४. शिवाच्या भाळी असणारी चंद्रकोर, तसेच व्याघ्रांबर यांची वैशिष्ट्ये ४ अ. चंद्रकोरीचे वैशिष्ट्य आणि तिच्याशी संबंधित गुण : शिवाच्या मस्तकावर चंद्रकोर आहे. ती चंद्रकोर शिवामधील ममता, क्षमाशीलता आणि वात्सल्य हे गुण दर्शवते. त्या गुणांचे पुढे विश्लेषण केले आहे. ४ अ १. ममता : ममता म्हणजे प्रेम ! आपल्यामध्ये इतरांविषयी पुष्कळ प्रेम असायला हवे. आजची मुले एकमेकांना विकृत पद्धतीने मारतात. चेष्टा-मस्करी करतात. ही ममता आहे का ? नाही ना ? आपण सर्वांशी प्रेमाने वागायला हवे. सर्वांना साहाय्य करायला हवे. लहानथोरांशी नम्रपणे बोलले पाहिजे. असे केल्याने शिवाची कृपादृष्टी सदोदित टिकून राहील. ४ अ २. क्षमाशीलता : एखाद्या मित्राकडून चूक झाली, तर आपण त्याला क्षमा करायला हवी. सध्या मुले लहान-लहान कारणांवरून लगेच मारामारी करतात. ज्याच्यामध्ये क्षमाशीलता आहे, तो शांतपणे स्वतःची चूक सांगतो आणि स्वतःलाच सुधारण्यासाठी प्रयत्न करतो. अशा मुलांवर शिवाची कृपा जलद होते. सर्वांनीच यासाठी प्रयत्न करायला हवा. ४ अ ३. वात्सल्य : वात्सल्य म्हणजे सर्वांवर आईप्रमाणे प्रेम करणे ! हा शिवाचा गुण असून तो आपल्यात आणण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपण जवळच्या मित्रावर अधिक प्रेम करतो; पण इतरांवर तसे करत नाही. असा दुजाभाव शिवाकडे नाही. तो सर्वांवर समान प्रेम करतो. ४ आ. व्याघ्रांबर : वाघ हा क्रूरतेचे प्रतीक आहे. अशा क्रूर वाघाला मारून शिवाने त्याचे आसन बनवले. मुलांनो, आपल्यातील दुर्गुण हेच आपल्याला क्रूर बनवतात. ते आपल्याला आनंदी आणि आदर्श जीवनापासून दूर नेतात. अशा दुर्गुणांना नष्ट करून स्वतःचे जीवन आनंदी करायचे आहे. ५. शिवाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये ५ अ. महातपस्वी आणि महायोगी : सतत नामजप करणारा ‘शिव’ हा एकच देव सतत ध्यानमुद्रेत आणि आसनस्थ असतो. आपल्याला देव हवा आहे किंवा देवासारखे व्हायचे आहे, तर सतत त्याचे नामस्मरण करायला हवे. नामस्मरण केल्यास दुर्गुण नष्ट होऊन आपणही आनंदी होऊ; पण यासाठी सतत नामजप करण्याचा प्रयत्न करायला हवा. काही मुले एकमेकांना शिव्या देणे, आई-वडिलांच्या नावाने चिडवणे, असे अनुचित प्रकार करतात. आपण सतत नामजप केला, तर आपल्या बोलण्यात गोडवा आणि नम्रता येऊन इतरांचेही लाडके होता येईल. यासाठी येत्या शिवरात्रीला सर्वांनीच नामजप करण्याचा निश्चय करावा. ५ आ. दुसर्‍याच्या सुखासाठी कोणताही त्रास भोगण्यास सिद्ध असणारा : समुद्रमंथनातून उत्पन्न झालेले विष सर्व विश्वाला जाळत होते. कोणतीही देवता त्याचा स्वीकार करायला सिद्ध नव्हती. त्या वेळी शिवाने ते विष स्वीकारले आणि पचवलेही. अन्यथा विश्वाचा विनाश झाला असता. शिवाने ते विष घेऊन विश्वाला विनाशापासून वाचवले. ५ आ १. ‘दुसर्‍यांसाठी त्रास सहन करणे’, हा व्यापक विचार मुलांमध्ये निर्माण झाला, तरच सर्व समस्या सुटून राष्ट्र आणि समाज आनंदी होऊन शिवाची कृपा होणार असणे : शिव दुसर्‍यांच्या कल्याणासाठी कोणताही त्रास भोगण्यास सिद्ध असतो. आपणही इतरांच्या आणि राष्ट्राच्या कल्याणासाठी सर्वस्वाचा त्याग करायला हवा. आज आपण काय पहातो ? प्रत्येक जण ‘मी आणि माझे कुटुंब’, अशा स्वार्थी वृत्तीने वागत आहे. कुणीही राष्ट्र आणि समाज यांचा विचार करत नाही. समाजामध्ये दुसर्‍यांसाठी त्रास घ्यायची नव्हे, तर इतरांना त्रास देण्याची वृत्ती बळावत आहे. शाळेत मुले इतरांना मारणे, धमकावणे असे प्रकार करतात. अशांवर शिवाची कृपा होईल का ? ‘दुसर्‍यांसाठी त्रास सहन करणे’, हा व्यापक विचार मुलांमध्ये निर्माण झाला, तरच सर्व समस्या सुटून राष्ट्र आणि समाज आनंदी होईल. छत्रपती शिवरायांनी स्वराज्यासाठी अनेक त्रास सहन केले; कारण इतरांसाठी कोणताही त्रास सहन करण्याची वृत्ती त्यांच्यात होती. हाच खरा त्याग आहे. . ५ इ. क्रोधिष्ट - कुणी ध्यान खंडित केल्यास नामजपाने निर्माण झालेल्या शक्तीने समोरचे सर्व भस्मसात करणे आणि स्वतःहून ध्यान सोडल्यास तसे न होणे : ‘शिव’ म्हणजे रागीट’, असा आपला समज झालेला असतो. प्रत्यक्षात खरंच तसे आहे का ? आपण ऐकले असेल, ‘शिवाने तिसरा डोळा उघडला की, सर्व भस्मसात होते.’ जो देव इतरांसाठी विष पचवतो, तो असे करेल का ? नाही ना ? शिव सतत ध्यानावस्थेत नामजप करत असतो. नामजप केल्याने पुष्कळ शक्ती निर्माण होते. कुणी त्याचे ध्यान खंडित केल्यास तो तिसरा डोळा उघडतो. नामजपाने निर्माण झालेल्या शक्तीने समोरचे सर्व काही भस्मसात होते. त्याने स्वतःहून ध्यान सोडले, तर काही होत नाही; कारण त्या शक्तीवर त्याचे नियंत्रण रहाते. ५ ई. भक्तीमुळे सहज प्रसन्न होणारा : सर्वांनी भावपूर्ण प्रार्थना आणि नामजप केल्यास शिव लगेच प्रसन्न होईल. यासाठी आपण त्याची अधिकाधिक भक्ती करूया. ५ उ. भुतांचा स्वामी : शिव हा भुतांचा स्वामी आहे. देवता सूक्ष्म आणि वायूरूपात असतात, त्याप्रमाणेच अनिष्ट शक्ती (भुते) असतात. काही मुलांना भीती वाटणे, झोपेत वाईट स्वप्ने पडणे, असे त्रास होतात. रात्री अनिष्ट शक्तींचा संचार अधिक असतो. शिव वाईट शक्तींचा स्वामी आहे. आपण प्रतिदिन झोपण्यापूर्वी शिवाचा ५ मिनिटे जप केला, तर कोणतेही वाईट स्वप्ने पडणार नाहीत. नामजप करतांना आपण देवाला बोलावतो. आजपासून सर्वांनीच रात्री झोपण्यापूर्वी शिवाचा जप केला पाहिजे. आपण वाईट शक्तींच्या मालकाला, म्हणचे शिवाला बोलावले, तर नोकराचे, वाईट शक्तींचे त्याच्यापुढे काहीच चालत नाही. ६. शिवाचे कार्य ६ अ. विश्वाचे कार्य (उत्पत्ती, स्थिती आणि लय) पहाणे : मित्रांनो, शिव-पार्वती यांना ‘विश्वाचे आई-वडील’, असे म्हणतात. विश्वाचा संहार झाल्यावर नवनिर्मितीसाठी शिव शक्ती देतो. भारतीय संस्कृतीत आपण `मातृदेवो भव’ आणि ‘पितृदेवो भव' असे म्हणतो. आई-वडील आपल्याला देवासमान आहेत. त्यांच्या माध्यमातून देवच आपला सांभाळ करतो. मुलांनो, विचार करा, ‘आपण आई-वडिलांशी ‘ते देव आहेत’, असा भाव ठेवून वागतो का ?, त्यांना नियमित नमस्कार करतो का ?’ आजपासून सर्वांनी आई-वडिलांना शिव-पार्वतीसमान मानून प्रत्येक कृती त्या भावानेच करण्याचा प्रयत्न करावा. ७. शिवाचे एक रूप - नटराज ७ अ. नृत्य हे ईश्वरभक्तीचे साधन असल्याने त्यातून सर्वांना आनंद अन् शांती लाभणे : शिवाची दोन रूपे आहेत. एक समाधीरूप आणि दुसरे नृत्यरूप. समाधीरूप हे निर्गुण असून नृत्यरूप सगुण आहे. शिवाने आपल्याला नृत्यकला दिली; म्हणून आपण त्याला ‘नटराज’ म्हणतो. आपल्या संस्कृतीप्रमाणे नृत्य हे ईश्वरभक्तीचे एक साधन आहे. नृत्याने आपल्याला देवतांची शक्ती मिळते. नृत्य पहाणार्‍याला आणि करणार्‍याला आनंद अन् शांती लाभते. ७ आ. विदेशी प्रकारचे बीभत्स नृत्य न करणे, हीच खरी शिवभक्ती असणे : आज आपण पाश्चात्त्य लोकांचे अंधानुकरण करत आहोत. ‘पॉप’ आणि ‘रिमिक्स’ यांसारखी विदेशी नृत्ये करून समाजाला आणि स्वतःला दुःखच देत आहोत. हे विदेशी नृत्यप्रकार म्हणजे नटेश्वराचा (शिवाचा) अपमानच आहे. अशी बीभत्स नृत्ये करून आपल्यावर शिवाची अवकृपाच होईल. आजपासून सर्वांनी निश्चय करावा, ‘मी कधीच विदेशी प्रकारचे नृत्य करणार नाही आणि कोणी करत असेल, तर त्यांचे प्रबोधन करीन.’ असे केल्यासच शिवाची कृपा होईल आणि तीच खरी शिवभक्ती आहे. ८. मूर्तीविज्ञान ८ अ. डमरू : शिवाच्या हातात डमरू असतो. डमरूच्या नादातून पूर्ण विश्वाची उत्पत्ती झाली. तसेच ५२ अक्षरांचे मूळ ध्वनी यातूनच निर्माण झाले आहेत. ८ आ. त्रिशूळ : उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीनही अवस्थांचे प्रतीक म्हणजे त्रिशूळ आहे. उत्पत्ती म्हणजे निर्मिती, स्थिती म्हणजे स्थिरता ठेवणे आणि लय म्हणजे नाश. प्रत्येक गोष्टीला या तीन अवस्था असतात, उदा. आपला जन्म होतो म्हणजे उत्पत्ती. त्यानंतर आपण काही वर्षे जीवन जगतो, याला ‘स्थिती’ म्हणतात आणि शेवटी मृत्यू होतो म्हणजे ‘लय’ होतो. ८ इ. परशू : हे अज्ञानाच्या नाशाचे प्रतीक आहे. शिव अज्ञानाचा नाश करतो. अज्ञानाच्या नाशानेच आनंद मिळतो. ९. शिवाची उपासनापद्धत ९ अ. भस्म लावणे : शिवाची उपासना करणारे भस्माचे तीन पट्टे कपाळावर आडवे लावतात. हे तीन पट्टे ज्ञान, पावित्र्य आणि उपासना यांचे प्रतीक आहेत. तसेच यांना ‘शिवाचे तीन डोळे’ असेही संबोधले जाते. ९ आ. रुद्राक्षांची माळ गळ्यात घालणे : ‘शिवपूजा करतांना गळ्यात रुद्राक्षांची माळ अवश्य घालावी. रु ± अक्ष या दोन शब्दांपासून ‘रुद्राक्ष’ हा शब्द निर्माण झाला आहे. (रु ± अक्ष, म्हणजे जो सर्व पाहू आणि करू शकतो, (उदा. तिसरा डोळा) त्याला ‘रुद्राक्ष’ म्हणतात. अक्ष म्हणजे आस. डोळा एकाच अक्षाभोवती फिरतो; म्हणून त्यालाही अक्ष म्हणतात. रुद्राक्ष विश्वातील देवांच्या प्रकाशलहरींचे मानवाच्या शरिरातील नादलहरींत आणि नादलहरींचे प्रकाशलहरीत रूपांतर करतो. यामुळे देवांच्या लहरी मानव ग्रहण करू शकतो आणि मानवाच्या विचारांचे देवाच्या भाषेत रूपांतर होते, म्हणजे रुद्राक्ष एखाद्या दुभाषासारखे काम करतो.) ९ इ. शिवाला त्रिदल बेल वाहणे : कौमार्य, यौवन आणि वृद्धावस्था यांच्या पलीकडे जाऊन ‘आपण आनंदस्वरूप आत्माच आहोत’, याची प्रचीती यावी, या हेतूने आपण शिवाला त्रिदल वाहतो. त्रिदल म्हणजे सत्त्व, रज आणि तम हे तीनही गुण शिवाला अर्पण केल्याचे प्रतीक आहे. १०. शिवाची पूजा कशी करावी ? १० अ. शिवाला बिल्वपत्र वाहण्याची पद्धती : शिवपिंडीवर बिल्वदल त्याचे देठ आपल्याकडे येईल अशा रितीने उपडे वाहतात. अशा प्रकारे बेल वाहिल्याने त्यातून शिवाची जास्त शक्ती प्रक्षेपित होऊन बेल वाहणार्‍याला तिचा लाभ होतो. १० आ. फुले : शिवाला निशिगंध, जाई, जुई आणि मोगरा ही फुले १० च्या पटीत वाहावीत. १० इ. उदबत्ती : केवडा, चमेली किंवा हीना या गंधाच्या उदबत्त्या दोनच्या संख्येत ओवाळाव्यात. १० ई. अत्तर : शिवाच्या उपासनेसाठी केवड्याचे अत्तर वापरतात. १० उ. प्रदक्षिणा कशी घालावी ? : शिवपिंडीला अर्धवर्तुळाकार प्रदक्षिणा घालावी. आपण आज शिवाची उपासना का आणि कशी करावी ?, उपासनेसाठी कोणत्या गोष्टी वापरतात ?, याविषयीची माहिती पाहिली. हिंदु धर्मातील देवतांविषयीची शास्त्रीय माहिती सर्वांनाच असायला हवी; कारण देवतांचे महत्त्व समजल्यानेच आपली देवावरील भाव आणि श्रद्धा वाढते. देवाविषयी प्रेम निर्माण होते आणि आपण योग्य उपासना करू लागतो.’ - courtesy :- श्री स्वामी समर्थ सेवेकरी भक्त सांप्रदाय
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel