हिंदु धर्म उदार होवो. काळानुरुप बदला नाही तर मरा, हा सृष्टीचा कायदा आहे. भारतीय नारींची, हिंदुभगिनींची मान धर्मामुळे तरी खाली न होवो. धर्म कोणाला दुःखात लोटण्यासाठी नसतो. तो तर आनंद व सुख हे देण्यासाठी असतो. सर्वांना न्याय, समता, विकास, संधी यासाठी धर्म. धर्माची ही उदारता पुन्हा उज्ज्वलपणे प्रतीत होवो.
भारतीय संस्कृती निसर्गाशी वैर नाही करीत. वृक्षवेली, लता, नद्या, पर्वत, पशुपक्षी,-सर्वांना आपल्या संस्कृतीत, आपल्या जीवनात स्थान. तुळशीचे गोपाळ-कृष्णाशी आपण लग्न लावतो. जणू चराचराला भावना आहेत. हा मूर्खपणा नाही. ही व्यापक सहानुभूती आहे. परंतु या सर्व गोष्टींचा विचार झाला म्हणजे वाईट वाटते की एवढी थोर जीवनद्दष्टी ज्या देशातील लोकांना देण्यात आली होती तेथील लोक एकमेकापासून दूर कसे राहिले? येथे कोटयवधी अस्पृश्य कसे दूर ठेवण्यात आले? शेकडो वन्य जातींना आपण जवळ केले नाही. आपण व्यवहार आणि त्तवज्ञान यांची फारकत केली म्हणून वाईट दिवस आले.
एका गावी सभेस गेलो. तेथे निरनिराळया जातींचे लोक वेगवेगळे बसले. कधी सुधारणार हे सारे? आपला देश शतखंड आहे. सहस्त्रखंड आहे. तरी आम्ही संस्कृतीच्या गप्पा मारतो. हिन्दुधर्माची महती गातो. समाजाची छकले पाडणे हा का हिंदुधर्म? त्या महान धर्माचा आत्मा या लोकांना कधी कळणार?
हिन्दुस्थानला हजारो वर्षाची जातीय द्दष्टीने बघावयाची सवय आहे. त्या त्या जातींच्या नि धंद्यांच्या पंचायती आहेत. त्या आपआपल्या जातींचे नियमन करीत. सुखदुःख बघत. आज काळ निराळा आहे. धंदे गेल्यामुळे जातींना आर्थिक महत्व राहिले नसले तरी जातीच्या डबक्यापलिकडे पाहण्याची आजही दृष्टी नाही. आपण जातिनिरपेक्ष राष्ट्र उभे करण्याची घोषणा केली आहे. परंतु प्रत्येक पक्षाला जातीय दृष्टी ग्रहण लावीत आहे. निवडणुका आल्या म्हणजे जातीय दृष्टीनेच उमेदवार उभे करण्यात येतात. कोठेही प्रश्न उभा राहो, कोणतेही कार्य असो, तेथे आधी जात डोळयांपुढे येते. परवा महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाविषयी लिहितानाही कोणत्या जातीला अध्यक्षपद मिळाले याचा उहापोह वृत्तपत्रांतून झाला. अध्यक्षपदासाठी ज्याला उभे राहायचे असेल त्याने अर्ज करावा लागतो. त्यातून बहुमताने निवड केली जाते. एक प्रकारची लोकशाही पध्दत आहे. कोणत्याही जातीचे असा, तुम्ही साहित्यसेवा केली असेल, साहित्याविषयी तुम्हाला आस्था असेल, अध्यक्ष म्हणून निवडून यायची महत्त्वाकांक्षा असेल तर अर्ज भरून पाठवा. स्वागतसभासदांनी बहुमताने निवडले तरी ठीक, न निवडले तरी खेळीमेळीने वागावे. यात रागवण्या-रुसण्यासारखे काय आहे?