- वगैरे गाणी म्हणत अंगणात नाचू लागतात. परंतु येत नाही अजून जोराने. आरंभी जोराने पडला. रोहिणीतच खळखळ पर्‍हे वाहू लागले. परंतु ते पर्‍हे, ते ओढे, नाले पुन्हा सुकले, वाळले. थोडे थोडे कोठे पाणी आहे इतकेच. एक पूर येऊन गेला. साकवावर पाणी आले होते. सोंडेघरच्या पर्‍ह्यातून एक मुलगा वाहून जाताना वाचला. त्याच्या पाण्याला ओढ फार. गावात पर्‍हे तरी किती! सोनार आळीचा, खोंडयातला, खेरांच्या आळीचा; आणि तो शिरखलचा, हा सोंडेघरचा. प्रत्येक ओढयाची निराळी गुणगुण, निराळा नाद. एवडेच नव्हे तर तोच ओढा सर्वत्र तीच भाषा बोलत नाही. आपला सोंडयातला पर्‍हा आहे ना, तो तिकडे मळीच्या शेताजवळ आला की, निराळीच त्याची गुणगुण. दगडावरून उडया घेत येताना तो खो खो हसतो, तर मग पुढे अगदी गंभीर होतो. जणू त्याची समाधी लागले. नद्यांचा तो अवखळ खो खो हसणारा, उडया मारणारा, गडबड करणारा, तो का हा प्रवाह? परंतु हा मोठा लबाड हो. केळकरांच्या साकवाजवळ शांतपणा धारण करणारा हा प्रवाह पुढे ओकांच्या शेताजवळ गेला की पुन्हा गाणे म्हणू लागतो. निरनिराळया प्रवाहांचे हे विविध संगीत ऐकणे मोठे मजेचे असते. परंतु सृष्टीकडे इतके लक्ष द्यायला वेळ कोणाला नि हौस तरी कोणाला? परंतु हे ओढे पाऊस थांबताच पुन्हा दीन झाले आहेत. कधी येणार बरे पाऊस? गणपतीच्या देवळाजवळील तळे थोडेफार भरले. त्याच्या काठाने आता बेडूक दिसतात. पावसाळा बेडकांना फार आवडतो. पावसात त्यांना बाळसे चढते. हळूहळू सारे पिवळे पिवळे होतील. पाऊस पडू लागताच बेडूक वृन्द-गान करू लागतात. रातकिडे ज्याप्रमाणे एकदम ओरडतात, तसेच बेडूक. रात्रीच्या शांत वेळेस त्यांच्या ओरडण्याचा केवढा आवाज होतो. फ्रान्स देशांत अठराव्या शतकात जमीनदारांची बेडकांच्या ओरडण्यामुळे झोप मोडू नये म्हणून तळयांच्या व डबक्यांच्या पाण्यावर गरीब कुळांना काठया मारीत बसावे लागत असे. हे मृग नक्षत्र संपत आले, संपले. परंतु ते मृगाचे किडे फारसे दिसले नाहीत. एकदा मला दोनचार दिसले. क्षणभर एक हातावर घेऊन मी खाली सोडला. किती सुन्दर दिसतात हे किडे. लाल मखमलीसारखे मऊ मऊ अंग. संस्कृतीमध्ये या किडयाला 'इन्द्रगोफ' असा शब्द आहे. बायकांच्या कुंकवाच्या करंडयात सौभाग्यवर्धक म्हणून हे किडे ठेवण्याची पध्दत असे. परंतु ती पध्दत दुष्टच नाही का? पिंजरेत ते किडे मरून जातात. तू 'एकच प्याला' हे गडकर्‍यांचे अमर नाटक वाचले आहेस का? वाच. त्यात मरताना सिंधु आपल्या भावाला म्हणते, 'तू त्यांच्यावर नको रागवू. अरे तू माझे सौभाग्य राहवे म्हणून माझ्या पिंजरेच्या करंडयात मृगाची पिले ठेवायचास.' मला त्या वाक्याची परवा आठवण आली. परंतु तू हसशील. आता कुंकूसुद्धा काळे निघाले आहे. कुंकू म्हणजे लाल ही भाषा आता गेली आहे. तूही काळे कुंकू कदाचित लावीत असशील. कपाळाला शोभेल ते लावावे. नाही का? हे लहानसे मृगाचे किडे, आठ दिवस दिसतात नि पुन्हा नाहीसे होतात. कोठे असतात त्यांची बारीक अंडी? मातीतील ती अंडी उन्हात, थंडीत मरत कशी नाहीत? का एकदम हे किडे कोठून जन्म घेतात? काय आहे हा प्रकार? साध्या क्षुद्र मातीतून हे नयनमनोहर किडे कोठून आले? आणि हे सौंदर्य, हे रंग सारे क्षणात पुन्हा नष्ट होणार. एकिकडे हे सुंदर मृगाचे किडे तर दुसरीकडे लवलव करणारी गांडुळे. या सर्वांचे या सृष्टीच्या जीवनात काय कार्य, आपणास काय कळे? मळयातील बी उगवले आहे. पडवळीचे, काकडीचे वेल थोडे थोडे आता वर जातील; परंतु पाऊस हवा. पाऊस जोराने येत नाही म्हणून सारे हवालदिल झाले आहेत. मी परवा काही गुजराथी कविता वाचीत होतो. पाऊस येत नाही म्हणून कवी मोराला म्हणतो 'मोरा, मोरा, तू तरी टाहो फोड.' पृथ्वीची तगमग त्या दूर गेलेल्या मेघांच्या कानांवर घाल. मोरा, ओरड मोठयानें ओरड.' आणि मग पाऊस येतो. जणू श्यामलकृष्णच इंद्रधनुष्य सजून येतो. आकाशात वाद्ये वाजू लागतात. आला मेघराज आला. धरित्रीला भेटायला भाऊ आला. प्रेमाने ओथंबून आला. आणि कवी म्हणतो, हा भाऊ रिकाम्या हाताने नाही आला. त्याने हिरवे पातळ आणले आहे आणि निर्झराच्या संगीताच्या तोरडया आणल्या आहेत. छान आहे कल्पना नाही? आणि कवितेत पुढील प्रसंग आहे. शेतकर्‍याची एक मुलगी पाऊस येणार नाही म्हणून निघते. तो वाटेत तिला पाऊस गाठतो. ती ओलीचिंब होते. मला भिजवायला आलास लबाडा, परंतु मला राग नाही तुझा. तुझ्या येण्यामुळे पृथ्वी नवरंगाने नटते, तसे माझे हृदयही भावनांनी उचंबळते. मी शेतकर्‍याची मुलगी. मी का पावसाला कंटाळेन असे ती म्हणते, आपल्याकडे पावसावर फारशी गीते नाहीत. सृष्टीकडे आमच्या कवींचे लक्षच कमी. कोकणातील अपार सौंदर्याचे वर्णन करणारा कवी अजून जन्मायचा आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel