'काया हे पंढरी आत्मा हा विठ्ठल'
शेवटी स्वतःच्या जीवनात सारे आणायचे असते. परंतु आपण संतांचा मागोबा घेत पुढे गेलो नाही. एखाद्या आईचे मूल पहिले पाऊल टाकते. ती शेजारणीला आनंदाने म्हणते, ''बाळयाने आज पहिले पाऊल टाकले.'' परंतु चार महिने झाले तरी बाळया जर दुसरे पाऊल टाकीत नसेल तर मातेला का आनंद होईल? आपण सहाशे वर्षात दुसरे पाऊल टाकले नाही. संतांनी वाळवंटात सर्वांना जवळ घेतले. आपण मंदिरात सर्वांना घेऊ या. आपले हे वंशज असे कसे गतीहीन करंटे, असे मनात येऊन संत तडफडत असतील, दुःखाने सुस्कारे सोडीत असतील.
आपण का पूर्वजांच्यापेक्षा अधिक शहाणे असे कोणी विचारतात. आपण पुढच्या काळात असल्यामुळे आपणास पुढचे दिसते. बापाने लहान मुलाला खांद्यावर घेतले तर त्या लहान मुलाला बापापेक्षा अधिक दूरचे दिसेल. मुलगा जर बापाला म्हणेल, ''बाबा, ती तिकडून लॉरी येत आहे, दूर व्हा. मला दिसते आहे.'' तर मला बाप का असे म्हणेल, ''गाढवा, मला शिकवतोस? मला दिसत नाही. तुला कशी दिसेल!'' आपण मागच्या पिढयांचा खांद्यावर आहोत. आपण पुढचे पाहू शकतो. यात मागील पिढयांचा अनादर नाही. उलट पुढे न जाण्यात त्यांचा अनादर आहे. पायरीला नमस्कार करायचा, परंतु तिच्यावर पाय ठेवूनच पुढे जायचे. उंच चढायचे. तेथेच धुटमळत नाही बसायचे. ती ती पिढी एकेक पायरी वर जात असावी. ध्येयमंदिराकडे जात असावी.
आपण काळाप्रमाणे बदल करायला हवा. आजूबाजूची हवा पाहून वागावे लागते. तसे न करू तर मरूं. थंडीचे दिसव आले तर आपण गरम पांघरू. उन्हाळयाचे दिवस आले तर पातळ कपडे पेहरू. थंडीत उघडे बसू तर गारठून मरू. उन्हाळयांत घोंगडया पांघरू तर घामाघूम होऊन गुदमरून मरू.
थंडीच्या दिवसांत कढत चहाचा घोट घ्याल. उन्हाळयाचे दिवसांत थंड सरबताचा घोट घ्याल. हवा बघून आपण कपडयालत्यात बदल करतो, मग डोक्यात नको का बदल करायला? १९४७ सालात वावरायचे आणि डोके का त्रेतायुगातील ठेवायचे? आज जगात नवीन विचारांची वादळे आहेत. समाजवादी क्रांतीचे नगारे वाजत आहेत. इन्किलाबची गर्जना होत आहे. समतेचा घोष होत आहे. अशा वेळेस तुम्ही शिवू नकोची तुणतुणी वाजवीत बसायचे? जरा काळ वेळ पाहा. सारी दुनिया जवळ जवळ येत आहे. सारे जग जणू तिमजली घर झाले आहे. अमेरिकते काय बोलले जाते, काय होते, ते मुंबईत लगेच वर्तमानपत्राच्या कचेरीत आपोआप यंत्राने लिहिले जाते. बंधूंनो, दूर राहायचे हे दिवस नाहीत. डबकी करून बसण्याचे हे दिवस नाहीत. मोठी द्दष्टी घ्या. विचारांत, आचारांत उदार द्दष्टी आणा.
धर्मात दोन भाग असतात. यम नि नियम. यम म्हणजे कधी न बदलणारी शाश्वत सत्ये. खरे बोलावे, आत्मा अमर आहे. सर्वत्र आत्मतत्व पहार्या तत्त्वांना यम म्हणतात. ही तत्वे त्रिकालाबाधीत असतात. प्रभू रामचंद्र, हरिश्चंद्र यांचा काळ असो, महात्माजींचा असो. सत्याला सोडू नये हा निरपवाद सिध्दांत आहे. यमात फरक कधी होत नाही. परंतु नियमात होत असतो. त्या त्या काळी समाजाला फरक करावे लागतात. चालिरिती बदलतात. लहानपाणचे कपडे मोठेपणी अंगास येणार नाहीत. असे फरक आपण सदैव करीत होतो. म्हणून तर नाना स्मृति. श्री. शंकराचार्यांनी म्हटले आहे, ''अग्नि थंड आहे असे शेकडो श्रृति येऊन सांगू लागल्या म्हणून का प्रमाण मानायचे?'