मालवण तालुक्यातल्या तोंडवली गावात चक्क वाघांचं मंदिर आहे. या व्याघ्रमंदिरात स्वयंभू शिवलिंगाबरोबर वाघांच्या दोन समाधीही आहेत. गावकरी या समाधींचं मनोभावे दर्शन घेतात. पर्यावरण रक्षणाचा आगळा आदर्शच या गावाने घालून दिला आहे
कोकण किनारपट्टीवर निसर्ग सौंदर्याने नटलेली अनेक गावं आहेत. तोंडवली त्यातलंच एक गाव. मालवण-आचरा रस्त्यावरून तोंडवली फाट्यावरून आत आलं की, एका वळणावर समुद्राचं दर्शन होतं. यापुढे गाव संपला, रस्ता थांबला असं वाटतं असतानाच रस्ता नागमोडी होत उत्तरेकडे सरकत जातो. समुद्राची निळाई आकाशाला केव्हा जाऊन भिडते समजत नाही. माडांची बनं समोर दिसू लागतात. सुरूचा भिनभिनता आवाज एखाद्या यंत्रासारखा कानापर्यंत पोहोचत असतो आणि आपण तोंडवलीत पोहोचतो.
याच गावात चक्क वाघाची पूजा होते. यासाठी गावात व्याघ्रेश्वराचे मंदिर आहे आणि गावच्या ग्रामदेवताच्या प्रांगणात दोन वाघांची समाधीही आहे. व्याघ्रेश्वराच्या मंदिरात असलेल्या स्वयंभू शिवलिंगाशेजारी वाघ, बिबट्या ठाण मांडून असतात. ऐकणारा भीतीने गार होतो, पण गावक-यांना त्याचं काही वाटत नाही. गावाच्या शेतीवाड्यांतून जंगलातून वाघ, बिबट्या व अन्य जंगली श्वापदं बिनधास्त फिरत असतात. तोंडवलीच्या छोटेखानी गावच्या हद्दीत कुणी घुसखोरी करू नये म्हणून हद्दीवर निशाण फडकताना दिसतं. गावच्या सीमारेषेवर एक स्तंभही उभा केला आहे. या भागाला ना कुणी अभयारण्य ठरवलं आहे, ना शासनाचा फतवा आहे. परंतु देवाचा आदेश म्हणून अनेक वर्षापासून येथील ग्रामस्थ या भागात कुणाला शिकारी करू देत नाहीत आणि स्वत:ही करत नाहीत. गावातल्या वाघोबाच्या समाधीतून गावक-यांचं इथल्या निसर्गावर किती प्रेम आहे, याची साक्षच पटते.
तोंडवलीला लागूनच असलेल्या वायंगणी गावात पट्टीचे बरकणदार आहेत. त्यांची बंदूक आपल्या भागात येऊ नये म्हणून गावक-यांनी हद्दीवर निशाण रोवले असून त्यापुढे शिका-यांनी येऊ नये, असा अलिखित नियम आहे. शेजारच्या जंगलात एखाद्या प्राण्यावर बंदूक रोखली गेली आणि जखमी श्वापद या गावाच्या हद्दीत पोहोचलं तर, शिकारी त्याचा नाद सोडतात, कारण त्यांना ती शिकार मिळणार नसते.
गावात वाघांची समाधी कशी उभी राहिली, याची एक कथा सांगितली जाते. ४० वर्षापूर्वीची गोष्ट. शेजारच्या गावातून वाघावर गोळी झाडली गेली. जखमी अवस्थेत वाघ तोंडवलीच्या जंगलापर्यंत पोहोचला. अन् अचानक शिका-यांची पावले थांबली. हाका-यांचे आवाज थांबले, कारण वाघ सुरक्षित हद्दीत पोहोचला होता. जखमेमुळे अंतिम घटका मोजणा-या वाघाने तेथेच प्राण सोडला. दुस-या दिवशी गुराख्यांना शिका-याच्या गोळीने मृत झालेला वाघ सापडला. त्यांनी मोठ्या दु:खाने वाघोबाला पालखीत बसविले आणि मंदिराकडे आणून त्याचे दफन केले. त्याची तिथे समाधी बांधली. दुसरी घटना १९९५ची. स्वयंभूकडे जाऊन एक वाघ बसला होता. देवासमोर नतमस्तक झाला होता. असं म्हणतात की, त्याला विषबाधा झाली होती. वाघ देवाच्या गाभा-यात आहे, तो बाहेर पडत नसल्याचं पाहून ग्रामस्थांनी पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलावलं. त्याच्यावर तिथेच औषधोपचार केला. परंतु काही दिवसांतच त्याने प्राण सोडले. वनविभागाची मंडळी वाघाच्या तपासणीसाठी दाखल झाली. त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी तयारी करू लागली. परंतु ग्रामस्थांनी त्यांना रोखले. ‘वाघ हे आमचं दैवत आहे. देव स्वयंभूच्या पायाशी येऊन त्याने प्राण सोडलेत. त्याच्या शरीराला सुरी लावू नका आणि गावातून त्याचे शव बाहेरही नेऊ नका.’ असं वनविभागाच्या मंडळींना सांगितलं, पण त्यांनी आपला हेका सोडला नाही. गावक-यांनी मग रूद्रावतार धारण केला. शेवटी वनविभागाच्या मंडळींना नमतं घ्यावं लागलं. मंदिराच्या उजव्या हाताला विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या शेजारी या वाघोबाला समाधीस्थ करण्यात आले.
व्याघ्रेश्वर मंदिरात स्वयंभू पाषाण आहे. ग्रामस्थ सांगतात, पूर्वी मंदिरापर्यंत समुद्राची व्याप्ती होती. मंदिराच्या ठिकाणी एकदा मच्छीमाराचं जाळं अडकलं ते निघेना म्हणून त्याने ते तिथेच सोडलं. समुद्राला ओहोटी लागल्यावर त्या जाळ्यात एक शिवलिंग अडकलेलं दिसलं. कालांतराने वाळूची भर पडून त्या ठिकाणचा समुद्र मागे हटून जमीन तयार झाली. गावक-यांनी मग तिथे मंदिर बांधलं. १७५२मध्ये देवाची घुमटी बांधल्याचा उल्लेख आढळतो. गावापासून सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर किनारा आणि सुरूबन आहे. तिथेच समुद्र आणि नदीचा संगम झाला आहे. डोंगराच्या पायथ्याला असलेल्या या मंदिराच्या पाठीमागे आणि गावाभोवती घनदाट जंगल आहे. या मंदिरात येऊन वाघ शांतपणे अंतर्गृहात बसतात, हे ग्रामस्थांनी पाहिलं आहे. पूर्वी वाघ मंदिरात नियमित येऊन बसत असत. जणू ती त्याची हक्काचीचही जागा होती. मंदिरात येऊन वाघ डरकाळ्या फोडत असे, म्हणून हा श्री देव व्याघ्रेश्वर म्हणून प्रसिद्ध झाला. स्वयंभूच्या मंदिरात वाघाच्या अनेक तसबिरी आहेत. आजही गावांत दोन ते तीन वाघांचा वावर आहे, असं गावकरी म्हणतात. पण गावातील कोणालाही त्याची भीती वाटत नाही आणि गाई-गुरांना वाघ काही करत नाही. तोंडवली गावात वाघ ही रक्षक देवता मानली जाते. गावात कुणीही शिकारीसाठी जात नाही आणि इतर कुणाला शिकार करूही दिली जात नाही. पर्यावरणरक्षण, व्याघ्र बचाव मोहीम हे शब्द एरवी सरकारी पातळीवरच वापरले जातात, पण तोंडवलीचे गावकरी गेली कित्येक वर्षे आपली स्वत:ची व्याघ्र बचाव मोहीम राबवत आहेत. त्यांनी प्राणीरक्षणासाठी स्वत:च वेगळे नियम आखून घेतलेत. गावात प्राण्याचा कधीच बळी दिला जात नाही.
गावात पावसाळी शेती केली जाते. गाव श्रीमंत नाही, परंतु उत्सवाचा श्रीमंती इथे मोठी आहे. महाशिवरात्र, शिगमोत्सव, त्रिपुरारी पौर्णिमा, रामनवमी हे उत्सव म्हणजे गावची जत्राच असते. या काळात इथल्या सर्वच घरांमध्ये वाघाच्या प्रतिमेचं पूजन होते. प्रत्येक सणात वाघाचा मान पहिला असतो. व्याघ्रेश्वराची कृपा म्हणून गावाची ही दौलत आहे, असं येथील प्रत्येकाचं म्हणणं आहे. पर्यावरणाच्या मोठमोठय़ा गप्पा न करता वाघ वाचवण्याचं कार्य हाती घेऊन तोंडवलीच्या गावक-यांनी आगळा आदर्श घालून दिला आहे. त्याचं अनुकरण अनेकांनी करण्यासारखं आहे.
या शिळेने वळण लावलं..
तोंडवली गावात शिरताना लागणा-या वळणावर एक विशाल शिळा आहे. या शिळेवर तशीच विशाल झाडं आहेत. यातील औदुंबराच्या झाडाखाली छोटेखानी खोली आहे. येथे म्हणे एक साधू बसत, तपश्चर्या करत. या शिळेवरही वाघोबा येई. वाट होती, इवलीशी आणि भीतीदायकही. शिळेतले घर म्हणजे गावच्या रहस्याचं उगमस्थान आहे, असं वाटतं. हवा येण्यासाठी एकच दरवाजा, हाच दरवाजा आत प्रवेश करण्यासाठी. एवढ्या विशाल शिळेत एकच खोली का? हा प्रश्न मनात येईल. वाघोबा येथेच का बसतो? असंही राहून-राहून वाटेल. पण त्याचं उत्तर कुणाकडेच नाही...जुनी-जाणती मंडळी सांगतात,...
- साभार मालवणचे मालवणी भंडारी ...
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.