दत्तावतारी श्रीमद परमहंस परीवज्रकाचार्य भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज श्रीसदगुरुराज वासुदेवानंद सरस्वती स्वामी (टेंबे स्वामी महाराज) आपण दत्तबावनी, गुरुस्तुती, तुळजाभवानी स्तोत्र, घोरकष्टोद्धारण स्तोत्र, दत्तात्रेय स्तोत्र, मारुती स्तोत्र, दत्त करुणात्रिपदी, समंत्रक श्री गणपती स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्र, अनेक स्तोत्र वाचतो, ऐकतो आणि पठण करतो. परंतु ही कुणी लिहिली आपणास माहित नसतात. दत्तावतारी श्रीमद परमहंस परीवज्रकाचार्य भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज श्रीसदगुरुराज वासुदेवानंद सरस्वती स्वामी (टेंबे स्वामी महाराज) यांनी ही सर्व स्तोत्र लिहिली वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आचार्य परंपरेनुसार व्रत आचरणारे, पायी भ्रमण करणारे व भिक्षा प्राप्त झाली नाही तर एकविस एकविस दिवसांपर्यंत उपवास करणारे कर्मठ संन्यासी होते. मात्र त्याचबरोबर ते शंकराचार्यांसारखे विलक्षण वेदांती, दशग्रंथी वैदिक, संस्कृत साहित्याचे अभ्यासक व संशोधक शास्त्रज्ञ होते. ‘अहो प्रत्यक्ष दत्तस्वरूपम्’ या शब्दांत प. पू. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचे वर्णन १९0७ साली त्यांच्या श्रृंगेरी येथील वास्तव्यात परमाचार्यांनी केले. . सन १८५४ मध्ये कोकणातील सावंतवाडीजवळील माणगाव येथे जन्मलेल्या स्वामी महाराजांनी वयाच्या ३७व्या वर्षी मध्य प्रदेशातील प्रसिद्ध महांकाळेश्वर व ओंकारेश्वर या भागात उज्जयिनी (उज्जैन) येथे संन्यास घेतला आणि बद्रिनाथपासून श्रृंगेरी, तंजावरपर्यंत आणि द्वारका ते जगन्नाथपुरीपर्यंत सगळा प्रदेश आद्य शंकराचार्यांसारखाच पायी फिरून पादाक्रांत केला, अक्षरश: पिंजून काढला. शेवटी (सध्याच्या प्रसिद्ध सरदार सरोवराच्या जवळ असलेल्या) गरुडेश्वर या ठिकाणी १९१४ मध्ये त्यांनी समाधी घेतली. गुजरातमधल्या नर्मदाकिनारी निबिड अरण्यात असलेल्या या स्थानाला आज गुजरातमध्ये दत्तक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृसिंहवाडी व औदुंबर या दत्तक्षेत्रांप्रमाणे गरुडेश्वर क्षेत्राला गुजरातमध्ये महत्त्व प्राप्त होऊन असंख्य भाविकांची तेथे वर्दळ सुरु असते. महाराष्ट्रात जन्म घेऊन नर्मदाकिनारी गुजरातमध्ये शंभर वर्षांपूर्वी ज्यांनी देहत्याग केला, त्या एका मराठी संतांचे कर्तृत्व हे खरोखरच स्तिमित करणारे आहे. स्वामी महाराजांचा उल्लेख त्यांच्या समकालीन असणार्या संतश्रेष्ठ शिर्डीचे श्री साईबाबा आणि शेगावचे श्री गजाननमहाराज यांच्या चरित्रात नित्यपाठात भाविक वाचत असतात. तसेच विदर्भातील प्रख्यात प्रज्ञाचक्षू साहित्यिक संत गुलाबराव महाराज यांच्याही चरित्रात स्वामींच्या भेटीचा उल्लेख दिसून येतो. मात्र, प.पू. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आणि समकालीन ज्ञात असणार्या संत मंडळी यांच्यामध्ये एक अलौकिक असा वेगळेपणा दिसून येतो. स्वामी महाराज हे आचार्य परंपरेनुसार अत्यंत कर्मठ संन्यासी, योगी, सतत पायी भ्रमण करणारे आणि संन्यासधर्म नियमांप्रमाणे जर भिक्षा प्राप्त झाली नाही तर एकवीस-एकवीस दिवसांपर्यंत उपवास करणारे असे संन्यासी म्हणून त्यांच्याही काळात प्रसिद्ध होते. त्याचबरोबर ते शंकराचार्यांसारखे विलक्षण वेदांती, दशग्रंथी वैदिक, संस्कृत साहित्याचे र्ममज्ञ अभ्यासक आणि संशोधक शास्त्रज्ञ होते. आद्यशंकराचार्यानंतर अशा प्रकारचे साहित्य त्यांच्याचसारखेसतत भ्रमण करीत असताना निर्माण करणारे स्वामी महाराज हे एकमेवाद्वितीय असे संन्यासी आचार्य आहेत, असे बृहन्महाराष्ट्रातील वैदिक आणि संस्कृत पंडितांमध्ये स्वामी महाराजांची ग्रंथसंपदा आणि संस्कृत वाड्मय पाहिल्यानंतर मानले जाते. स्वामी महाराजांच्या वाड्मयाची संदर्भसूची नजरेखालून घातली तरी आद्य शंकराचार्यांनंतर १८ व्या शतकात वावरणार्या स्वामींच्या अलौकिकतेची जाणीव होते. स्वामी महाराजांनी इ.स. १८८९ मध्ये माणगाव येथे आपला पहिला ‘द्विसाहस्त्री’हा २000 श्लोकांचा ‘गुरुचरित्र’ या ग्रंथावरील संस्कृत भाष्यग्रंथ लिहिला. त्यानंतर त्यांनी लहानमोठय़ा बावीस ग्रंथांची रचना केली आणि ४५0 हून जास्त संस्कृत व मराठी भाषेत स्तोत्रे, पदे, अभंग याची प्रासादिक अशी रचना आपल्या उर्वरित संन्यासाश्रमातल्या सतत भ्रमणकालात केली. केवळ दोन छाट्या, लंगोटी, दंड, कमंडलू व एखादी पोथी एवढेच जवळ ठेवून सतत पायी भ्रमण करणार्या आणि गंगा, नर्मदा, कृष्णा अशा नद्यांच्या तीरावर एखाद्या मंदिरात रात्री मुक्काम करणार्या भिक्षान्नावर निर्वाह करणार्या स्वामींनी एवढी ग्रंथसंपदा प्रतिकूल परिस्थितीमध्ये कशी केली असेल याची कल्पनाही आश्चर्यच वाटावे अशी आहे. महत्त्वाचे म्हणजे स्वामींचे हे ग्रंथ मोठमोठय़ा संस्कृत पंडितांनादेखील विस्मयचकित करणारे आहेत. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ वाड्मयात ‘द्विसाहस्री गुरुचरित्र’, ‘त्रिशती काव्यम्’, ‘सप्तशती’, ‘समश्लोकी (एकूण श्लोकसंख्या सात हजार) ‘दत्तपुराण’ (संस्कृत श्लोक ४५00), ‘दत्तमाहात्म्य’(मराठी ओवीबद्ध ३५00 ओव्या), स्वतंत्र ‘दत्तपुराण बोधिनी टीका’ (गद्य), ‘त्रयशिक्षाग्रंथ’ म्हणजेच कुमारशिक्षा, युवाशिक्षा आणि वृद्धशिक्षा हे तीन संस्कृत व ‘स्त्रीशिक्षा’ हा मराठी लघुग्रंथ, ‘कृष्णालहरी’, ‘नर्मदालहरी’ हे लहरीकाव्य लघुग्रंथ, ‘दकारादि दत्तात्रेय सहस्रनाम मंत्रगर्भ स्तोत्रम्’ हा लघुग्रंथ, ‘दत्तचंपु’ हा छंदशास्त्रावर आधारित ग्रंथ, ‘पंचपाक्षिकम’ हा प्रश्नज्योतिषावर आधारित ग्रंथ, ‘समश्लोकी चुर्णिका’ ग्रंथ आणि ‘कूर्मपुराण भाष्य’ अशी अद्भुत ग्रंथरचना दिसून येते. याशिवाय स्वामी महाराजांनी सत्यनारायण पूजेसारखी दत्तपुराण व मार्कण्डेय पुराण इत्यादींचा आधार असलेली ‘सत्यदत्तपूजा’ आणि ‘दत्तात्रेय षोडशावतार’ या लघुग्रंथांची निर्मिती करून ती दत्ताेपासकांत रूढ केली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel