पुराणांनुसार देवतांचे राजा इंद्र असून यांच्या दरबारात एकापेक्षा एक सुंदर अप्सरा होत्या. अप्सरांचे तारुण्य कधीही कमी होत नाही असे मानले जाते. या नेहमीच तरुण आणि सुंदर राहतात. स्वतःच्या रूप आणि यौवनाने या स्वर्गाची शोभा आणखीनच वाढवतात तसेच नृत्य करून देवतांचे मनोरंजन करतात.
देवराज इंद्र यांचा उपयोग करून शत्रूंवर विजय प्राप्त करतात असेही सांगितले जाते. पुराणांमध्ये अशा अनेक कथा आढळून येतात, ज्यामध्ये देवराज इंद्राने सिंहासन जाण्याच्या भीतीने तपश्चर्येत लीन असलेल्या ऋषीमुनींकडे अप्सरांना पाठवले होते.
अप्सरांनी आपल्या सौंदर्याने ऋषीमुनींची तपश्चर्या भंग करून त्यांना गृहस्थीमध्ये आणले आहे. अशाच प्रकारचे एक काम जेव्हा इंद्राने अप्सरेकडून करून घेतले तेव्हा स्वर्गातील सर्वात सुंदर अप्सरा जन्माला आली.
प्राचीन काळी भगवान विष्णूंनी नर आणि नारायण रुपात अवतार घेतला. नर आणि नारायण महादेवाला प्रसन्न करण्यासाठी केदारखंडमध्ये तपश्चर्येला बसले. (सध्या या ठिकाणी बद्रीनाथ धाम आहे.)
यांची तपश्चर्या पाहून इंद्रदेव भयभीत झाले. इंद्रदेवाला वाटले की नर आणि नारयण स्वर्गलोकावर स्वतःचे वर्चस्व गाजवतील. या संकटातून मार्ग काढण्यसाठी इंद्रदेवाने अप्सरांना नर आणि नारायणाची तपश्चर्या भंग करायला पाठवले.
परंतु नर आणि नारयण या अप्सरांकडे आकर्षित झाले नाहीत. उलट नारायणाने इंद्राच्या अप्सरेपेक्षा सुंदर अप्सरा आपल्या मांडीतून उत्पन्न केली. या अप्सरेचे नाव उर्वशी ठेवण्यात आले. नारायणाने ही अप्सरा इंद्राला भेट स्वरुपात दिली.
उर्वशी स्वर्गातील सर्वात सुंदर अप्सरा असल्यामुळे सर्व देवता तिच्या रूपावर मोहित होते. तरीही उर्वशीचे प्रेम पृथ्वीवर राहणाऱ्या एका मनुष्यावर जडले होते. या पुरुषाचे नाव अर्जुन होते. जेव्हा अर्जुन महाभारत युद्धामध्ये विजय प्राप्त करण्यासाठी इंद्रलोकात दिव्यास्त्र घेण्यासाठी आला होता, तेव्हा ही घटना घडली होती.
इंद्रलोकात भ्रमण करताना अर्जुन आणि उर्वशी समोरासमोर आले. अर्जुनाला पाहताच उर्वशी अर्जुनाच्या प्रेमात पडली. त्यनंतर उर्वशीने अर्जुनासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. परंतु अर्जुनाने उर्वशीला लग्नासाठी नकार दिला. यामुळे दुःखी उर्वशीने अर्जुनाला नपुंसक होण्याचा शाप दिला.
उज्जैनचे प्रसिद्ध राजा विक्रमादित्य यांच्या भावाचे नाव राजा भर्तृहरी होते. एकेकाळी राजा भर्तृहरी यांना अत्यंत विद्वान, ज्ञानी राजा म्हणून ओळखले जायचे. परंतु दोन पत्नी असूनही ते पिंगला नावाच्या अतिसुंदर राजकन्येवर मोहित झाले. राजाने पिंगलाला तिसरी पत्नी बनवले. पिंगलाच्या रूपरंगावर आसक्त झालेला राजा विलासी झाला. राजा पिंगलाच्या तालावर नाचू लागला होता. याच गोष्टीचा फायदा घेत पिंगला व्यभिचारिणी(चारित्र्यहीन स्त्री) झाली. ती घोडे सांभाळणार्या सेवकाच्या प्रेमात पडली. राजाला पिंगलाचे हे कृत्य माहिती नव्हते, कारण तो तिच्या प्रेमात आंधळा झाला होता. जेव्हा छोटा भाऊ विक्रमादित्यला ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी मोठ्या भावाला या संदर्भात सर्व माहिती दिली. त्यानंतरही राजा भर्तृहरी पिंगलाच्या बाजूनेच उभा राहिला आणि विक्रमादित्यवरच वाईट चारित्र्याचा आरोप लावत त्याला राज्यातून बाहेर काढले.
अनेक वर्षानंतर पिंगलाचा व्यभिचार उघड झाला, जेव्हा एका तपस्वी ब्राह्मणाने कठोर तपश्चर्या करून देवतांकडून मिळालेले अमरफळ( हे फळ खाणारा व्यक्ती अमर होतो) राजाला भेट स्वरुपात दिले. राजा पिंगलाच्या प्रेमात एवढा आंधळा झाला होत की, त्याने हे फळ तिला दिले. कारण हे फळ खाल्ल्यानंतर पिंगला नेहमीसाठी तरुण आणि अमर होईल तसेच आपणही तिच्या सहवासात राहू असा राजाने विचार केला.
पिंगलाने ते फळ घोडे सांभाळणार्या सेवकाला दिले. त्या सेवकाने ते फळ एका वेश्येला दिले, जिच्यावर त्याचे प्रेम होते. वेश्येने विचार केला की, हे अमरफळ खाऊन आयुष्यभर तिला या पाप कर्मात राहावे लागेल. यामुळे तिने ते फळ राजाला भेट दिले आणि सांगितले की, तुम्ही हे फळ खाल्ले तर प्रजासुद्धा दीर्घकाळापर्यंत सुखी होईल.
पिंगलाला दिलेले ते फळ वेश्येकडे पाहून राजा भतृहरीच्या पायाखालची जमीन सरकली. राजाला भावाचे शब्द आठवले आणि पिंगलाचा विश्वासघात लक्षात आला. राजा भतृहरीचे डोळे उघडले आणि पिंगलाबद्दल मनामध्ये घृणा उत्पन्न झाली. त्यानंतर राजाने पिंगला आणि त्या सेवकाला शिक्षा दिली नाही. राजाने सर्व राजवैभवाचा त्याग करून वैराग्य धारण केले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.