ही एकदा मनात जागृत असावी म्हणून तर आपण बदरीकेदारपासून रामेश्वरपर्यंत जातो.

तुम्हाला देवी अहिल्याबाईची मंगल प्रथा माहीत आहे का? त्या प्रातस्मरणीय मातेने अशी व्यवस्था केली होती की, रोज काशीतील गंगेची कावड, रामेश्वरावर ओतली जावी. कावडीवाले येतच आहेत. अखंड रांग जणू चालू आहे. हा त्याच्याजवळ कावड देत आहे, तो त्याच्याजवळ आज ही पध्दत सुरू आहे की नाही मला माहीत नाही. आज आगगाडीने, विमानाने हे सोपेही आहे. परंतु ज्या काळात हे कठीण त्या काळातही आपण काशी, रामेश्वर, द्वारका नि जगन्नाथ अशी द्दष्टी ठेवीत होतो. आज व्यवस्थेसाठी, त्या त्या प्रांतीय भाषांतूनच जनता बोलणार, शिकणार; म्हणून आपण सवते प्रांत केले, तरी हृदय काशीतील गंगेची कावड अखंड भारताच्या शिव पिंडीवरच सदैव अभिषेक करीत राहो. हीच माझी आशा, हेच माझे स्वप्न!

थोडक्यात, भारतीय द्दष्टी न सोडता, प्रान्त जोडीत असतानाच तो न तोडता, कोणालाही न हिणवता, द्वेष-मत्सर वाढणार नाहीत, याची अति काळजी घेऊ. सीमाप्रश्न, सीमासमितीमार्फत सहृदयतेने सोडवून, भाषावार प्रान्तरचना निर्मून हे पथ्य पाळू तर सारे साजिरे-गोजिरे होईल. नाही तर या मंथनातून हालाहले मात्र निर्माण व्हायची. हालाहल प्राशून शांती देणारा, वाचविणारा मृत्युंजय महात्माही निघून गेला. अशा परिस्थितीत देशाचे भवितव्य खडतर दिसते.

''मारी नाड तमारे हाथे
प्रभु सांभाळजो रे''


प्रभो, या महान राष्ट्राची नाडी तुझ्या हातात असो. तूज सांभाळणारा!

एखादे वेळेस माझे काही मित्र मला माझे ध्येय विचारीत असतात. मानवतेचें सर्वत्र दर्शन व्हावे, सर्वत्र ममता असावी असे तर मला वाटतेच. ना कोणी उच्च ना कोणी हीन. माझ्या जीवनात तरी हे भेदाभेद नकोत असे मला वाटते. मी काँग्रेसच्या चळवळीत सामील झालो. स्वातंत्र्यार्थ हातून काही व्हावे ही ओढ तर होतीच, परंतु काँग्रेस म्हणजे मानवतेचे प्रतीक मला वाटे. माझी जाति-धर्म निरपेक्ष वृत्ती. काँग्रेस सर्वांची म्हणून मला तिचे प्रेम वाटे. १९३० मध्ये धुळे तुरुंगात असताना थोर विधायक कार्यकर्ते श्री. शंकरराव ठकार यांनी मला विचारले, ''तुम्ही पुढे काय करणार?'' मी म्हटले, ''मी खर्‍या धर्माचा लोकांत प्रचार करीन, मानव धर्माचा प्रचार करीन.''

हिटलरने आत्मचरित्रात म्हटले आहे, ''पक्ष्याचे जसे पंख तसे मला राजकारण.'' पंख म्हणजे पक्ष्याचा प्राण. जटायू रावणाला म्हणाला, ''माझे प्राण माझ्या पंखात आहेत.'' हिटलरला राजकारण प्राणमय वाटत होते. राजकारणाशिवाय तो जगता ना. मला राजकारण माझा प्राण असे वाटत नाही. राजकारण खेळायला जी वृत्ती लागते ती माझ्याजवळ नाही. सध्दावाने, थोर मार्गाने राजकारण करायचे असले तरी तेथे एक अभिनिवेश लागतो. शिवाय संघटना करावी लागते. मला संघटना जमत नाही. एखाद्या ध्येयासाठी मी प्रचार करीन, प्राणार्पण करीन, परंतु तणावे बांधणे मला जमत नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel