मोरगावचा मोरया मयुरेश्वर हा अष्टविनायकांपैकी एक . पहिलाच गणपती . हा मोरया मनी इच्छिलेले लगेच देतो असा अनुभव आहे. ... त्याबद्दलची आजची ही छोटीशी कथा ... गणपतीबुवा म्हसकर हे कोकणातील शिरगावचे राहणारे , घरात लहानपणापासून अठरा विसवे दारिद्र्य . काही वेळा तर घरात अक्षरशः फुटकी दमडीही नसे . लहानपणी गणपतीबुवानी पुढील श्लोक पाठ केला होता , " कऱ्हेच्या तीरी एकसे मोरगाव | तिथे नांदतो पहा मोरया देव | चला जाऊ यात्रे महापुण्य आहे | मनी इच्छिले मोरया देत आहे || " मोरगावचा हा मोरया जर मनात इच्छिलेले सर्व देतो तर आपण एकवार मोरगावला जाऊन त्याला दारिद्र्य दूर करण्याबद्दल सांगायला काय हरकत आहे , असा विचार करून गणपतीबुवा मोरगावचा पत्ता शोधीत शोधीत एकदाचे खरोखरच मोरगावला येउन पोहोचले . त्यांनी मोरयाला प्रथम डोळे भरून पाहून घेतले आणि बरोबर आणलेले गुळ- शेंगदाणे खाऊन ते ओवरीत स्वस्थ बसून राहिले . त्याच वेळी एक सिद्धपुरुष मोरयाच्या दर्शनासाठी मंदिरात आला होता . दर्शन घेऊन झाल्यावर त्याचे लक्ष सहज ओवरीत संचित बसलेल्या त्या तरुणाकडे - गणपतीबुवाकडे गेले - व त्याने मोठ्या आपुलकीने त्याची चौकशी केली व मोरगावला येण्याचे कारणही त्यास विचारले . तेव्हा गणपतीबुवानी आपल्याला येत असलेला तो श्लोक म्हणून दाखविला व गणपतीने आपले दारिद्र्य दूर करावे अशी आपली इच्छा असल्याचे त्या सिद्धपुरुषाला सांगितले. गणपतीबुवांचा तो भोळा भाव पाहून त्या सिद्धपुरुषाला त्यांची दया आली व त्याने गणपती बुवांना लगेच एक उपासना दिली आणि तो म्हणाला,की " मी दिलेल्या मंत्राचे तू एकवीस दिवसात पूरश्चरण कर म्हणजे श्री गजानन कृपेने तुझी इच्छा पूर्ण होईल.!" गणपतीबुवांनी लगेच दुसऱ्याच दिवसापासून पूरश्चरण करण्यास मोठ्या निष्ठेने सुरुवात केली व एकवीस दिवसात ते पूरश्चरण पूर्ण केले. त्यानंतर त्या सिद्धपुरुषाच्या आज्ञेवरून ते मुंबईस गेले. तेथे एके रात्री त्यांच्या स्वप्नात एक मनुष्य येऊन म्हणाला , " उद्या तुझ्या कडे दोन माणसे येतील व जहाजाविषयी प्रश्न विचारतील. त्यांना सांग कि विलायतेहून माल भरून आलेली तुमची जहाजे बुधवारी दुपारी समुद्राच्या किनार्याला येउन लागतील. त्या माणसांकडून तुला जे काही मागायचे असेल ते मागून घे." त्याचवेळी त्या जहाजांच्या मालकांनाही जहाजांबद्दलचे प्रश्न विचारण्यासाठी अनंत ऋषींच्या वाडीत राहणाऱ्या गणपतीबुवांकडे जाण्याचा दृष्टांत झाला व ते त्या वाडीचा शोध घेत घेत दुसर्या दिवशी सकाळीच गणपती बुवांकडे हजर झाले. त्यांना पाहताच गणपतीबुवांनी विचारले, कि " तुमचीच जहाजे बेपत्ता झाली आहेत का ? " तो प्रश्न ऐकून ते व्यापारी चकित झाले.! त्यांनी गणपतीबुवांना सिद्धपुरुष समजून वंदन केले. तेवढ्यात गणपतीबुवा म्हणाले," काळजी करू नका ! येत्या बुधवारी दुपारी तीन वाजता तुमची जहाजे सुरक्षित किनार्याला लागतील. " ते ऐकून जहाज मालकांचा जीव भांड्यात पडला. कारण त्या जहाजात लक्षावधी रुपयांचा माल होता. मग त्यांच्याकडे पाहात गणपतीबुवांनी प्रश्नार्थक मुद्रेने विचारले, " की तुमची जहाजे बुधवारी खरोखरच सुरक्षित परत आली तर श्रीँपुढे काय ठेवाल ? " त्यावर ते मालक म्हणाले, " तुमचे भविष्य खरे ठरले तर आम्ही श्रीँपुढे एक लाख रुपये ठेवू ! " एवढे बोलून ते गणपतीबुवांना वंदन करुन निघून गेले. बुधवारी दुपारपर्यँत त्या दोघांची एकसारखी चुळबुळ सुरु होती; परंतु जहाजे येण्याची लक्षणे दिसेना. ते दोघेही विलक्षण अस्वस्थ झाले; पण तीनच्या सुमारास त्यांची जहाजे खरोखरच किना-याला लागली आणि ते दोघेही अक्षरशः आनंदाने नाचू लागले ! आणि पूर्वी कबूल केल्याप्रमाणे दुस-या दिवशी एक लाख रुपये घेऊन गणपती बुवांकडे आले आणि त्यांनी ते पैसे त्यांच्या पायाशी ठेवले ! अशाप्रकारे, ' मनी इच्छिले मोरया देत आहे ' ही काव्यपंक्ती अक्षरशः खरी ठरली ! गणपतीबुवांनी मोठ्या आनंदाने ते एक लाख रुपये क्षणभर स्वतःच्या छातीशी कवटाळले ; परंतु दुस-याच क्षणी त्यांना विरक्ती निर्माण झाली. त्यांची द्रव्यतृणा पार नाहीशी झाली आणि ते पैसे घेऊन ते तसेच शिरंगावी आले व त्यांनी आपल्या त्या जन्मगावी श्रीगणेशाचे एक अतिशय देखणे मंदिर उभारले व राहिलेले सर्व पैसे दानधर्मात खर्च करुन टाकले ! कालांतराने ग्वाल्हेरच्या शिँदे सरकारांनी गणपतीबुवांची कीर्ती ऐकून प्रतिवर्षी बारा हजार रुपये उत्पन्न देणारी दोन गावे गणपतीबुवांना इनाम म्हणून दिली. असे सांगतात, की गणपतीबुवा जेव्हा स्वर्गवासी झाले त्यावेळी त्यांच्याजवळ चक्क रोख वीस लाख रुपये होते !! मोरयाजवळ गणपतीबुवांनी एकदाच मागितले आणि त्याने त्यांना दिले ते जन्मभरासाठीच . कायमचे . कालांतराने ग्वाल्हेरच्या शिँदे सरकारांनी गणपतीबुवांची कीर्ती ऐकून प्रतिवर्षी बारा हजार रुपये उत्पन्न देणारी दोन गावे गणपतीबुवांना इनाम म्हणून दिली. असे सांगतात, की गणपतीबुवा जेव्हा स्वर्गवासी झाले त्यावेळी त्यांच्याजवळ चक्क रोख वीस लाख रुपये होते !!
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel