चेटकीण प्रथेचा काळा इतिहास ऐतिहासिक काळात स्त्रियांना चेटकिणी समजून ठार केले जाई. आज त्यांची गर्भातच हत्या करण्याचे प्रमाण चिंता करावी एवढे वाढत चालले आहे. स्त्रीमुक्तीसाठी लढणाऱ्या सावित्रीबाई किंवा क्लारा झेटकिन यांचे प्रयत्न व्यर्थ जाणार काय? स्त्री-मुक्ती दिनानिमित्त या विषयावरील खास लेख देत आहोत. चेटकिण प्रथेचा काळा इतिहास तपासला तर संस्कृतीने स्त्रियांवर कसे निर्दयी अत्याचार केले हे समजून आपण अस्वस्थ होऊ. चेटूक विद्येच्या(witchcraft) विरोधातील कायदा रोमन काळापर्यंत मागे जातो. तंत्र-मंत्र करणारे व हातचलाखी करणारे यांना दंड(फाशीसुद्धा) करणारे कायदे यांचा Decimuiral code d Lex Cordelia मध्ये उल्लेख सापडतो. 1595 मध्ये लॅटीन इतिहासकार व कवी आपल्या Daemonolatrica या ग्रंथात चेटूक विद्या जाणणाऱ्यांना कडक शिक्षेचे समर्थन करतो. त्याच्या मते असे लोक म्हणजे कायमची पिसाळलेली कुत्री होत. पण ज्याच्याशी वरीलपैकी कशाचीही तुलना करता येणार नाही अशी चेटकिणी विरुद्ध सुनियोजित दुष्ट मोहीम इ.स.1484 मध्ये 8 व्या पोप इनोसंट याने सुरु केली. चेटकिणीविरुद्धचा पोपचा लिखीत जाहिरनामा म्हणजे मानवी इतिहासातील सर्वात काळे पान म्हणावे लागेल : या जाहिरनाम्यात चेटकिणी ओळखायच्या कशा, प्रश्न विचारुन तपासायच्या कशा, त्यांच्यावर दोषारोप ठेवून त्याना मारायचे कसे याचे तपशीलवार वर्णन आहे. त्याना न्याय व दोषारोपापासून सुटकेची व्यवस्था नाकारण्यात आली. दोषारोप व मृत्युदंड केवळ ऐकीव माहितीवर व अफवांच्या आधारे शाबीत केला जाई. याच काळात मुद्रणकला विकसित झाल्यामुळे नवीन लेखकाना गूढविद्येवर लिहून प्रसिद्धी मिळविण्याची संधी मिळू लागली. अज्ञानातून ज्ञानाकडे उत्क्रांत होत जाताना मानवी अत्याचाराच्या रक्तरंजित कहाण्यानी भरलेल्या वाङ्मयात चेटकिणीवरील अत्याचारांचे तपशीलवार विविध वर्णन आढळते. वाङ्मयातून दोषारोप ठेवलेल्यांचा छळ करण्यासाठी बेलगाम उत्साहाचा अतिरेक दाखविणाऱ्या तथाकथीत यंत्रणेचे तपशीलवार वर्णन देण्यात आले आहे. धंदेवाईक चेटकिणीचा शोध घेण्याच्या बहाण्याखाली, परपीडेत आनंद मानणाऱ्या व लैंगिक विकृतीने पछाडलेल्या, सुमार बुद्धीमत्तेच्या मंडळींना अंधार युगातील वातावरणाने मोकळे रान मिळाले. सफोकमधील मॅथ्यू हॉपकिन्स हा त्यापैकीच एक. पूर्वाश्रमीचा वकील व नंतर स्वत:स चेटकिणी शोधक(witch Finder General) म्हणवून घेणारा हा गृहस्थ. चेटकिणींचे वास्तव्य असणाऱ्या भागात तो शोध घेई. त्यासाठी रहाण्याची, जेवण्याची व प्रवासाची मोफत सोय अधिक 20 शिलिंग बोनस असा त्याचा दर असे. चेटकीण शोधण्याची त्याची पद्धत अशी- संशयिताला नग्न केले जाई, बांधून पाण्यात फेकले जाई. जी पाण्यावर तरंगेल ती चेटकीण असे जाहीर केले जाई व तिला शिक्षा केली जाई. मात्र जी बुडून जाई ती निरपराध असल्याचे जाहीर होई. काही जणींना स्टुलावर आलकट-पालकट घालून कित्येक दिवस अन्न व पाणी न देता बसायला लावले जाई तर काही जणाना कित्येक दिवस अनवाणीपणे न थांबता पायाला फोड येईपर्यंत चालायला भाग पाडले जाई. केवळ 14 महिन्याच्या काळात अशा तथाकथित शेकडो चेटकिणींना हॉपकीन्सने ठार मारले. त्यातल्या सफोकमधील 68 जणी 1645 मध्ये मारण्यात आल्या. 1950 मधील ऍंटी-अमेरिकन चेटकीण-शोध मोहिमेप्रमाणेच हॉपकिन्सने त्याच्या कमिटी सभासदाबरोबर संपूर्ण इंग्लंड चेटकीण-शोध मोहिमेसाठी धुंडाळले व फीच्या रुपात भरपूर संपत्ती कमावली. अखेर निरपराधी स्त्रियांचा छळ करण्याची त्याची कृष्णकृत्ये उजेडात आणली गेलीच व बदनाम होऊन त्याला हा छंदा सोडावा लागला. त्यानंतर वर्षभरातच तो क्षयाने मरण पावला. युरोपात सर्वत्र, विशेषत: जर्मनीत तपास घेण्याचे प्रकार अतिशय अमानुष होते. सुया व दाभण टोचून शरीराचा संवेदनाशून्य भाग शोधला जाई. या पाठीमागचा अंधविश्वास असा की, चामखीळ शरीरवरचा एखादा डाग, जन्मखूण, तीळ अगर तत्सम बधीर भाग यांच्यामधून दुष्टात्मा त्या व्यक्तीशी संपर्क करु शकतो. अशा शरीर ठिकाणाद्वारे दुष्टात्मा चेटकिणीशी संवाद साधतो(करार करतो) अशी या पाठीमागची समजूत. अशी खूण ही ती व्यक्ती दोषी असल्याचा पुरावा समजला जाई. अशी खूण दडवली असेल तर ती शोधण्यासाठी व दुष्टात्म्याबरोबरचा चेटकिणीचा संबंध सिद्ध करण्यासाठी, त्या व्यक्तीचा छळ केला जाई कारण दुष्टात्म्याला समोर हजर करणे अशक्य होते. पुरुषाच्या बाबतीत अशी खूण पापणीच्या खाली, काखेत, ओठावर, गुद्द्वाराजवळ व वृषणावर शोधली जाई. बाया व मुली यांच्याबाबतीत अशी खूण जननेंद्रिय, स्तन व स्तनाची बोंडी येथे शोधली जाई. या क्षेत्रातले तथाकथीत विशेषज्ञ ब्लेड आत ओढले जाईल अशा वस्तऱ्यांचा कौशल्याने उपयोग करण्यात तरबेज होते. संबंधित व्यक्तीच्या शरीर खुणेतून रक्त येऊ नये यासाठी ही युक्ती. हेतू असा की, वस्तऱ्याने देखील रक्त निघत नाही म्हणजे तो भाग बधीर असला पाहिजे म्हणजेच ती व्यक्ती चेटूक/चेटकीण असली पाहिजे हे दाखविणे. चेटकिणीचा आरोप सिद्ध करायचाच, शिक्षा द्यायचीच असे अगोदरच निश्चित करुन, या कारस्थानास पकडलेल्या दुर्दैवी स्त्रियांचा लैंगिक छळ, पशुही लाजतील अशा दुष्टपणे अनैतिकपणे, अमानुषपणे तपास अधिकाऱ्याकडून केला जाई. गुप्त इंद्रियांवरचे केस काढले जात. त्यावर अल्कोहोल ओतले जाई व त्याला आग लावली जाई, तरुण मुलींना नग्न करुन बराच वेळ कारणाशिवाय सुक्ष्मपणे तपासले जाई, त्यांच्यावर बलात्कार केला जाई व त्यांच्या नखांमध्ये तप्त खिळे घुसविले जात. भयानक यातनामय शिक्षेची भीती दाखवून, आरोपींना कबुलीजबाब देण्यासाठी भाग पाडण्यात येई. हातापायाची बोटे तोडणे, वितळलेले शिसे ज्यात ओतले आहे अशा बुटात पाय घालणे, तेलात जिवंत जाळणे, कातडी सोलणे(त्यासाठी तापवलेल्या लाल भडक पकडीचा उपयोग केला जाई) वॅगनच्या चाकावर हातपाय पसरून बांधणे व एकापाठोपाठ एक हाडे मोडणे. वय, गरोदरपण, लिंग कशाचाही विचार नाही. स्त्रिया व तरुणी यांचे बाबतीत तर इतरांपेक्षा अतिरेकच केला जाई. तापवलेल्या चिमटयाने स्तनांचे तुकडे ओढले जात, तापवलेली सळी योनीमध्ये खुपसली जात असे. इतके करुनही कोणी जिवंत राहिलेच तर तीस जिवंत जाळले जाई. जेलर्स, तपास अधिकारी व मारेकरी(शिक्षेकरी) यांनी निष्ठूर व अपरिपक्व बुद्धीने केलेल्या छळांचे वर्णनाचा सर्व तपशील दु:खदायक खराच आहे पण यापेक्षा वेदनादायक म्हणजे अशा कृत्याना चर्चने दिलेली मान्यता. अशा प्रकारे 10 लक्ष लोकांची कत्तल केली गेली आणि या सर्व प्रकाराला जी फूस मिळाली त्याचे मूळ अंधश्रद्धा व अति नैसर्गिक शक्तीवरचा विश्वास हेच आहे. सामान्यपणे जे आकलन होते त्यापेक्षा वेगळे सामर्थ्य आपल्याकडे आहे असा ज्यांचा दावा असे ते सर्वजण, भविष्य जाणणारे मन:शक्तीने आजार बरे करणारे, हातचलाखी करणारे, मांत्रिक एवढेच नव्हे तर काही समकालीन वैज्ञानिकांचे महत्त्वपूर्ण संशोधन यांचा संबंध चेटूकविद्येशी जोडला जाई(गॅलिलिओच्या दुर्बिणीत चेटूक आहे इ.) धर्मसंस्थेला अशा तऱ्हेचे अति नैसर्गिक प्रकार मान्य नव्हते. जे अशा प्रकारांचा वापर करीत त्यांना धर्मसंस्था पाखंडी ठरवून शिक्षा करी. कॅथालिक पंथियांच्या काही कर्मकांडावर सुद्धा प्रॉटेस्टंटानी असे आक्षेप घेतले आहेत. चर्चने तात्त्वि दृष्टया चेटूकविद्या ही पाखंडी प्रकारची काळी प्रणाली मानली. -ही सैतानाची पूजा ज्यांनी त्याच्याशी गुप्त करार केला आहे, व जे देवाशी अप्रामाणिक आहेत. याला शिक्षा देहांताचीच. मात्र ग्राम पातळीवर,(येथेच चेटूक गिरीचे प्रकार जास्त घडत) चेटूक कला म्हणजे गूढ उपयांनी दुसऱ्याचे वाईट करणे असा समज होता. चेटकिणीचे आरोप हे मुख्यत: खेडुतांच्या आपापसातील हेव्या दाव्यातून होत असत. औषधांचा वापर करुन, व देवाची प्रार्थना करुन देखील एखादा आजार बरा होत नसेल वा संकट टळत नसेल तर अशा वेळी आपल्या दुर्दैवाला चेटकीण कारणीभूत आहे असा सरळ आक्षेप घेतला जाई. राजकारणी मंडळी आपल्या प्रतिसर््पध्याचे यश व स्वत:चे अपयश यांचे कारण थेट चेटूक प्रकाराशी जोडीत असल्याचे पुरावे मिळतात. राजकीय मंडळीचे सेवक अशा बाबतीत अनेक प्रकारच्या अफवा पसरवीत. यातील पुष्कळसे आरोप खोटारडे व मत्सरापोटी असत. गूढ घटनाशास्त्राबद्दल चिकित्सक अभ्यास केलेला स्कॉट लिहितो-अशा प्रकारच्या छळाच्या वातावरणात(Torture) कोणीही व्यक्ती आरोप नाकबूल करेल तरच नवल-हा संदर्भ तथाकथीत आरोपी तरुण मुलीच्या नखात तप्त लोखंडी सुया घुसविण्याच्या प्रकाराबाबतचा आहे. स्कॉट आत्मविश्वासपूर्वक एक मुद्दा उपस्थित करतो. जर चेटकिणींना खरोखरच अति मानवी अघोरी शक्ती प्राप्त असेल तर त्यांनी केव्हाच मानवी समाज नष्ट केला असता. हा युक्तीवाद सद्य:काळात परामानसशक्तीच्या समर्थकानादेखील तंतोतंत लागू पडतो. विद्येच्या पुनरुज्जीवनाच्या काळाआधी युरोपात चेटकिणीच्या आरोपाच्या घटना क्वचितच घडत. पण नंतर हे प्रमाण एकदम वाढले. यांचे कारण अंधारयुगातील धार्मिक, सामाजिक व लैंगिक चालीरिती ज्या नंतरही चालू राहिल्या त्याकडे जाते. पूर्वी गूढ घटनाबाबत चर्च कडून दैवी इलाज होत असत. दुष्ट शक्तीचा शाप उलटविण्याचे विधी चर्चमार्फत केले जात. धार्मिक क्रांतीमुळे कॅथालिक पंथातून प्रॉटेस्टंट पंथाची निर्मिती झाली. कॅथालिक पंथातही सुधारणा झाल्या. याचा परिणाम म्हणून जादूटोणा निवारणाबाबतचे विधी धार्मिक पंथाकडून बंद झाले. पण जादूटोण्याविषयी लोकांत समज होतेच. त्यांना ह्याबाबतचा पर्याय देण्यासाठी धर्मसंस्थेऐवजी ज्यांच्यावर जादूटोण्याचा वा चेटूक विद्येचा आरोप आहे त्याची चौकशी करणारी कायद्याची यंत्रणा निर्माण केली गेली. या काळाच्या अगोदर खेडेगावातील जाती व्यवस्थेमध्ये परस्परांना मदतीचा हात दिला जात असे. ज्या वृद्ध व विधवा स्त्रियांना जगण्याचे साधन अपुरे असे त्याना शेजारी नैतिक भावनेने मदत करत. नंतर नंतर शेजाऱ्याना मदत करण्याची ही रीत ओसरली. गरीबांच्या जगण्याच्या हक्काबाबत कायदा तयार झाला. आता नैतिक जबाबदारीऐवजी संबंधितांवर कायदेशीर जबाबदारीचे बंधन येऊ लागले. मग ज्यांच्यावर विधवा वा गरीब स्त्रीचे पालनाची कायदेशीर जबाबदारी येई त्यांनी त्याकडे कानाडोळा केल्यास तक्रारी होत. याला प्रतिक्रिया म्हणून अशा स्त्रियांवर चेटूक विद्येचे आरोप करुन त्यांना संपविण्याचे प्रकार सुरु झाले व वाढीला लागले. पश्चिम युरोपात लैंगिक उन्माद विकृती हे 'चेटकिणी'ना आरोपी करण्याबाबत आणखी एक कारण. स्वपीडन (Maschism) म्हणजे स्वत:ला पीडा देण्यात सुख मानण्याची विकृती. चेटकीण म्हणून जिच्यावर आरोप आहे ती व ज्यांनी आरोप केला ते(आरोपी व फिर्यादी) दोघांनाही लैंगिक मनोविकार(Nerosis) झालेला असे. आरोपीत चेटकिणी व नन्स यांना तीव्र लैंगिक दडपणामुळे नैराश्य येई. अशा बाया मग सैतानाशी प्रेमसंबंध केल्याचा दावा करीत. तपास यंत्रणेतील लोक नको तितक्या अधीरतेने त्यांच्या लैंगिक बाबतीतील पुरावे शोधण्याचा उपद्व्याप करीत. तरुण स्त्रिया व मुली याची वक्षस्थळे व जननेंद्रिये यांच्या वरील सैतानाच्या बारीकशा खऱ्या वा कल्पित ओरखडयाचाही कसोशीने शोध घेतला जाई. इ.स.1604 चा चेटूकविद्या कायदा रद्दबादल होऊन 1736 चा नवा कायदा जेव्हा अस्तित्वात आला तेव्हापासून चेटूकविद्येचे आरोप नाकारले जाऊ लागले. 1736 च्या कायद्याखालील अखेरचा खटला 1944 साली झाला. जादूटोण्याचा आरोप ठेवलेल्या हेलेन डंकन यांना 9 महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. 1951 साली जुन्या 'witchcraft' कायद्याच्या जागी Fradulent Mediums Act हा नवा कायदा झाला. या कायद्यानुसार एखाद्याजवळ खरोखरची दैवी ताकद असण्याची शक्यता गृहीत धरली जाऊ लागली मात्र ढोंग करुन वा हातचलाखी करुन फसवणुकीच्या घटनांना शिक्षा देण्याची तरतूद केली गेली. एक चिकित्सक या नात्याने मला या गोष्टीचे आश्चर्य वाटते की, दैवी सामर्थ्याचा कोणताही निर्णायक पुरावा मिळत नसताना आणि अंध:विश्वासाच्या दुष्परिणामाचे अनेकविध ढळढळीत पुरावे नजीकच्या भूतकाळात मिळालेले असताना सुद्धा, खरोखरची दैवी शक्ती असलेली व्यक्ती असण्याचे गृहीत कसे काय स्वीकारले जाते? आजच्या काळात कुणी एखाद्याने आपण जादूटोणा जाणतो असे सार्वजनिकरित्या जाहीर केले तर आपण त्यास वेडा म्हणू. तरीसुद्धा असली मंडळी व त्यांचे साक्षीदार सैतानाचा जप करताना व मंत्रतंत्राचे प्रकार करताना आढळतात. आधुनिक जादूटोण्याच्या प्रकाराबाबत जेराल्ड गार्डनर या सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्याने 1954 मध्ये 'witchcraft today'हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकावरुन अजूनही असे प्रकार समाजात घडताना दिसून येत आहेत. या व 1959 साली लिहिलेल्या दुसऱ्या ग्रंथात गार्डनरने शिंगाडया देव व देवीमाता यांना मानणाऱ्या संप्रदायाची मला कशी ओळख करुन देण्यात आली व ही मंडळी मंत्रतंत्राचा कसा प्रयोग करत होती याचा उल्लेख आहे. दुर्दैवाने गार्डनरने जादूटोण्याबाबत मांडलेल्या दुसऱ्या बाजूलाच अवास्तव प्रसिद्धी मिळाली-उदा.नग्नपूजा, पापक्षालनार्थ चाबूक फटके भव्य संस्कार विधी(The Great Rite) इ. ह्या शेवटच्या विधीमध्ये प्रमुख धर्मगुरु व धर्मसाध्वी यांचा धर्म मंडळातील इतर सभासदासमोर उघड असा लैंगिक समागम चालत असे. गार्डनरच्या काळापासून जादूटोणा संप्रदायात दोन गट पडले. काहींमध्ये लैंगिक समागमाला प्रमुख स्थान दिले गेले तर इतरांमध्ये प्युरीटन म्हणजे कडव्या धर्म बंधनाना महत्त्व आले. या दुसऱ्या प्रकारात विशिष्ट प्रकारचे झगे घालून किचकट कर्मकांड करण्याच्या बाबींचा समावेश होतो. चांद्रमहिन्यानुसार या मंडळीच्या वर्षात 13 सभा पौर्णिमेदिवशी होतात. काळया मेणबत्त्या, विविध प्रकारचे दोर, कांडया, धूप, चाकू, चांदीचे कप, बांगडया, जादूची वर्तुळे, शिंगे लावलेली शिरस्त्राणे व तत्सम इतर शरीर आवरणे यांचा उपयोग या प्रसंगी केला जातो. नाच व मंत्रउच्चार हा असल्या विधीचा महत्त्वाचा भाग. पक्षी व प्राणी यांचे बळीचे प्रकारही होत. सैतानाला निरोप देण्याचा विधी व त्यासंबंधी रक्ताने लिहिलेली शपथ ह्यांचा सुरुवातीला अशा कर्मकांडात समावेश असे. कोणताही विधी हा वेदीवर होत असे आणि एका प्रकारात Black Makes नामक विधी करताना तरुण विवस्त्र स्त्रीला वेदीवर खोटे खोटे बळी देण्याचा समारंभ होई. नंतर तिचा मुख्य धर्मगुरुबरोबर लैंगिक समागम होई. संप्रदायाच्या सभा गुप्ततेने चालत पण मधून मधून वृत्तपत्रात जादूटोण्याच्या घटनेचा वृत्तांत मोठया मथळयात प्रसिद्ध होई. यामध्ये मोहिनी विद्येच्या प्रयोगाचे वर्णन असे आणि काही वेळा या प्रकारात खून झाल्याचाही उल्लेख असे. 1985 मध्ये बुई थाई ची (Bai Thi Chi) ह्या 51 वर्षीय व्हिएटनामी सरकारी अधिकाऱ्याच्या बायकोवर, जादूटोणा करणाऱ्याच्या मदतीने दुसऱ्या एका बाईवर काळया जादूचा प्रयोग केल्याचा आरोप ठेवण्यात आला. अशा प्रकारातून तिने फार मोठी संपत्ती जमा केल्याचा व जादूटोणा करण्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला. याबद्दल तिला आठ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत घडलेली घटना. 19 नागरिकांना दोन व्यक्ती जाळून मारण्याच्या आरोपाखाली 10 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली. या दोन व्यक्तींना एका बालकावर जादूटोण्याने वीज पाडून मृत्यू घडवून आणल्याची शंका त्या 19 जणांनी घेतली होती. न्यायाधिशानी सखोल तपास करताना असा शेरा मारला होता की, या घटनेबाबतचा पुरावा बुद्धीला न पटणारा वाटतो आणि याबाबतचा खेडूतांचा विश्वास म्हणजे 'अर्थहीन बडबड' वाटते. ज्या दोन जादूटोणा डॉक्टरानी(मांत्रिकानी) त्या मुलाच्या मरणास कारण ठरलेला विजेचा लोळ ज्यांच्यामुळे पडला त्याना शोधण्यासाठी काही हाडे विखुरली होती. त्याना पण न्यायाधीशानी शिक्षा फर्मावली, निरपराधी लोकांना आपल्या अज्ञानातून मूर्खपणामुळे जीव घेणे हे सुसंस्कृत समाजात घडता कामा नये अशी पण न्यायाधीशाची प्रतिक्रिया झाली. विवेकी मनुष्य एखाद्या घटनेचा तर्कसंगत कार्यकारणभाव लक्षात घेतो. सैतानाला उत्तेजीत करता येत नाही अगर त्याचा संचार आपल्यात वा इतरात करता येत नाही, देवाला प्रसन्न करता येत नाही(विविध कर्मकांडानी) ही विवेकवाद्याची पक्की धारणा असते. हजारो वर्षांपासून ज्या पुराणकथा रचल्या गेल्या व टिकून राहिल्या त्या विकृत मंडळीच्या सुपीक डोक्यामुळे अंधश्रद्धेच्या आधारावर त्यांचे पोषण झाले. हजारो निरपराध स्त्री पुरुषांना जादू टोण्याच्या नावाखाली कसलाही निर्णायक पुरावा नसताना अज्ञानी व अंधश्रद्धाळू मंडळींनी(जी जादूटोणा खरा मानत होती) यातना दिल्या व जाळून मारले. संदर्भ : 'witchcraft' A Skeptic`s Guide To The New Age
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel