तुम्ही जनतेशी एकरूप व्हाल तर असे कराल. विवेकानंद म्हणाले, ''तुमचे हृदय जनतेच्या हृदयाबरोबर उडू दे.'' दुसर्‍याच्या दुःखाने दुःखी व्हा; असे आर्त भक्त व्हा. मग ते दुःख कसे दूर करावे, याची चिज्ञासा तुमच्या मनात येईल आणि मग कोणता कल्याणकारक मार्ग याचा विचार करून तो मांडाल. लाल हुकूमशाही नको. भांडवलशाहीही नको. परंतु समता तर आणायची. मग लोकशाही समाजवाद हाच एक मार्ग दिसेल. तुम्ही तुमच्या गोष्टी, कविता, कादंबर्‍या, नाटके, बोलपट या ध्येयाला प्रत्यक्षात आणण्यासाठी लिहा. ज्ञानेश्वर म्हणतात.

''जो जे वांछील तो ते लाहो।''


किंवा ''अवघाचि संसार सुखाचा करीन'' असेही ते म्हणाले. तुमचे ध्येयही हेच असू दे. याहून कमी ध्येय मी नाही सहन करणार. आपापल्या शक्यतेनुसार यासाठी झटा. बर्नार्ड शॉ म्हणाले, ''मला काही सांगायचे आहे म्हणून तर मी लिहितो.''
काही तरी हेतू धरूनच आपण प्रवृत्त होतो. तो हेतू असा उदात्त असो. सामाजिक विषमता, आर्थिक विषमता झडझडून दूर करून राष्ट्राचा संसार उज्ज्वल नि उदात्त करायचा आहे. तुमचे लेखणीचे ललित या ध्येयार्थ असो. माझ्याजवळ सांगायला तरी दुसरी काही नाही.

''पुढील वर्षी कारवारला होणार्‍या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष करण्याचा अनेकांचा विचार आहे. तुम्ही साहित्य सभेचे सभासद मात्र व्हायला हवे,'' असे मला म्हणाले. म्हणूनच मी सभासद होत नाही. मला अध्यक्षपद नको. मजजवळ विशेष सांगायला काही नाही. लिहिणे माझा थोडासा स्वधर्म आहे. परंतु ती माझी जीवनव्यापी वृत्ती नाही. सावरकर म्हणाले, ''लेखण्या मोडा, बंदुका घ्या.'' मी म्हणेन, ''झाडू घ्या, कुदळी घ्या!'' काम करताना जे अनुभव मिळतील ते वेळ मिळेल तेव्हा, राहवत नाही असे वाटेल तेव्हा जनतेला द्या. मी साधना चालवतो. काही विचार जायला हवेत अशी तहान वाटते म्हणून. मी ते साहित्य सेवा म्हणून करत नसून लहानशी जीवनसेवाच करतो. परंतु महाराष्ट्रभर झाडू घेऊन हिंडावे, अनुभव मिळवावे, ते साधनेला पाठवावेत, सेवादलाच्या मुलांबरोबर सामुदायिक शेती करावी, श्रमाचे महाकाव्य अनुभवावे ही खरी मनोकामना. तुम्ही म्हणाल, मी आंतरभारती संस्था काढून तिच्यात गुंतणार. कधी जाल जमीन फुलवायला? शेतीचे प्रयोग करायला?

प्रांतातून फुटीर वृत्ती वाढत आहे. म्हणून अन्नधान्यइतकीच प्रांतीय सदभावनांची नितान्त आवश्यकता आहे. म्हणून ही संस्था काढण्याची कसोशी. परंतु ह्या संस्थेतूनही मुले घेऊन मी उद्या अधून मधून महाराष्ट्रभर स्वच्छता करीन. मेळे-संवाद करीत हिंडेन. सारेच एकदम कसे साधणार? परंतु ज्याला वाङमयाला वाहून घेणे म्हणतात तसा मी नाही. इंग्रजीत म्हणतात, ''He took to literture'' त्याने साहित्य हा स्वधर्म केला. मी त्या अर्थी केला नाही. माझ्या जीवनात लेखणी, झाडू व जातिनिरपेक्ष या त्रिविध वृत्ती आहेत. तिहींचा थोडाफार चाळा मिळाला तर मी मस्त असतो. साहित्याने माझे सारे जीवन व्यापलेले नाही. म्हणून तेथे अध्यक्ष म्हणून येणे मला परधर्म वाटेल, आणि 'परधर्म भयावह' खरे ना?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel