कुलइतिहास . पूर्वींच्या कुल-वृत्तांतात भृगू पासून जामदग्न्यांपर्यंत माहिती लहिली आहे. त्यानंतरच्या काळात परशुरामाने कोकणभूमी निःक्षत्रिय केली. या बाबत पुष्कळ कथा पुराणांत सांगितलेल्या आहेत. त्यानंतर कोकणभूमीत चित्पावनांची वस्ती वाढत गेली. शेती, वेदाध्ययन, पौरोहित्य आणि कारकुनी हे चित्पावनांचे कोकणातील मूळचे व्यवसाय, आणि गुहागर, चिपळूण, जंजिरामुरुड, दाभोळ (दाल्भ्य), राजापूर, श्रीवर्धन हा कोकणातील टापू त्यांचे मुख्य वसतिस्थान. चिपळूण (परशुराम क्षेत्र) हे अर्थातच त्यांचे आद्यदैवतस्थान. कालांतराने जसजशी उदरभरणासाठी अवती भोवती स्थलांतरे होऊ लागली तसतशी दैवतांतही भर पडू लागली. चित्पावनांची आजमितीस तीस-चाळीस कुलदैवते आहेत. त्यातील बहुसंख्य कोकणात आहेत. चौदा गोत्रे कायम राहिली, पण दैवते आणि आडनावे (कुलें) कितीतरी वाढत गेली. महाराष्ट्रांत ज्या तीन देवी आहेत (कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी आणि अंबाजोगाईची अंबा) त्याही अनेक चित्पावन कुलांच्या कुलदेवता आहेत. शिवोपासक चित्पावन या तिन्ही देवींना पार्वतीच्या रूपांत पहात असावेत. तुळजापूर आणि अंबाजोगाईसारख्या पूर्वेकडील दूरच्या रखरखीत प्रदेशातील या देवता चित्पावनांच्या कुलदेवता कशा काय झाल्या याची नीट संगती लागत नाही. पुण्यातील एका भावेकुलाचे उपास्य दैवत श्रीखंडोबासुद्धा आहे. मूळ दैवते आणि स्थानिक दैवते या दोन्हींची सांगड घालण्याचा हा प्रकार दिसतो. गणेशदैवताला चित्पावनांत असाच मान आहे. चित्पावन समाज पेशवाईपासून देशावर भराभर स्थायिक होत गेला आणि त्याने स्थानिक परिस्थितीतील कित्येक देवदेवता, आचार वगैरे नव्याने आत्मसात केले. चित्पावनी मूळ बोली आता प्रायः लोपली असून मराठी भाषेत ती जिरून गेली आहे. सध्या चित्पावनांची काही लोकसंख्या देशावर आणि अल्प संख्या कोकणात आहे. अर्थात महानगरपालका असणारी मोठी शहरे आणि जिल्ह्यांची ठिकाणे इथे त्यांच्यातील बहुसंख्य वस्ती आहे. कोकण सोडून महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर आज जे चित्पावन स्थायिक झालेले दिसतात, त्यांच्या आठ /नऊ पिढ्या तरी देशावर जगलेल्या आहेत. पण असे असले तरी निसर्ग सुंदर कोकणाविषयी त्यांच्या मनांत विलक्षण आकर्षण असते. आपले मूळ गाव एकदा बघावे, कुलदैवताचे, ग्रामदैवताचे दर्शन घ्यावे असे प्रत्येक चित्पावनाला वाटत असते. कोंकणची लालसर माती, सागरकिनारे, नारळी पोफळी-आंब्याच्या बागा एकदातरी पाहिल्याविना चैन पडत नाही. आपले पूर्वज कोण होते, कुठे होते, त्यांनी त्या काळात काय केले, आपल्यासाठी कोणता वारसा ठेवून ते गेले या बद्दल कोणत्याही समाजाला आकर्षण वाटतेच. या सगळ्याचा पद्धतशीरपणे शोध घेणे आणि तो संगतवार सांगणे हेच इतिहासकाराचे काम असते. प्रमाणभूत ठरणाऱ्या साधनांच्या आधारे केलेले जास्तीत जास्त अचूक संशोधन हेही इतिहास या संकल्पनेत समाविष्ट असते, तर स्थलकालपरिस्थिती यांच्या संदर्भात केलेले विश्लेषण आणि कार्यकारणमीमांसा ही इतिहासाचे आवश्यक अंग असते. इतिहासाची साधने जितकी अस्सल आणि इतिहासकाराची सत्यनिष्ठा जितकी प्रबळ तितक्या प्रमाणात इतिहासग्रंथ प्रमाणभूत ठरतो. टिकून राहणे (रूढी) आणि बदलणे (परिवर्तन) असे परस्परविरोधी वाटणारे घटक इतिहासात अंतर्भूत असतात. संपूर्ण राष्ट्राचा इतिहास लहिला जातो, तसा विशिष्ट प्रांताचा किंवा राज्यांचाही इतिहास लहिता येतो. त्या त्या ठिकाणचा आपला परिसर, तेथील समाज, चालीरीती, जीवन पध्दती या सगळ्यांबद्दल अभिमान व्यक्त करायचा असतो. इतिहास काय किंवा परंपरा काय यांना दीर्घकालाचा आधार असतो. भूत, वर्तमान आणि भविष्य अशा त्रिकालाची जाणीव हे मानवाचे मुख्य वैशिष्ट्य असते. इतर पशु-पक्षी फक्त वर्तमानापुरते पाहू शकतात. काही थोडे नजीकच्या भविष्यकाळासाठी तरतूद करत असतात. मानव हाच एक असा सजीव प्राणी आहे की, ज्याला आपल्या भूतकालाची पदोपदी जाणीव असते. आपण एका दीर्घकालीन घटनाक्रमाचा परिपाक आहोत, असे मनात आल्याखेरीज इतिहास, संस्कृती, परंपरा हे शब्द वापरताच येणार नाहीत. आपले वाडवडील, त्यांचे पूर्वज, आपल्या पूर्वजांचे पूर्वज या क्रमाने लावता येईल तितका भूतकालाचा छडा लावण्याचा आपला प्रयत्न असतो. वर्तमानकाळात आपण स्वतः वावरत असल्यामुळे त्याचा अनेक अंगानी अनुभव घेऊ शकतो. पण भूत-भविष्याचे तसे नसते. भविष्यकाळ तर अज्ञातच असतो. त्यामुळे त्याच्या बद्दल कल्पना करणे, अपेक्षा बाळगणे आणि स्वप्ने रंगविणे एवढेच माणसाला शक्य असते. त्या मानाने भूतकाळाबद्दल पुष्कळच ठामपणे आपल्याला विचार करता येतो. अर्थात कालप्रवाह जसजसा पुढे जात राहील तसा भूतकाळ अस्पष्ट, धूसर आणि गूढ बनत जातो. पण अशा गूढ गोष्टींचाही काही प्रमाणात उलगडा करता येतो. कारण भूतकाळाचे अनेक अवशेष उरलेले असतात. वाडे, किल्ले, मंदिरे, तीर्थक्षेत्रे अशा स्वरूपांत उरलेल्या इतिहासाचा आजही आपण अनुभव घेऊ शकतो आणि कागदपत्रे, सनदा, पोथ्या, वंशावळी अशा प्रकारच्या दस्तऐवजांच्या साहाय्याने इतिहासाचा शोध घेऊ शकतो, आणि म्हणूनच प्रस्तुत कुलवृत्तांताचे नूतनीकरण करण्याचा हेतू आहे. पूर्वीं कोकणातील चित्पावन ब्राह्मणांत काळे कुलातील लोकही वावरत होते. याला ऐतिहासिक पुरावा म्हणूंन सन 1470 चे सुमाराचा आहे. गौतमाई नावाची चिपळूणची कुळकरणीण शिवाजी छत्रपती व संभाजी छत्रपती यांच्या वेळी होती. तिची वंशावळ :- मूळ संपादक नरसीपंत काळे 1470 चे सुमारास विनाजी नरसी 1500 पर्शराम 1530 काळो पर्शराम 1555 अंतो काळो स्त्री गौतमाई शके 1580 सुमारास काळे कुळकर्ण्याच्या ह्या उल्लेखावरून दिसते की, शके 1470 च्या सुमारास नरसीपंत काळ्याने चिपळूणचे कुळकरण संपादिले. हे कुळकरण 1470 च्या पूर्वींच संपादिलेले असावे. पूर्वजांनीं अंगिकारलेल्या चाली-रीती आजतागायत पुढे चालू आहेत. कारण अशा चाली-रीती मागील पिढीकडून पुढच्या पिढीकडे येत असतात. त्यांचे स्थलांतर झाल्यास त्या परिसरातील चाली-रीतींची त्यात भर पडून जशी दहा कोसांनी भाषा बदलते तशा बदलत जातात. त्याला तेथील परिस्थिती कारणीभूत ठरते. कुलस्वामी काळभैरव वत्सगोत्री काळे कुलाचे, काळभैरव कुलदैवत असल्याचे बहुतेक घराण्यांना मान्य असल्याचे समजते. कारण पुष्कळ घराण्यांनी आपला कुलदेव काळभैरव सांगितला आहे. या काळभैरवा बद्दल प्रस्तुत आवृत्तीत अन्यत्र माहिती आली आहे. याची मंदिरे पुष्कळ ठिकाणी आहेत. परंतु जेथे पापक्षालन केल्यावर शिवाने त्याची कोतवाल म्हणून नेमणूक केली ते मंदिर काशी क्षेत्री आहे. त्याचे दर्शन घेतल्या शिवाय काशीविश्वेश्वराचे दर्शन घेतल्याची फलश्रुती होत नाही, असे पुराणकालापासून मानले आहे. काळभैरव मंदिराशिवाय, अष्टभैरवांची काशी मध्ये शिवाने निर्मिती केली असून काशीच्या अष्टदिशांना त्यांची स्थाने आहेत. ती पुढील प्रमाणे -- 1) श्री रुरुभैरव - हनुमान घाटावर. 2) श्री चंडभैरव - दुर्गाकुंडाजवळ दुर्गादेवी मंदिरांत. 3) श्री असितांग भैरव - वृध्द काल येथे अमृत कुपाजवळ. 4) श्री कपाल भैरव - कपाल मोचन तीर्थावर, लाट भैरव या नावाने. 5) श्री क्रोधन भैरव - बटुक भैरव या नावाने कामाक्ष्य क्षेत्रात. 6) श्री उन्मत्त भैरव - देवरागावाजवळ. 7) श्री संहार भैरव - पाटण दरवाजा, गायघाटावर. 8) श्री भिषण भैरव - भूत भैरव महालांत भूत भैरव याच नावाने. कालभैरवाच्या जन्मकथा सर्वांच्या परिचयाच्या असल्यामुळे येथे विस्तृत प्रमाणात दिली नसून काळभैरवाची स्तोत्रे या ग्रंथाच्या शेवटी दिली आहेत, त्यांत सविस्तर वर्णन आले आहेच. कुलस्वामिनी महासरस्वती भारतीय संस्कृतीत सरस्वती देवीला फार आदराचे स्थान आहे. सरस्वती ही विद्येची देवता आहे. विद्येला प्रारंभ करताना आधी तिचे पूजन केले जाते. नवरात्रात देखील सरस्वतीपूजनाची प्रथा आहे. प्राचीन काळी शेती करणे व वेदाध्ययन करणे हेच प्रमुख व्यवसाय असल्यामुळे ब्राह्मण वर्ण शेतकरी बनला होता व त्यांची वस्ती सरस्वती नदीच्या पात्रात होती. प्रत्येक देवतेला एक इतिहास असतो, एक परंपरा असते. सरस्वतीचा इतिहास व परंपरा आपल्याला ऋग्वेद काळा पासून पाहायला मिळते. ऋग्वेदापासून ते आधुनिक संस्कृत साहित्यापर्यंत सरस्वतीची विविध रूपे आपल्याला पाहायला मिळतात. ऋग्वेद हा भारतीयांचा सर्वांत प्राचीन ग्रंथ. प्रत्येक गोष्टीला आधार आपण ऋग्वेदातून देत असतो. ऋग्वेदकाळी सरस्वतीचे नदीच्या स्वरूपात वर्णन केले आहे. प्रबल प्रवाहमयी या नदीच्या काठावर ऋषीलोक तपश्चर्या करीत असत, मंत्र म्हणत असत. या नदीचे स्वरूप पाहिल्यावर आपोआप त्यांच्या तोंडून मंत्र स्फुरू लागले, सूक्ते रचली जाऊ लागली. ऋषी तिला वाणी ज्ञान, व वाग्मिता यांची देवी समजू लागले. तिला विद्येची देवता मानून तिचे मानवीकरण केले गेले. मानवाप्रमाणे तिच्या सौंदर्याचे, तिच्या अवयवांचे वर्णन केले गेले. सुयामा, सुभरा, सुपेशा, सुविग्रहा इत्यादि विशेषणांनी तिचा गौरव केला आहे. वर्ध शुभ्रे स्तुवते रासि वाजान्यूयं पात स्वस्तिभि सदा नः । (ऋ.6/95/6) या मंत्रात तिच्याजवळ कल्याणाची प्रार्थना केली आहे. वसिष्ठ ऋषी तिच्या काठावर तपस्या करीत असत त्यावेळी ते तिची प्रार्थना करीत असत की, हे सरस्वती तू आम्हाला भरपूर अन्नधान्य पुरव. या ठिकाणी सरस्वतीला नदीच्या स्वरूपातच मानण्यात आले आहे. भारती आणि इला ही दोन पर्यायी नावे आहेत. पण या तिघीजणीं एकरूपच आहेत. पावकाः नः सरस्वती वाजें भिर्वाजिनीवती यज्ञं वष्टु धियावसुः चोदयित्री सूनृतानां चेतन्ती सुमतीनाम् यज्ञं दधे सरस्वती ।। वरील मंत्रावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, सरस्वती जशी विद्येची देवता आहे, तशीच ती धन देणारी व प्रेरणा देणारी पण आहे. ती ज्ञान देते, ज्ञानाच्या साह्याने धन मिळते. ज्ञानामुळेच जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. धन देणारी म्हणून आणखी एका मंत्रात सरस्वतीचा उल्लेख आला आहे. यो रत्नधा वसुविद्यः सुदत्रः सरस्वति तमिह धातवे कः । सरस्वतीचे अनेक नात्यांमध्ये वर्णन केले आहे. काठावरच्या लोकांना भरपूर अन्नधान्य देऊन त्यांचे पोषण करते म्हणून तिला माता म्हटले आहे (अम्बितात्मा, सिंधुमाता). सिंधुमाता याचे स्पष्टीकरण सुद्धा अनेक विद्वानांनी भिन्न प्रकारे केले आहे. कुणी मातृभृता, महापूराची माता तर सिन्धुमाता म्हणजे सागराची माता. प्रत्येक गतिशील जीवनाची माता. सरस्वतीला इंद्रपत्नी मानतात. इंद्र ही पर्जन्याची देवता आहे. आपल्या वज्राने तो वृत्रासुराचा नाश करतो व पाऊस पाडतो. नद्या-नाले पाण्याने भरून वाहू लागतात. नद्यांना इंद्राची पत्नी मानतात. सरस्वती ही त्यांतील एक. दोघांचा संबंध जलाशी आहे. ऋग्वेदांत सरस्वतीचे वर्णन पुरुष देवतांबरोबर तसेच स्त्रीदेवतांबरोबर आले आहे. मित्र, दक्ष, वरुण, सोम, अश्विन, मरुत्, अग्नी, इंद्र, विष्णू, रुद्र, पूषन्, बृहस्पती, वायू इत्यादी पुरुष देवतांबरोबर सस्वतीचे वर्णन आढळते. तसेच अदिती, राका, इंद्राणी, पृथ्वी, पूर्णधी, इला, भारती या स्त्रीदेवतांशींही तिचा संबंध आला आहे. सरस्वतीच्या उत्पत्ती बाबत श्री दुर्गासप्तशती, (देवी माहात्म्य) या ग्रंथात सविस्तर वर्णन केले आहे. सत्त्व-रज-तम अशी त्रिगुणात्मक परमेश्वरी महालक्ष्मी सर्व सृष्टीचे आदिकरण आहे. तिची सगुण व निर्गुण अशी दोन रूपे आहेत. मायोपाधीने लक्ष्य व ब्रह्मरूपाने अलक्ष्य रूप असलेली ती अखिल विश्वास व्यापून राहिलेली असून ती हाती मातुलींग, गदा, खेट व पानपात्र धारण करते तर मस्तकावर नाग, लग आणि योनी ही चिन्हे धारण करते. तप्त सुवर्णांच्या वर्णाप्रमाणे कांती असलेली व तप्त होऊन शुध्द झालेल्या सुवर्णांच्या अलंकारांनी नटलेल्या अशा तिने हे सर्व शून्य (अवकाश) आपल्या तेजाने भारून टाकले आहे. अशी ही रजोगुणी महालक्ष्मी आपली विविध रूपे धारण करणारी आहे. पुढे तिने स्वतः ब्रह्मदेव व लक्ष्मी यांना जन्म दिला तसेच तिच्या सांगण्यावरून महाकालीने शंकर व त्रयी विद्या यांना आणि महासरस्वतीने विष्णु व गौरी यांना जन्म दिला अशा प्रकारे विश्वनिर्मितीला प्रारंभ झाला आणि महालक्ष्मी ही विश्वाचे आदिकरण ठरली. या शून्य विश्वामध्ये त्रिगुणात्मक परमेश्वरी महालक्ष्मीने केवळ तमोगुणाने दुसरे रूप धारण केले. ते रूप म्हणजे काळ्याशार काजळा सारखी, दाढांमुळे वदन सुशोभित दिसणारी विशाल डोळ्यांची, शरीराचा मध्यभाग अत्यंत अरुंद असलेली ती नारी झाली. तिचे चार हात खड्ग, पानपात्र, नरमुंड व ढाल यांनीं सुशोभित झाले होते तर तिने छातीवर नरदेहमाला व मस्तकावर नरमुंडमाला धारण केलेली होती. त्या श्रेष्ठ तमोगुणी देवीस महालक्ष्मीने महामाया, महाकाली, महामारी, क्षुधा, तृषा, निद्रा, तृष्णा, एकवीरा, कालरात्री व दुरत्यया त्या त्या कर्मांस अनुसरून अशी नावें दिलीं. त्यामुळे तांत्रिक-मांत्रिक लोकांनी तिला कुलस्वामिनी मानले. महालक्ष्मीने अत्यंत शुध्द सत्वगुणाने चंद्राच्या प्रभेप्रमाणें तेजस्वी असे दुसरे रूप धारण केले. अक्षमाला, अंकुश, वीणा व पुस्तक धारण करणारी अशी ती श्रेष्ठ नारी झाली आणि महाविद्या, महावाणी, भारती, वाणी, सरस्वती आर्या, ब्राह्मी, कामधेनू, वेदगर्भा व सुरेश्वरी अशी नावे धारण केली. नंतर त्या तिघींनी बहिणभावंडांची स्वतःला अनुरूप अशी मिथुने निर्माण केली. महालक्ष्मीने स्वतःला अनुरूप सुवर्णाच्या अंतर्भागाप्रमाणें सुंदर कमलासनावर असलेली स्त्री पुरुषांची जोडी निर्माण केली व त्या नरास ब्रह्मन, विधे, विरिंची, धात या नावानी संबोधिले व त्या नारीस पद्मे, श्री, कमले व लक्ष्मी या नावाने संबोधिले. त्याच प्रमाणे महाकाली व सरस्वती यांनींही आपापली मिथुने निवडली. त्यांत महाकालीने निळ्या कंठाचा आरक्त बाहू व गोरेपान अंग असलेला आणि मस्तकावर चंद्र धारण केलेला पुरुष तसेच गोरीपान स्त्री ही जोडी निर्माण केली. तो पुरुष रुद्र, शंकर, स्थाणूं, कपर्दी व त्रिलोचन या नावांनीं तसेच ती स्त्री वेदत्रयी, विद्या, कामधेनू, भाषा व स्वराक्षरा ह्या नावांनी ओळखली गेली. महासरस्वतीने गौरवर्णी स्त्री व कृष्णवर्ण पुरुष निर्माण केला. त्या कृष्णवर्ण पुरुषास विष्णु, कृष्ण, हृषिकेश, वासुदेव, जनार्दन व स्त्रीस उमा, गौरी, सती, सुंदरी, सुभगा व शिवा ही नावे दिली. अशा प्रकारे त्या तिन्ही मुलप्रकृतिक स्त्रिया तात्काळ पुरुष भावास प्राप्त झाल्या. नंतर महालक्ष्मीने ब्रह्मदेवास त्रयी, रुद्रास गौरी व वासुदेवास श्री पत्नी म्हणून दिली. ब्रह्मदेवाने सरस्वतीचे साह्य घेऊन अंड ब्रह्मांड निर्माण केले, पराक्रमी भगवान रुद्राने गौरीचे सहाय्य घेऊन त्या अंडाचा भेद केला. त्या ब्रह्मांडामध्ये महतत्त्वादी प्रकृतिभूत प्रधानादि कार्ये व पंच महाभूतात्मक सर्व स्थावर जंगम जग उत्पन्न झाले. लक्ष्मीचे सहाय्य घेऊन विष्णूने त्या जगाचे पालन पोषण केले. जी देवी त्रिगुणा (महालक्ष्मी), तामसी (महाकाली) व सात्त्विकी (महासरस्वती) अशी तीन प्रकारची सांगितली तीच शर्वा, चंडिका, दुर्गा, भद्रा व भगवती या पाच नावांनी संबोधिली जाते. ब्रह्मदेवाने मधुकैटकाच्या संहारासाठी जिचे स्तवन केले ती विष्णूची योगनिद्रा म्हणजेच तमोगुणी महाकाली होय. तिला दहा मुखे, दहा हात व दहा पाय असून तिची कांती काळ्याशार काजळाप्रमाणे आहे. चकाकणारे दात व दाढा या मुळें ती अक्राळ विक्राळ रूपाची असूनही रूप, सौभाग्य, कांती व महासंपती यांचे ती अधिष्ठान आहे. ती देवी तलवार, बाण, गदा, शूल, शंख, चक्र, भुशुंडी, परिघ, धनुष्य व रक्त ठिपकणारे मस्तक या वस्तू आपल्या दहाही हातांत धारण करते. तीच महाकाली म्हणजे विष्णूची दुस्तर माया होय. महिषासुरमर्दिनी म्हणजेच साक्षात त्रिगुणात्मिका महालक्ष्मीच आहे. तिचे वदन धवल, हात निळे, स्तन मंडल अत्यंत शुभ्र, कटिप्रदेश, पाय व जघन हे अवयव आरक्त असून ती मद्यपानामुळेउन्मत्त अवस्थेत असते. तिचा जघन भाग चित्रविचित्र असून तिने चित्र विचित्र रंगाच्या माळा, वस्त्र व अलंकार परिधान केलेले आहेत. विविध प्रकारच्या सुगंधी उट्या अंगाला लावल्या आहेत व तिच्या ठायी कांती, सौंदर्य व सौभाग्य यांचा प्रकर्ष झालेला आहे. हजार हात असूनही ती अठरा हातांचीच मूर्ती पूजनीय आहे. उजव्या बाजूच्या खालच्या हाता पासून डाव्या बाजूच्या खालच्या हाता पर्यंत क्रमाने धारण केलेली अक्षमाला, कमल, बाण, तलवार, वज्र, गदा, चक्र, त्रिशूल, परशू, शंख, घंटा व पाश अशी आयुधे आहेत. शक्ती, दंड, ढाल, धनुष्य, पानपात्र, आणि कमंडलू ह्या आयुधांनी तिचे हात अलंकृत झालेले असून कमळावर बसलेली, सर्व देव स्वरूपी व जगत्स्वामिनी अशी ही महालक्ष्मी आहे. गौरीच्या देहापासून प्रकट झालेली ती शुंभासुरमर्दिनी म्हणजेच साक्षात केवळ सत्त्वगुणाश्रया महासरस्वती होय. ती अष्टभुजा देवी बाण, मुसळ, शूल, चक्र, शंख, घंटा, नांगर आणि धनुष्य ही आयुधे धारण करते. या महासरस्वती देवीला निरनिराळ्या प्रकारांनी ओळखले जाते ते तिच्या विविध रूपांवरून. ऋग्वेदकाळीं माता, वाणीची देवता (वाग्देवता), शत्रुसंहारक देवता, यज्ञदेवता आणि नदी (सलीलरूप) तर यजुर्वेदामध्ये ऋणमोचन देवता म्हणून हिचा उल्लेख आढळतो. सरस्वती अथवा शारदा ही देवता विद्या अथवा कला यांची देवता मानली जाते. वाक्, वाग्देवी, वागिश्वरी, वाणी, भारती, वीणापाणि अशी अन्य नावे सुध्दा आहेत. सरस्वती शब्दाचा अर्थ गतिमती असा आहे. आध्यात्मिक अर्थाने ती निष्क्रिय ब्रह्माचे सक्रीय रूप आहे. म्हणूनच तिला ब्रह्मा-विष्णु-महेश या सर्वांना गती देणारी शक्ती असे म्हणतात. सरस्वतीचा वर्ण उज्ज्वल असल्यामुळे ती ज्योतिर्मय ब्रह्माचे प्रतीक आहे. याच अर्थाने ती ब्रह्मा-विष्णु-महेश या त्रिमूर्तींना पूज्य आहे. त्यामुळे तिचे नाव तिन्ही देवतांसोबत जोडले जाते. ऋग्वेदात तिला देवता न म्हणता नदीचे मानवी स्वरूप मानले आहे. दुसऱ्या एका ठिकाणी तिला देवतांची राणी म्हटले आहे (ऋ.8.89,10-11), उपनिषदांत सरस्वतीची वाणीशी एकरूपता मानलेली आहे. प्रज्ञावृद्धीसाठी आणि गोडवा येण्यासाठी उपनिषदांत तिची प्रार्थना केलेली आढळते. पुराणांत सरस्वतीला कुठे ब्रह्मदेवाची पत्नी, तर कुठे त्याची कन्या असे म्हटले आहे. विष्णु धर्मोत्तर पुराण, अशुमद्, भेदागम्, पूर्णकारणागम्, रूप मंडन इत्यादी ग्रंथाने तिचे स्वतंत्रपणे वर्णन केले आहे ते असे - सरस्वती शुभ्रवर्ण, शुभ्र वस्त्र धारिणी, अलंकार विभूषित, चतुर्भुज, पुंडरीक (शुभ्रकमल), माला, वीणा व कमंडलू धारण करणारी आहे. पुस्तक व वीणा ही तिची प्रमुख चिन्हे आहेत. बृहदारण्यकात तिला धेनू म्हटले असून तिची उपासना करण्यास सांगितले आहे. वाचं धेनुमुपासीत । तस्याश्चत्वारस्तनाः । स्वाहाकारो वषट्कारो हन्तकारः स्वधाकारः। तस्या द्वौ स्तनौ देवा उपजीवन्ति स्वाहाकारं वषट्कारं च । हन्तकारं मनुष्याः स्वधाकारं पितरः। तस्याः प्राण ऋषभो मनोवत्सः ।। (वाचारूपी धेनूची उपासना करावी. स्वाहाकार, वषट्कार, हन्तकार व स्वधाकार असे तिला चार स्तन आहेत. पहिल्या दोन्हीकडून देव आपले उपजीवन मिळवतात. तिसरा व चौथा हे अनुक्रमे मनुष्य व पितर यांना उपजीवन देतात. प्राण हा या धेनूचा वृषभ असून मन हे तिचे वासरू आहे.) श्वेत हंस हे सरस्वतीचे वाहन कल्पिलेले आहे. सरस्वती ही कधी हंसावर बसलेली आहे अशा स्वरूपात पाहण्यात येते. तर कधीं कधीं हंस तिच्या मागे असतो. कोठे कोठे तिच्या मागे मोरसुद्धा दाखवितात. हिंदू, बौध्द व जैन या सर्व धर्मामध्ये सरस्वती ही पूज्य मानली गेली आहे. स्कंद पुराणात शिवाची शक्ती अशा कल्पनेने तिचे रूप ध्यान वर्णिलेले आहे. ते असे - जटामुकुट, त्यावर चंद्रकोर, गळा निळा, त्रिनेत्र. या वर्णनावरून ही सरस्वती शिवाचे स्त्रीरूप वाटते. सरस्वतीची द्विभुज व चतुर्भुज ही पौराणिक रूपे आहेत. संत काळात संत ज्ञानेश्वरांनी गुरुस्तवनांत शारदेचा उल्लेख वागेश्वरी असा केला आहे. त्यानी एका श्लोकात - जी आपुलया स्नेहाची वागेश्वरी । जरी मुकेयाते अंगीकारी तो वाचस्पतीशी करी । प्रबंधुहोडा ।। (अ.10 ओ.8) वागेश्वरी आणि वाचेचा अनोन्य संबंध असल्याचे दर्शवितात. तसेच आता अभिनव विग्विलासिनी । जे चातुर्यार्थ कलाकामिनी ते श्रीशारदा विश्वमोहिनी । नमिली मियां ।। (अ.1 ओ.21) यात सरस्वतीचे सर्व कर्तृत्व, स्वरूप सामावलेले आहे. वाङमय सृष्टी, साहित्य सृष्टी यांचे अधिष्ठान व वाचेचा नित्यनूतन विलास अशा स्वरूपातील शारदा ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असावी. ज्ञानेश्वरीच्या सतराव्या अध्यायांत संत ज्ञानेश्वरांनी शिवाची शक्ती अशा अर्थाने उल्लेख केला आहे - वामांगीचा लास्यविलासु । जो हा जगद्रुप आभासु । तो तांडवमिसें कळासु । दाविसी तूं ।। ब्रह्मदेवाची मुलगी म्हणून सरस्वती ही नामदेवांना पूज्य आहे. तसेच त्यांनी तिला सारजा असे संबोधिले आहे. संत एकनाथांनी नाथ - भागवताच्या पहिल्या अध्यायात वंदन करताना सारासार विवेक मूर्ती असे म्हटले आहे. त्यानीही तील शिवशक्ती रूपात पाहिले आहे - आतां नमूं सरस्वती । जे सारासार विवेकमूर्ती । चेतनारूपे इंद्रियवृत्ती । जे चाळिती सर्वदा ।। जे वाचेची वाचक । जे बुद्धीची द्योतक । जे प्रकाशा प्रकाशक । स्वयें देख स्वप्रभा ।। ते शिवांगीं शक्ति उठी । जैसी डोळ्यांमाजी दिठी । कीं रस रसत्वें दावी पुष्टी । फळपणें पोटीं फळाचा ।। सारखे अंगी स्वादू । कीं सुमनामाजीं मकरंदु । तैसा शिवशक्ति संबंधूं । अनादिसिद्धु अतर्क्य ।। ते अनिर्वाच्य निजगोडी । चहूंवाचांमाजी वाढी । म्हणोनि वागीश्वरी रोकडी । ग्रंथार्थीं चोखडी चवी दावी ।। संत तुकाराम आपल्या एका अभंगात म्हणतात - आम्हीं मानवानीं वर्णावे तें काय । सुरवर पाय वंदिताती ।।1।। गणेश शारदा करिती गायन । आदिदेव गण श्रेष्ठ श्रेष्ठ ।।2।। संत रामदासांनी सरस्वतीचे नमन व्यापक प्रमाणात केले आहे. शारदा वेदमाता, ब्रह्मसुता, महामाया व वाग्वदेवता आहे. ही महापुरुषाची पत्नी असून ती तूर्या या अवस्थेशी संलग्न आहे. हिच्या मुळेच मोठे मोठे साधू महत्कार्यांस प्रवृत्त झाले. शांती विरक्ती या हिच्या शोभा आहेत. अनंत ब्रह्मांडाच्या घडामोडी ही लीलेने करते व स्वतः आदिपुरुषी दडून रहाते. ब्रह्मादिकांना हिचा पार कळत नाही. ज्ञानशक्ती व जाणीवस्फूर्ती हिलाच म्हणतात. स्वरूपाला शोभा हिच्यामुळे आली आहे व शब्दाद्वारेच ही संसाराचा नाश करते. योगी पुरुषांची लावण्यखाणी अशी सत्रावी कळा ती ही शारदाच होय. ही सरस्वती म्हणजेच वेदमाता होय. वेद हे ज्ञानाचे भांडार आहेत. वेदांची संख्या चार आहे. तेव्हा सरस्वतीला चार तोंडे असतात. काही ठिकाणी मात्र पाच तोंडे असल्याचा उल्लेखही आहे. सरस्वती पित्याला-ब्रह्मदेवाला-चार तोंडे असल्यामुळे सरस्वतीला चार तोंडे दाखविली आहेत. मत्स्य व वायुपुराणात सरस्वतीला चार तोंडे असल्याचा उल्लेख आहे. या सरस्वतीची नाना रूपे वर्णिलेली आहेत. ज्याला ज्याप्रमाणे भावली त्याने त्या प्रमाणे वर्णन केलेले आहे. सरस्वती ही एक अतिप्राचीन नदी असून ती पवित्र मानण्यात येते. ऋग्वेदकाळातही तिचे पावित्र्य दृग्गोचर झाले होते. ` हे श्रेष्ठ नदीदेवी सरस्वती, आम्ही अज्ञान आहोत, तेव्हा आम्हाला तू प्रकाशित कर. तुझ्यावरच आमचे जीवन अवलंबून आहे ` अशी एक तिची प्रार्थना त्याकाळीं केली होती. सरस्वती पूर्ववाहिनी होऊन पुढे गुप्त झाली आणि प्रयाग क्षेत्री गंगा-यमुनेला मिळाली. जेथे ती मिळाली तोच त्रिवेणी संगम. त्यालाच `तीर्थराज ` असेही म्हणतात. साभार :- विनित वनमाळी
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel