राजमाता जिजाऊ १६३९ साली १२ वर्षांच्या शिवरायांना घेऊन पुण्यात आल्या . त्याच वेळेस जिजाउं नजीक स्थायिक असलेल्या विनायक ठाकर नावाच्या गृहस्थांना एक गणराजाची मूर्ती सापडली . गणरायाची मूर्ती सापडली ही आनंदवार्ता कळताच जिजाउंनी गणरायासाठी मंदिर उभारले . तोच हा जिजाउंकडून स्थापन झालेला " कसबा गणपती ". कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत समजले जाते . मानाचा पहिला गणपती . हे स्थान अत्यंत जागृत आहे व त्याबद्दलचे प्रत्यय अनेकांना आलेले आहेत . श्रद्धेने मागितले तर हा मोठमोठाली संकटेही चुटकीसरशी दूर करतो असा अनुभव आहे . मध्यंतरी अशी घटना घडली , की नामजोशी नामक एका गृहस्थांच्या घरात करणी - भानामतीचे विलक्षण किळसवाणे प्रकार सुरु झाले . भानामातीची ही घटना १९५४ -५५ सालातील आहे . पुण्यात नारायण पेठेत ही घटना घडली होती . ज्यांच्या घरी ही घटना घडली त्या गृहस्थांचे नाव आहे अप्पा . ती सर्वच हकीकत अगदी सुरवातीपासून सविस्तर सांगतो .………. एक दिवस संध्याकाळी सातच्या सुमारास अप्पांच्या पत्नी माई बाहेरून घरी आल्या ,तेव्हा दाराशीच ठेवलेल्या एका चमत्कारिक वस्तूने त्यांचे लक्ष आकर्षून घेतले . ती वस्तू तशी लहानशीच होती ; परंतु तिच्याकडे नजर जाताच माईंच्या हृदयात एकाएकी धडधड सुरु झाली . हा प्रकार कही वेगळाच आहे असे त्यांच्या लक्षात आले व त्यांच्या मनात अनेक शंकाकुशंकांनी गर्दी केली . ती चमत्कारिक वस्तू जरा विचित्रच होती . कागदावर कणकेची एक लहानशी दामटी होती . त्या दामटीवर हळद कुंकू वाहिले दिसत होते . माईंनी घरातील प्रत्येकाला बोलावून ती विलक्षण वस्तू दाखवली . पण ती कुणी टाकली , केव्हा टाकली यावर कुणीच प्रकाश पाडू शकले नाही . अखेर त्यांच्या एका धीट मुलाने ती दामटी काठीच्या साहाय्याने तेथून दूर उडवून दिली ; परंतु त्या दामटीने आपले कार्य यापूर्वीच उरकले होते . दुसऱ्या दिवसापासूनच अप्पांच्या घरात भानामतीचे अतिशय किळसवाणे व विचित्र प्रकार सुरु झाले . सुरवातीला गुलाल टाकलेला भात घरात सापडला . विशेष म्हणजे तो भात नुकताच चुलीवरून काढावा इतका काढत असायचा . पुढे पुढे दांडीवर वाळत घातलेल्या धोतरांचे वीत वीत तुकडे आपोआप कापले जाऊ लागले . नंतर त्याच तुकड्यात गुंडाळून घरात दामट्या येउन पडू लागल्या . महिनाभर हेच चालू होत . दुसर्या महिन्यात शिळ्या भाकरीवर गुलाल-कुंकू टाकलेले आढळले . त्या पुढची पायरी म्हणजे पिण्याच्या पाण्यात गुलाल आणि लिंबे पडू लागली . विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे , एकावर एक अशा तीन -चार घागरी ठेवलेल्या असल्या तरी अगदी तळातल्या घागारीतही या वस्तू ' प्रकट ' होऊ लागल्या ! एकदा तर देवघरात ठेवलेल्या भागवताच्या पोथीवर देखील एक लिंबू अवतीर्ण झाले ; पण अप्पा आणि त्यांची कुटुंबीय मंडळी खरी वैतागली ती त्यानंतरच्या प्रकारामुळे . कारण तिसर्या महिन्यात या प्रकारांनी अगदी टोकच गाठले . चुलीवर शिजत ठेवलेल्या अन्नात चक्क ' विष्ठा ' पडू लागली . आप्पांची आता जेवायचीही पंचायीत झाली होती . अन्न शिजत ठेवायची काही सोयच राहिली नाही . एकदा तर देवाच्या मूर्तीजवळच विष्ठा आढळली . त्याच्या दुसऱ्या दिवशी देवघरातले देवही आपोआप कपड्यात गुंढाळले गेले . तसेच , भागवताच्या पोथीवरही गुलाल पडला . प्रत्यक्ष देवघरात हे प्रकार सुरु झाल्यावर मात्र अप्पा चांगलेच हबकून गेले ! साऱ्यांचीच मने विषण्ण झाली . काय करावे ? कुठे जावे ? कुणाला भेटावे ? अप्पा अगदी चक्रावून गेले . घरात जेवणाची तर सोयच नव्हती . दुधात , पाण्यात , अन्नात सगळीकडे विष्ठा पडत होती . तिच्या वासाने डोके अक्षरशः भणाणून जात होते . यात आणखी एका विलक्षण प्रकारची भर पडली . रस्त्याने चालता चालता घरातल्या मंडळींच्या अंगावरील कपडे आपोआप कातरले जाऊ लागले . हे सगळे प्रकार रात्रीचे आठ ते सकाळी सात या काळात अधिक प्रमाणात घडत होते . विशेष म्हणजे पौर्णिमेच्या आणि अमावस्या या दोन दिवशी यातला एकही प्रकार घडत नव्हता . याच वेळी कुणीतरी अनाहूत सल्ला दिला … "चुलीवर अन्न शिजत असताना घरात ' हरिविजय ' , 'रामविजय ' हे ग्रंथ वाचा . " हा सल्ला खरच खूप फायदेशीर ठरला . कारण असे वाचन चालू असताना हे प्रकार घडत नसत . त्यामुळे ही मंडळी कुणाला तरी पोथी वाचायला सांगून तेवढ्या काळात अन्न शिजवून भोजन उरकू लागली . या पोथी वाचनाच्या जोडीला ' रामरक्षा ','गणेश अथर्वशीर्ष ' यांचेही पाठ सुरु झाले ; परंतु मग प्रयोगकर्त्यांनी अधिकच जोरात प्रयोग सुरु केले व त्यामुळे घरात बिब्बे , कणकेच्या बाहुल्या ,लसणीच्या कांड्या इत्यादी वस्तू आपोआप येउन पडू लागल्या . या वस्तू कशा येउन पडतात ? त्या कोण टाकते ? हे कुणालाच कधीच समजले नाही . तसेच , या वस्तू प्रत्यक्ष घरात पडताना कधीच कुणाला दिसल्या नाहीत ! शेवटी या सर्व प्रकाराला कंटाळून अप्पांनी मोठमोठ्या मंत्रीकांकडे धाव घेतली ; परंतु तेही हतबल झाले . अशा प्रकारे ४ महिने उलटले . भानामतीचे सर्व प्रकार आलटून पालटून सुरूच होते . कारण चोवीस तास पोथी वाचणे केवळ अशक्य होते . अप्पांना आता वेड लागायची पाळी आली ; परंतु लवकरच अप्पांना एक आशेचा किरण दिसला . एक दिवस एक प्रसिध्द प्रवचनकार काशिनाथशास्त्री जोशी यांची व अप्पांची अचानक भेट झाली आणि तेव्हा पासून अप्पांचा अनिष्ट काळच जणू संपून गेला . अप्पांनी घरात घडत असलेली सर्व हकीकत डोळ्यांत पाणी आणून शास्त्रीबुवांना सविस्तर निवेदन केली व त्यातून सुटण्याचा मार्ग विचारला . त्या दिवशी योगायोगाने चतुर्थी होती . शास्त्री बुवांनी क्षणभर डोळे मिटले आणि ते म्हणाले ,"अप्पा आज गणेश चतुर्थी . त्या विघ्नहर्त्या गणेशाला शरण जा . तोच तुम्हाला संकटातून मुक्त करील . तुम्ही अस करा , एक श्रीफळ घेऊन ताबडतोब कसबा गणपतीच्या मंदिरात जा व ते श्रींपुढे ठेवून हे प्रकार बंद होण्याबद्दल त्याची कळवळून प्रार्थना करा . जा . आता एका क्षणाचाही विलंब नको . " शास्त्री बुवांचा हा सल्ला अप्पांना मानवला . त्यांना आता खूपच धीर आला . त्यांनी लगेच एक श्रीफळ विकत आणले व ते त्याच पावली कसबा गणपतीच्या मंदिरात गेले आणि श्रीफळ देवापुढे ठेवून त्यांनी श्रीगजाननाची कळवळून प्रार्थना केली आणि आश्चयाची गोष्ट म्हणजे , अगदी त्याच क्षणापासून त्यांच्या घरातले भानामतीचे प्रकार जे बंद पडले ते कायमचेच . कालीयुगातही असे चमत्कार घडतात . कमी पडते ती फक्त श्रद्धा , उपासना व चिकाटी ! याच कसबा गणपतीचा अलीकडेच प्रत्ययास आलेला दुसरा एक आश्चर्य कारक अनुभव सांगतो . एका गृहस्थांना नेहमी असे वाटायचे , की आपल्यावर कुणीतरी करणी केली आहे . काही मान्त्रीकांनीही त्यांना तसेच सांगितले त्यामुळे ते पुरते घाबरून गेले . मांत्रिकांनी काहीतरी उपाय केले ; परंतु आपली करणीची बाधा निघाल्याचा विश्वास काही त्या गृहस्थांना वाटेना . आपल्या शरीरात एक तामसी शक्ती वास करत आहे असे त्यांना प्रत्येक क्षणाला वाटत होते . एकदा सहज बोलता बोलता त्यांनी ही व्यथा वि. के . फडक्यांना सांगितली . ती ऐकून त्यांनी एक श्रीफळ घेऊन कसबा गणपती मंदिरात जाण्यास सांगितले . श्रींची प्रार्थना करण्यास सांगितले . त्याप्रमाणे ते गृहस्थ श्रीफळ घेऊन मंदिरात गेले . आपली मनोव्यथा सांगून श्रींची कळवळून प्रार्थना केली . व ते श्रीफळ त्यांच्यासमोर ठेवले . नंतर ताबडतोब त्यांनी घरी येउन फडक्यांना आपला तेथील अनुभव सांगितला . ते म्हणाले " काय सांगू ? मी श्रींची प्रार्थना करून त्यांच्यासमोर श्रीफळ ठेवले आणि त्याच क्षणी माझ्या शरीरातून काही तरी दुष्ट शक्ती एका झटक्यासरशी बाहेर नुघून गेल्याचे मला स्पष्ट जाणवले ." बाधेतून मुक्त झाल्यामुळे त्यांच्या चेहेर्यावर आनंद ओसांडून वाहत होता . आपली करणीची बाधा नष्ट झाल्याची खात्री त्यांना पटली . त्यानंतर त्यांची जी गणरायावर श्रद्धा बसली ती कायमचीच . आता ते सुखात आहेत . कालीयुगातही असे चमत्कार घडतात . कमी पडते ती फक्त श्रद्धा , उपासना व चिकाटी ! गणपती बाप्पा मोरया
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel