शतदा मागणी करूनही सरकार बेफिकीर असेल तर संपावर जाण्याशिवाय कोणता उपाय? सरकारला का संपच पाहिजेत? संप केलात तर नफा-वाटणी नाही, संप कराल तर युनियन नोंदवली जाणार नाही. एवढेच नव्हे तर परवा म्हणे सांगण्यात आले, तुमच्या मनात संपाविषयी सहानुभूती. कशी मान्यता द्यायची युनियनला? सारे सरकारी हपिसरांच्या मनावरच चालायचे असेल तर प्रश्नच संपला.
अशा मुस्कटदाबीने संप हाणू बघतात. कोठे आर्बिट्रेशन मागितले तर देत नाहीत. जणू अंत बघतात. वर्षापूर्वी दापोडी वर्कशॉपमधील कामगार ४७ दिवस शांतपणे संपावर होते. शंभर टक्के, १०१ टक्के, गांधीतत्त्वानुसार संप झाला! कोणी उपासमार करून मरायला निघावे किंवा मारामारी करावी हेच सरकारला हवे?
ठाण्याला मागे रेमंड वूलन मिलमध्ये संप बरेच दिवस चालला. शान्तपणे चालला. तीवर काही नाही. एक दिवस मारामारीत कोणी मरताच लगेच आर्बिट्रेशन! दहा वर्षांपूर्वी धुळयला ४० दिवस संप चालला. मिल उघडेना, 'तापीत मरतो' म्हटले तेव्हा हालचाली.
कामगारांची शांततेच्या मार्गावरची अशा रितीने श्रध्दाच उडाली तर या देशात लाल नाश येईल. महात्माजी म्हणाले होते ''I see red ruin every where मला लाल नाश दिसत आहे.''
हिंदुस्थानात कोठल्या एका कारखान्यांत ''पिटाई बोनस'' शब्द रूढ असल्याचे कळले! शांततेचा मार्ग संपतो, तेव्हा उपवास करून मरण किंवा पिटापिटी हे दोन मार्ग उरतात. सरकारला कामगारांची कोणत्या मार्गावर श्रध्दा, वाढावी असे वाटते?
आज इंग्लंडमध्ये चैनीत दिडकी जात नाही. सक्तीने जणू शिल्लक पडते. त्यामुळे चलनवाढीला आळा बसतो. इंग्लंडहून आलेला एक मित्र म्हणाला, इंग्लंडमध्ये एका सुटापुरते वर्षाला कापड मिळते; तेथील बिस्किटे इकडे येतात. निर्यात होते. परंतु देशात सारे प्रमाणात मिळते.'' आणि आमच्याकडे? मोटरी येतच आहेत, चैनीच्या वस्तू येतच आहेत. सक्तीची वस्तू येतच आहेत. सक्तीची बचत कशी होईल? आवश्यक नसलेल्या वस्तूच बाजारात नकोत, परंतु यासाठी राष्ट्रहिताची जळती भावना हवी. ते धोरण अंमलात आणण्याची हिमालयाची हिंमत हवी. कारखानदार उत्पादन कसे घटवतात, वाढवीत कसे नाहीत, ते कठोरपणे परीक्षिले पाहिजे. योग्य ते मार्ग अवलंबिले पाहिजेत.
मागे श्री. अण्णासाहेब सहस्त्रबुध्दे यांनी लिहिले की, देशी गिरण्यांचा कपडा निर्यातीसाठी ठेवा. देशारा सारा कपडा हातमागावरचा द्या. हातमागाला खेडयापाडयातून सूत पुरवा. जर सारी सरकारी चक्रे या दिशेने फिरती तर कोटयवधी रुपयांचे उत्पादन वाढते. निर्यातीलाही माल झाला असता. देशात ग्रामोद्योगाला प्रचंड चालना मिळाली असती. परंतु गांधीजींचे नांव जपणारे हे बेगडी लोक चरखा वर येऊ देतील तर शपथ!