आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव...
भाग ४ था .
तेजोमहालयाच्या महिरपी दरवाज्यातून कोटाच्या आत शिरले की दोन्ही बाजूंना कमानीदार पडव्या दिसतात. साधारण २० – २५ खोल्या असलेल्या या पडवीमधल्या प्रशस्त रस्त्याने सरळ गेले की आपण एका भव्य चौकापर्यंत येतो. ह्या चौकाला ’हत्ती चौक’ म्हणतात, कदाचीत कधीतरी ह्या दरवाज्यातून हत्ती येतजात असतील. ह्या भव्य चौकाच्या मधोमध डाव्या हाताला तोंड करुन उभे राहिले की समोर अनेक मजली लाल दगडी भव्य दार दिसेल. त्यातून आपण सरळ आत गेलो की आत लांबलचक बाग व बागेच्या पलिकडे संगमरवरी ताजमहाल असे विलोभनीय दृश्य दिसते. मागच्या बाजूला ताजजंगकडे बाहेर पडण्याचा दरवाजा आहे. ताजजंग हे तत्कालिन प्राचिन नगर होते, तेजोमहालय हे १२ ज्योतिर्लिंगापैकी नागनाथेश्वराचे मुळ देवस्थान असताना ताजजंग हे त्या प्राचीन तीर्थक्षेत्राचे नाव होते. इ.स. १००० पासून महंमद गझनीच्या हल्ल्यापासून भ्रष्ट होत जाऊन ’ताजजंग’ ह्या तीर्थक्षेत्राचे महत्व हळु हळु कमी होते गेले, संपले.
ज्या पश्चिम दरवाज्याने आपण भव्य चौकात येतो, त्या बरोबर समोर पुर्वेलाही असाच भव्य दरवाजा आहे, त्या पुर्व दरवाज्याने बाहेर पडल्यावर डाव्या बाजुला वळून कोटालगत चालु लागलो की साधारण १५ – २० पावलांवर आपल्याला गोठ्यासदृश्य बांधकामाचा भव्य दरवाजा दिसतो. आता जर ताजमहाल ही एक कबर आहे, तर तिथे गोठा कशाला, बेगमेच्या थडग्यावर काय दुध वाहण्याची पद्धत होती की काय? पण होय, जर तिथे शिवलिंग / शिवालय असते, तर त्यावर दुग्धाभिषेक नियमीत होत असता / होत असलाच पाहीजे.
हा गोठा पाहून आपण कोटाजवळच्या उतरंडी रस्त्याने पुढे गेलो की कोट संपतो तेथे बुरुजाजवळच्या डाव्या हाताला वळल्यावर आपण ताजमहालाच्या मागच्या बाजूस येतो. या ठिकाणी मस्त मऊ वाळू असलेला साधारण १०० फुट रुंद आणि ४०० फुट लांब असा यमुना नदीचा किनारा आहे. ताजमहालाच्या मागच्या बाजुला असलेली दोन दारे ह्या घाटावर उघडतात. ह्या दारांपाशी संपणाऱ्या दोन्ही जिन्यांवरुन संगमरवरी चौथऱ्याच्या तळाशी असलेल्या लाल दगडाच्या गच्चीवरुन दोन मजले उतरुन यमुना घाटावर उतरता येते.
तेजोमहालयाच्या पिछाडीच्या यमुनेकाठी उभे राहून तेजोमहालयाचे निरीक्षण केल्यास आपल्याला पिछाडीची ४०० फुट लांब लालदगडी भिंत दिसते. या भिंतीत दोन मजले असून एक मजला चौथऱ्यात आहे, ह्याची दोन दारे दोन टोकांशी दिसतात. श्री. पु. ना. ओक ह्यांच्या पुस्तकातल्या उल्लेखाप्रमाणे ह्या दोन दारांपैकी जे दार डाव्या बाजूला आहे ते मोडकेतोडके असून त्याच्या फळीचा एक तुकडा अमेरिकेस नेऊन कार्बन-१४ नावाची चाचणी केली असता ते दार शहाजहान बादशहाच्या सुमारे १०० वर्षे आधीचे असल्याचे या चाचणीच्या अहवालातून सिद्ध झाले असल्याचे समजते.
संगमरवरी चौथऱ्यावर एक मजला दिसतो. त्यात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एकामागून एक नुसत्या कमानीच दिसतात. हा मजला लाल दगडांनी बांधलेला असून, प्रत्येक कमानीत एक खोली अशा एकुण २२ खोल्या या मजल्यावर असाव्यात. ह्या खोल्यांना निदान २ – ३ तरी झरोके / खिडक्या असाव्यात, कदाचित हे सर्व बांधकाम बादशहा शहाजहानच्या कारकिर्दीपासून बुजवले गेले असावे. इमारतींना सात मजले बांधायची पुर्वापार चालत आलेली वैदिक परंपरा असून शहाजहान बादशहाने बुजवलेले दोन मजले, लाल दगडात बांधलेले दोन मजले, त्याच्यावरचे संगमरवरी चार मजले आणि भुपृष्ठावरील एक मजला असे एकुण सात मजल्यांची परंपरा तेजोमहालयानेही जपली आहे.
तेजोमहालयाच्या मागच्या बाजुला असलेल्या मऊशार वाळुवरुन चालत चालत पश्चिमेच्या टोकाजवळून डाव्या हाताला वळले की तिथून पश्चिमेकडील भव्यकोट दिसतो. तिथे ज्या इमारतीचा सध्या मशिद म्हणून वापर होतो आहे ती इमारतही सात मजली असल्याचे आपल्या निदर्शनास येते. त्या सातमजली इमारतीच्या पलिकडे एक अष्टकोनी मनोरा असून त्यात सातमजली विहीर आहे, त्या विहीरीच्या आत उतरण्यासाठी लाल दगडी पायऱ्यांचा प्रशस्त जिना आहे. पश्चिमेकडील हा कोट जाडजुड असून त्याच्या माथ्यावर छोटी गच्ची आहे. गच्चीच्या खाली जाडजुड कोटाच्या आत मोठमोठी दालने असून आत उतरणारा जिनाही आहे. ह्या पश्चिम कोटाच्या बाजुने विहीरीच्या मनोऱ्यानंतर एक उंच जिना आहे, हा जिना चढून वर आलो की आपण तेजोमहालयाच्या बागेच्या आवारात म्हणजे संगमरवरी ताजमहालाच्या अगदी समोर येऊन पोहोचतो. थोडक्यात आपली या तेजोमहालयाभोवती एक प्रदक्षिणा पुर्ण होते.
आपण पुन्हा जर ताजजंगच्या दरवाज्याकडे तोंड करुन उभे राहिलो की ताजजंगचे दार एका उंच चौथऱ्यावर बांधलेले दिसते. ह्या दाराच्या तुलनेत पुर्व आणि पश्चिमेच्या दिशेने असणारी दारे जमिनीलगत आहेत, सहाजिकच ताजजंगच्या दाराकडे पाहून त्याचे काहीतरी वैशिष्ठ्य असावे हे सहज मनात येते, ते वैशिष्ट्य म्हणजे हे दार तेजोमहालयाच्या अगदी सरळ रेषेत आहे. आपण जर ताजजंगच्या दरवाज्याबाहेर पडून ताजजंगच्या गल्लीत उभे राहुन तेजोमहालयाकडे तोंड करुन उभे राहिलो, की प्रथम ते ताजजंगचे द्वार, मग प्रशस्त पटांगण, त्यानंतर आपण प्रवेशाची तिकीटे काढतो ते सात मजली भव्य दार, त्या दाराच्या पलिकडे लांबलचक प्रशस्त बाग, त्या बागेत तेजोमहालयाच्या दिशेने जाणारी कारंजांची दुहेरी रांग आणि सर्वात शेवटी संगमरवरी रंगात तळपणारा तेजोमहाल असा सुंदर चित्रवत देखावा आपल्या नजरेस पडतो.
ताजजंगचे जे दार आहे, त्या दाराला स्थानिक लोक ’सिढी दरवाजा’ म्हणतात. ह्या दरवाज्याला कुठेही शिड्याबिड्या बनवलेल्या / चितारलेल्या / खणलेल्या नाहीत, मग ह्याला सिढी दरवाजा हे नाव का? त्या दारातून आपण जेव्हा आत जातो, तेव्हा त्या दारावर मधोमध एक कोनाडा दिसतो, त्या कोनाड्यावर असलेले काही तरी उपटून नेल्याच्या खुणा दिसतात. आपल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांवर या ठिकाणी श्रीगणेशाची किंवा मारुतीरायाची स्थापना केलेली असते; कदाचित या कोनाड्यातही श्रीगणेशाची मुर्ती असावी, आणि कदाचित या दरवाज्याचे नाव पुर्वी ‘श्री दरवाजा’ असावे, ज्याचा अपभ्रंश होत होत कालांतराने त्याचे नाव सिढी दरवाजा झाले असावे. ताजजंगच्या दारातून आत आल्यावर डाव्या / उजव्या बाजुला काही अंतरावर लांबलचक कमानीदार पडव्यांची रांग नजरेस पडते. प्राचिन काळी कदाचित ह्या खोल्यांतुन हिंदु राजेरजवाड्यांचे सेवक, भालदार, चोपदार, भोई, अंगरक्षक, सैनिक इ. लोकांचा वावर असु शकेल. कदाचित ह्या पडव्यांमध्येच प्राचिन काळापासून बाजार भरवला जात असेल. ह्या बाजारात फिरण्याच्या निमित्तानेच अनेक परदेशी प्रवाशांनी तेजोमहालयाच्या भव्य आणि रेखीव सौंदर्याचे फार जवळून निरिक्षण केले असावे. पडव्यांच्या थोडे पुढे गेल्यावर आपल्या दोन्ही बाजुला उंचावर हिरवळी असलेल्या परिसराला ‘जिलोखाना’ ( सहलींसाठीची बाग ) म्हटले जाते. (बेगमेच्या कबरीत सहलीची बाग कशाला बांधली असेल, कदाचित आजही ते दोन्ही प्रेमळ जीव मरणोपरांत एकत्र येत असतील सहलीसाठी ). शिवमंदीरात मात्र हिरवळीची जागा आजही बनवली जाते.
तिकीट खरेदी करुन ज्या दरवाज्यातून आपण आत जातो, त्या दरवाज्याच्या मधोमध उभे राहून वरच्या दिशेने आपली दृष्टी टाकली, की एकावर एक अशी अनेक मजल्यांची रचना दिसते. ह्या दाराच्या आतल्या भागावर सर्व बाजूला वेलबुट्टीची नक्षी चितारलेली आहे. त्या नक्षीत जरा निरखुन पाहिले की तीन तोंडी गणेशाची प्रतिमा दिसते. डाव्या-उजव्या बाजुला गणेशाची दोन व मधोमध समोरुन दिसणारे एक अशा तीन तीन तोंडाच्या ह्या गणेशाची वेलबुट्टी त्या दाराच्या चारही भिंतींवर कोरलेली आहे.
आता पुन्हा आपण बागेच्या मध्यभागी येऊया, तिथे एक संगमरवरी कुंड आहे, त्याच्या पुर्वेला आणि पश्चिमेला दोन समांतर आणि एकाच आकाराचे अष्टकोनी नगारखाने आहेत. हे नगारखानेही ह्या तेजोमहालयाच्या हिंदुत्वाची साक्ष देतात.
बाग संपल्यावर डाव्या / उजव्या कोपऱ्यांना दोन लाल दगडात बांधलेले अष्टकोनी मनोरे आहेत, त्यातील डाव्या मनोऱ्यात सात मजली विहीर आहे. ह्या विहीरीच्या गजांना सध्या कुलुप घातलेले असते, पण गजांमधून खाली उतरण्यासाठी बांधलेला जिना नजरेस पडतो. ही खजिन्याची विहीर आहे. तेथे पाण्यानजिकच्या मजल्यात तिजोऱ्या ठेवत असत. अचानक वेढा पडून शत्रूस शरण जावे लागले तर तिजोऱ्या पाण्यात लोटून दिल्या जात असत. त्यामुळे ते धन शत्रुच्या हाती लागत नसे. अशा अनेक मजल्याचा विहीरी असणे ही त्या त्या परिसरातील हिंदुत्वाची खुण आहे. तेजोमहालयाच्या विहीरीत तिजोरीजवळ हिशेबनीस बसत, वरच्या मजल्यांवर वरिष्ठ धनाधिकारी बसत असत. त्यांच्याच आज्ञेने उत्सवाच्या वेळी, सणासुदीला मौल्यवान वस्तु, दागदागिने वगैरे काढून दिले जात असत आणि काम संपल्यावर पुन्हा तिजोरीत ठेवले जात असत.
संगमरवरी चौथऱ्यावर आपल्याला अनेक कमानी दिसतात, त्या प्रत्येक कमानीखाली एक खोली असण्याची शक्यता आहे. संगमरवरी चौथऱ्याचा आकार साधारण ८ फुट उंच, ३१० फुट लांब आणि साधारण तेवढाच रुंद आहे. ह्या प्रत्येक रांगेत साधारणत: २० खोल्या तरी असाव्यात असे मानले तर साधारणत: ४०० खोल्या संगमरवरी चौथऱ्यात असतील. त्या खाली नदीसपाटीपर्यंत लाल दगडात दोन मजले आहेत, ह्या दोन्ही मजल्यांवरही प्रत्येकी ४५० खोल्या असु शकतील. शिवाय वर जे संगमरवरी दोन मजले आहेत त्यात एका मजल्यावर केंद्रीय कक्ष धरुन सुमारे १३ कक्ष आणि वरच्या मजल्यावर घुमटाची पोकळी असल्याने मधला कक्ष वगळता एकुन १२ कक्ष आहेत, त्याशिवाय गच्ची, गच्चीवर घुमट आणि चार कोपऱ्यात चार अष्टकोनी छत्रे आहेत, ही ‘पाचाची’ रचना, वैदिक पद्धतीतील पंचगव्य, पंचेंद्रीय, पंचपाळे अशासारख्या पंचरत्नाची कल्पना करुन बांधली असावी.
तेजोमहालयाच्या आत आल्यावर थोडे वरती पाहिले की संगमरवरी कमानींच्या शेंड्यावर त्रिशुळासारखी रक्तवर्णी कमळाची आकृती दिसते. त्यावर कमानींच्या दोन्ही कड्यांना कुराणाची कलमे कोरलेले दगड चिकटवले आहेत. ते दगड खुप वेगवेगळ्या रंगांचे असल्यामुळे पटकन नजरेत भरतात. कमानींवर जी कुराणांतील कलमे कोरुन पट्टी लावली आहे त्याच्या वरच्या बाजुला घंटांची रांग कोरलेली दिसते. त्या घंटांच्या रांगेवर नागनागिणीची युगुले जोड्याजोड्यांनी एकामेकांकडे फणा काढून टकामका वर्षानुवर्षे पहात असल्याचे कोरीव काम आहे.
तेजोमहालयाचा मुळ संगमरवर पिवळसर केतकी रंगाचा असून त्याच्यावर चिकटवलेले संगमरवर दुधाळ पांढऱ्या रंगाचे आहेत. ह्या तेजोमहालयाचा कळसाचे नीट निरिक्षण करायचे असेल, तर जेव्हा या कळसाची सावली संगमरवरी फरशांवर पडते, तेव्हा करावे. हा कळस सोन्याचा असून, त्याच्यावर चंद्रकोर आहे. विवाहीत हिंदु स्त्रिया असे कुंकु लावतात, श्री सांबाच्या पिंडीवरचे चंदनाचे गंध अशाच आकाराचे असते. चंद्राकृती गंधाच्या मधोमध कलशदंडाचा आकार दिसतो. शिवाय या दांड्यावर कलश, त्या कलशाच्या मुखाशी वाकलेली दोन आंब्याची / तांबुलाची पाने, आणि त्यांच्यावर नारळाची रचना केल्यासारखा हा पुर्ण कुंभाचा कळस आहे. लांबून हा कळस त्रिशुळासारखा दिसतो.
तेजोमहालयाच्या तळघरात मुळ शिवलिंग आणि वरच्या मजल्यावर त्या शिवलिंगाची प्रतिकृती अशी पारंपारिक रचना केलेली असावी. ह्याच प्रकारच्या शिवलिंगाच्या रचनांचा उल्लेख आजही उज्जयनीच्या महाकाळेश्वर मंदिराच्या आणि प्रभास येथील सोरटी सोमनाथाच्या बांधकामाच्या रचनेच्या बाबतीत सापडतो.
तेजोमहालयाच्या संगमरवरी मजल्याच्या केंद्रीय अष्टकोनी कक्षाच्या उंबरठ्याच्या डाव्या-उजव्या बाजुच्या भिंतींवर असलेल्या नक्षीकडे पाहिले की तेथे केतकी रंगाच्या संगमरवरात फुलेझाडे कोरली असून त्यातल्या फुलांना ‘ॐ’ चा आकार दिल्याची नक्षी दिसते. ही नक्षीतील
फुले शिवपुजेला लागणाऱ्या धोतऱ्याच्या फुलांसारखी असल्यासारखी दिसतात. केंद्रीय अष्टकोनी कक्षाभोवती प्रदक्षिणा घालतात प्रत्येक ठिकाणी झरोखे असून, त्यातुन आतील दृश्य साफ दिसते, कदाचीत या ठिकाणी असलेल्या शिवलिंगाचे दर्शन प्रदक्षिणा करताना व्हावे म्हणून ह्या झरोख्यांची रचना केली गेली असेल. प्रदक्षिणेचा कक्षाभोवती गुळगुळीत आणि चकचकीत संगमरवराच्या जाळ्या बनवलेल्या आहेत.
गर्भगृहाच्या आत आल्यावर घुमटाच्या आतल्या बाजुची नक्षी पाहिली की त्यात एक लहान वर्तुळ दिसते, त्यात अष्टदिशांचे निदर्शक आठ बाण कोरले असून त्याच्या मध्यातुन लोखंडाची एक जुनी साखळी लोंबत असलेली दिसते. अष्टदिशादर्शक बाणांच्या वर्तुळानंतर १६ नागांचे एक रिंगण आहे, त्यानंतर ३२ त्रिशुलांचे एक वलय आहे, आणि त्याच्या नंतर ६४ कमळाच्या कळ्यांचे एक वर्तुळ आहे. ह्या कोरीव कामामधली सर्व चिन्हे शिवमंदिराची निर्देशक आहेत. संगमरवरी जाळ्यांच्या किनारींत कोरलेले पुर्ण कलश आणि चारी चौकटीच्या स्तंभांवर बसवलेले कलश मोजले तर त्यांची बेरीज बरोबर १०८ येते.
तेजोमहालयाची परिक्रमा पुर्ण करुन आता परतीच्या मार्गावर बाहेर पडून आपापल्या चपला / बुट घालताना पुन्हा एक विचार मनात घोळू लागतो, तो म्हणजे या संगमरवरी चौथऱ्यावर नंदी आणि सांबसदाशिव असल्यामुळे पादत्राणे खाली काढून ठेवण्याची प्राचीन आणि पवित्र परंपरा अजुनही निर्विवाद चालु आहे.
तेजोमहालयाची ही कहाणी ऐकल्यावर / वाचल्यावर मात्र एक प्रश्न अनुत्तरीत रहातो, तो म्हणजे तेजोमहालयाची निर्मिती नक्की कधी झाली आणि कुणी केली. ह्या विषयीचा एका जुन्या शिलालेखाचा आधार घेता येईल, या शिलालेखाचे वटेश्वर शिलालेख असे नामकरण केलेले असून ह्यावर काही संस्कृत श्लोक कोरलेले आहेत.
प्रासादो वैष्णवस्तैन निर्मितोतर्वहनहरि
मूर्ध्ना स्पृशति यो नित्यं पदमस्तैव मध्यमम ॥ १ ॥
अकारयच्च स्फटिकावदातमसाविदंमंदिरमिंदुमौले
न जातु यस्मिन्निवसन्सदेव: कैलासवासाय चकार चेन ॥ २ ॥
पक्षत्रयक्षमुखादित्य संख्ये विक्रमवत्सरे
अश्विन शुक्ल पंचम्या वासरे वासवे शिते: ॥ ३ ॥
ह्या श्लोकांच्या अर्थाप्रमाणे राजा परमादिदेवाचा मंत्री सुलक्षण ह्याचा हा शिलालेख असून त्याने राजाज्ञेवरुन श्लोकांत वर्णन केलेल्या वास्तु उभारल्या.
राजा परमादिदेवाने हरीची मुर्ती प्रतिष्ठापीत केलेला एक राजवाडा उभारला, ह्या हरीच्या चरणी राजा दररोज नतमस्तक होत असे. ॥ श्लोक १ ॥
त्या राजाने इंदुमौलेश्वराचे एक स्फटिकशुभ्र, निष्कलंक मंदिरही बांधवले, ते मंदिर इतके शोभिवंत आणि भव्य होते, की त्यात प्रतिष्ठापना केल्यानंतर शिवशंकराला कैलासाला जाण्याची इच्छाच उरली नाही. ॥ श्लोक २ ॥
विक्रम संवत १२१२ म्हणजे इ.स. ११५६ अश्विन शुक्ल पंचमी, रविवार ही त्या शिलालेखाची तिथी असून त्याआधी ह्या दोन्ही इमारती बांधून पुर्ण झाल्या होत्या ॥ श्लोक ३ ॥
इतके सगळे वाचुन झाल्यावर प्रत्येक वाचकाच्या मनात असा प्रश्न येऊ शकतो, की आजपर्यंत गेली कित्येक वर्षे कैक इतिहासकारांनी आणि मान्यवरांनी एक निस्सिम प्रेमाचे प्रतिक म्हणून गौरवलेल्या, ज्याच्या शपथा घेऊन अनेकांनी आपले संसार सुरु केले अशा, ज्याच्या ऐकीव गोष्टींवर अनेक अजरामर सिनेमांची निर्मिती झाली अशा भव्य दिव्य स्वप्नवत कलाकृतीवर आजच हा लेख का? कशासाठी? तर अशा वाचकांना माझी इतकीच विनंती आहे, की ज्या दिव्य प्रेमाच्या प्रतिकाला प्रत्येक रसिक मनापासून दाद देतो / मान देतो, ते प्रतिक नक्की कोणाच्या प्रयत्नांमुळे बांधले गेले, जी अजरामर प्रतिकृती आज इतक्या वर्षांपश्चातही अस्तित्वात आहे तिचा जनक कोण याची जाणिव प्रत्येक रसिकाला हवी, यासाठीच हा लेख लिहिण्याचा खटाटोप.
Pic - 1 दरवाज्यावर दिसणाऱ्या अनेक नक्षी अनुक्रमे – नागनागिणिंच्या युगुलांची नक्षी, त्यानंतर कुराण कोरलेला दगड, आणि त्याच्या खाली वेलबुट्टींची नक्षी
निदान ह्या फोटोंकडे पाहुनतरी ह्या प्रतिकृतीचा जनक कोण आहे, हे वाचकांनी लक्षात घ्यावे, आणि ह्यानंतर निदान एकदा तरी इंदुमौलेश्वराचे मंदिर ह्या नजरेनी ताजमहाल पहावा, त्यातील ईशत्वाची नक्कीच प्रचिती येईल.
वाचकांनी हा लेख वाचताना कृपया नोंद घ्यावी, या लेखाचा उद्देश कोणत्याही धर्माचा, कोणत्याची जातीजमातीचा, कोणत्याही प्रतिष्ठीत स्त्रीपुरुषाचा वैयक्तीक अपमान करण्याचा नाही. मी आजपर्यंत ५ – ६ वेळा तेजोमहालय अंतर्बाह्य बघितलेला आहे, प्रत्येक वेळेला मला काहीनकाही तरी खटकले, म्हणुन या विषयाचा खोलवर अभ्यास करुन मी हा लेख लिहीला आहे. यात मांडलेले विचार हे संपुर्णपणे माझे वयक्तिक आहेत, ताजमहालाची बांधणी ही निसंशय नितांत सुंदर असुन न भुतो न भविष्यती अशीच आहे, त्यावर रचलेली प्रेमकथाही तितकीच तरल आहे, पण आज जो ह्या प्रेमकथेचा विपर्यास केला गेला आहे, तो माझ्या मनाला पटला नाही आणि म्हणुनच ह्या असामान्य कलाकृतीचा इतिहास काय असावा ह्या विचाराने झपाटली जावुन मी जो जो काही अभ्यास केला त्यानुसार माझी मते मांडली आहेत.
संदर्भसुची
१. Myth about Tajmahal – Mr. Athavale
२. Tajmahal : a true story – Mr. Oak
३. Tajmahal : Was it a vedic temple – Mr. Stephan Knabb
समाप्त ...
संदर्भ :- medhakanitkar blog
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.